
राजवाड्यात लवकरच हस्तकला महोत्सव
79436
सावंतवाडी : कॉलेज परिसरात भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात ‘गंजिफा’ कलेच्या स्टॉलची पाहणी करताना राणीसाहेब सौ शुभदादेवी भोसले, युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले, चंद्रशेखर सिंग, व अन्य (छायाचित्र ः रुपेश हिराप)
राजवाड्यात लवकरच हस्तकला महोत्सव
युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले; कलाकार जपण्यासाठी शासनाच्या मदतीने सहकार्य करू
सावंतवाडी, ता. ३१: सिंधुदुर्ग आणि कोकणातील कलाकारांना एकत्र घेऊन लवकरच राजवाड्यात हस्तकला महोत्सव भरविण्यात येईल. त्यासाठी शासनाचेही सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांनी आज येथे दिली. भविष्यात कला आणि कलाकार जपण्यासाठी राजघराण्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. येथील पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
केंद्राच्या कोल्हापूर हस्तकला विभागातर्फे येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात दोन दिवशीय हस्तकला व शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहीती देण्यात आली. यावेळी यावेळी राणीसाहेब सौ शुभदादेवी भोसले, भारत सरकार वस्त्रोद्योग मंत्रालय कोल्हापूर हस्तकला विभागाचे सह संचालक चंद्रशेखर सिंग,प्राचार्य डॉ डी.एल. भारमल, देवरुख कॉलेजचे प्राचार्य रणजित मराठे, प्रा गणेश मार्गज, प्रा बी एन हिरामणी, प्रा गोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी सिंग म्हणाले, "भारत सरकार हस्तकला विभागातर्फे अनेक योजना अमलात आणण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात शाळांमध्ये हस्त, शिल्प कलेचा प्रचार प्रसार व्हावा. ही कला मुलांना समजावी त्यातून रोजगार निर्मिती व्हावी त्यासाठी ठिकठिकाणी असे प्रदर्शन भरवले जात आहे. सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी भोसले तसेच युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून विशेष करून हस्तकलेचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. भारत सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर विभाग अंतर्गत येणाऱ्या तीस जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे हस्तकला प्रदर्शन वर्षाचे बाराही महिने भरवले जाते. त्यात पन्नास स्टाॅल विविध हस्त, शिल्प, लाकडी खेळणी व बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या कलेचे सादरीकरण केले जाते. ही कला मुलांना फक्त पुस्तकात माहिती आहे ती प्रत्यक्षात समजावी त्यातून उदयोनमुख कलाकार घडावेत यासाठी प्रयत्न आहेत."
ते पुढे म्हणाले,"सिंधुदुर्ग विशेषत: सावंतवाडी राजघराण्यामध्ये गंजीफा तर लाकडी खेळणी मातीकाम, शिल्पकला, चित्रगती, लाकडापासून व बांबूपासून तयार केलेली हस्तकला प्रसिद्ध आहे. या कलाना जी आय मानाकंन प्राप्त व्हावे यासाठी आमचे प्रयत्न असून सिंधुदुर्ग मधील या सर्व कला विकसित करायच्या आहेत .त्यासाठी कारागीर घडविणे त्यांना ओळखपत्रे देणे यावर आम्ही भर दिला आहे. भारत सरकारच्या हस्तकला विभागाचे अनेक फायदे असून त्यासाठी तीन लाख पर्यंत मुद्रा लोन, मोफत ट्रेनिंग, मोफत स्टॉल, सबसिडी, मार्केटिंग तसेच त्यांचे उत्पादन विकण्यासाठी व्यासपीठ देखील, मशीनरी, किट,या विभागामार्फत उपलब्ध करून दिले जात आहे."
---
‘गंजीफा’ कलेला उर्जितावस्थेसाठी प्रयत्न
यावेळी राणीसाहेब सौ भोसले यांनी म्हणाल्या, राजघराण्याने या कलेला राजाश्रय दिला आहे. राजेसाहेब शिवरामराजे भोसले हे सहा वर्षे महाराष्ट्र हस्तकला बोर्डाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात बहुताशी हस्तकलांना वाव दिला. त्यांच्याच कार्याचा वसा पुढे सुरु ठेवून स्थानिक हस्तकलाचे पुनरुरुजीवन करण्याचे काम राजघराणे करीत आहे. कारागीरांना लागणारी सर्व मदत राजघराण्याकडून उपलब्ध करून दिली जाईल. ‘गंजीफा’ ही कला विविध राज्यात पाहिली जात होती; मात्र आता ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली आहे. भविष्यात या कलेला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी कलाकारांनी पुढे येऊन हे कला जोपासली तर सर्व सहकार्यही करू.