
आपापल्या गावातील नदीसाठी काम करण्याचा संकल्प
फोटो - KOP23L79537 खेड ः ‘चला जाणू या नदीला’ अभियानात सहभागी झालेल्या प्रांताधिकारी सौ. मोरे, तहसीलदार सौ.घोरपडे व ग्रामस्थ
गावातील नदीसाठी काम करण्याचा संकल्प
चला जाणूया नदीला ;अभियानात उत्स्फूर्तपणे गावकरी सहभागी
खेड, ता. ३१ : दिवसेंदिवस गावागावातील नद्या गाळाने भरल्या आहेत, तसेच शहराच्या किनाऱ्याच्या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. वास्तविक नदी ही गावाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे आईप्रमाणेच गावच्या नद्यांचीही सेवा करा असे आवाहन प्रांताधिकारी राजश्री मोरे यांनी केले. याप्रसंगी आपापल्या गावातील नदीसाठी काम करण्याचा संकल्प त्या त्या गावातील गावकऱ्यांनी केला.
देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाली म्हणून या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील ७५ नद्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. यामध्ये खेड तालुक्यातील प्रमुख असलेल्या जगबुडी नदीचाही समावेश असल्याने या नदीच्या उगमस्थानी सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या नानावले, वाक्षेप, महाळूनगे, आंबवली, वरवली तसेच चाटव आदी गावांमध्ये ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये प्रांताधिकारी मोरे यांनी हे आवाहन केले. यावेळी तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या हस्ते जलपूजन करून जगबुडी नदी परिक्रमेला प्रारंभ झाला. त्या त्या गावातील नदीची प्रत्यक्ष पाहणी करत भविष्यातील नियोजना संदर्भात विचारमंथन करण्यात आले. या अभियानात उत्स्फूर्तपणे गावकरी सहभागी झाल होते. शासनाच्या या आवाहनाला उत्साहवर्धक प्रतिसाद देत आपापल्या गावातील नदीसाठी काम करण्याचा संकल्प त्या त्या गावातील गावकऱ्यांनी केला. यावेळी तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, या अभियानाचे नोडल अधिकारी सत्यजित गोसावी, जलनायक संजय यादवराव, त्या त्या गावातील सरपंच ,ग्रामसेवक तलाठी दीपक यादव, ऋषिकेश मोरे ,साबीर शिराज, सरफराज पोत्रिक, सतीश कदम, देवानंद यादव, संतोष मोरे ,प्रकाश महाडिक ,विश्वास कदम, आणि अनेक नदी कार्यकर्ते व असंख्य नागरिक या नदी परिसरातील या जलपरीक्रमेमध्ये सहभागी झाले होते.
चौकट
कोकण टाईप बंधारे हवेत
कोकणातील तीव्र उताराच्या नद्या पाहता येथे कोल्हापूर किंवा अन्य पद्धतीचे बंधारे टिकू शकत नाहीत, त्यामुळे येथील नद्यांचे पाणी जर अडवायचे असेल तर येथे कोकण टाईप बंधाऱ्यांची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. साखळी बंधारे, जलव्यवस्थापन , पाण्याचा प्रभावी वापर, गावात होणारे नद्यांचे प्रदूषण, या विषयांवर दिवसभर चर्चा विविध बैठकांमधून झाली.