
स्वतंत्र व्यापार मंत्रालयासाठी पाठपुरावा
79597
वेंगुर्ला ः येथील जिल्हा व्यापारी महासंघाचा ३५वा वार्षिक व्यापारी एकता मेळावाचे उद्घाटन उद्योजक रघुवीर मंत्री यांच्या हस्ते झाले.
स्वतंत्र व्यापार मंत्रालयासाठी पाठपुरावा
ललित गांधी ः वेंगुर्लेत व्यापारी एकता मेळावा उत्साहात
वेंगुर्ले, ता. ३१ ः राज्यात व देशात स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण व्हायला हवे. त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. व्यापार्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि विकासासाठी महाराष्ट्र चेंबर्स आपल्या नेहमी पाठीशी राहील, अशी ग्वाही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आज येथे दिली.
सिधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३५वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा आज येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झाला. या मेळाव्यात ललित गांधी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘एखादा महासंघ वर्षातून व्यापार बंद ठेऊन एकत्र येतो. एकत्र येऊन चर्चा, विकास, अडचणी याबरोबरच एकमेकांना भेटण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून सुद्धा या मेळाव्याचा उपयोग होतो. ईकॉमर्सचे होत असणारे आक्रमण हे व्यापाऱ्यांच्यादृष्टीने चिंतेची बाब आहे. गेल्या ५ वर्षात ऑनलाईन कंपन्यांच्या आक्रमणामुळे देशातील ३० टक्के किरकोळ व्यापार हे कायमचे बंद पडले. गेले तीन वर्षे याबाबत सातत्याने केंद्राशी आपण संघर्ष करीत आहोत. ई कॉमर्सच्या व्यापाराची पॉलिसी सरकारने जाहीर करावी अशी आम्ही मागणी लावून धरलेली आहे आणि उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये ही पॉलिसी यावी अशी अपेक्षा आहे. तशी मागणीही चेंबर्स ऑफ कॉमर्सने केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे केली आहे. व्यापार धोरण करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. अर्थसंकल्पपूर्व बैठकीत राज्यात व देशात स्वतंत्र व्यापार मंत्रालय निर्माण करण्यासाची मागणीही केली आहे.’’
या मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सारस्वत बँक संचालक सुनिल सौदागर, जीएसटी कौन्सिलचे सदस्य सीए. उमेश शर्मा, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, कंझ्युमर प्रॉडक्टस् डिस्टीब्युटर्स सिधुदुर्गचे अध्यक्ष अरविद नेवाळकर, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन सिधुदुर्गचे अध्यक्ष आनंद रासम, परीट संघटना सिधुदुर्गचे अध्यक्ष दिलीप भालेकर, कुक्कुट पालन व्यवसाय असोसिएशन सिधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश म्हाडगुत, विजग्राहक संघटना सिधुदुर्गचे अध्यक्ष संतोष काकडे, हॉटेल मालक उन्नत्ती संघ सिधुदुर्गचे अध्यक्ष राजन नाईक, टोलमुक्त सिधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष प्रमादे नलावडे, सिधुदुर्ग जिल्हा व्यापारी महांसघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, जिल्हा सदस्य राजेश शिरसाट, नंदन वेंगुर्लेकर, वेंगुर्ला तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष विवेक खानोलकर, सचिव राजन गावडे, खजिनदार सखाराम सौदागर आदी उपस्थित होते.
सिधुदुर्ग जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. सिधुदुर्गाचे नाव सर्वत्र आहे; पण व्यापार्याच्या दृष्टीने सिधुदुर्गचे नाव समृद्ध होत आहे असे वाटत नाही. माझा सिधुदुर्ग जिल्हा व्यापार्याच्याबाबतीसुद्धा समृद्ध व्हावा. त्रुटी सोडविण्यासाठी त्यात सर्वांनी लक्ष घालावा. सिधुदुर्गात व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात बाहेरचे लोक काम करतात. मग सिधुदुर्गवासीय कुठे चुकतो आहे काय? यासाठी आत्मसंशोधन करण्याची गरज आहे. नवीन पिढीच्या तरुण व्यापार्यांनी खरोखरच लक्ष घातला पाहिजे असे आवाहन उद्योजक रघुवीर उर्फ भाई मंत्री यांनी केले.
दरम्यान या मेळाव्यातील चर्चेतून पुढे आलेल्या समस्या आणि प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातुन सोडवण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मंत्रीमंडळ बैठकीमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने मंत्री केसरकर यांनी या मेळाव्याला ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिला. टुरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्याकडे नोंदणी असेल अशा हॉटेल व्यावसायीकांना व्यापारी वीज दर न लावता त्यांना औद्योगिक दर लावावा अशा स्वरुरपाचा जीआर महाराष्ट्र सरकारने केलेला असल्याची माहिती प्रताप होगाडे यांनी देत सिधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटनेची कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी श्री. मंत्री, श्री. गांधी, श्री. दाशरथी यांच्या सत्कारासोबतच उत्कृष्ट व्यापारी व जिल्ह्याच्या व्यापारी संघटनेत उत्कृष्टपणे योगदान देत संघटना मजबुत करण्यास सदैव तत्पर कार्यरत असलेले अनिल सौदागर यांना जीवन गौरव पुरस्काराने तर भटवाडी येथील नर्मदा काजू फॅक्टरीच्या संचालिका मंदाकिनी सामंत यांना महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल अशा पध्दतीने काम करणार्या महिलांसाठी देण्यात येणारा श्रीमती माई आरोसकर महिला उद्योजक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पहिल्या सत्रातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेंगुर्ला व्यापारी अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी, सूत्रसंचालन काका सावंत, जिल्हा सहकार्यवाह राजू जठार यांनी अहवाल वाचन केले.
-------
चौकट
असे झाले ठराव
या मेळाव्यात एकूण सात ठराव घेण्यात आले. त्यापैकी बेळगांव-कारवार-निपाणी हल्ल्याळ, बिगर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाचे पाहिजे, सिधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी झालेल्या सर्वप्रकारच्या वाहनांना जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी कोणत्याही पद्धतीने पथकर आकारला जाऊ नये, बॅ.नाथ पै सिधुदुर्ग विमानतळाचा वापर पूर्ण क्षमतेने करावा, वस्तु व सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीच्यावेळी दिलेल्या अभिवचनानुसार फक्त महाराष्ट्रात अस्तित्त्वात असलेला व्यवसाय कर कायदा समुळ रद्द करावा, महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये व्यापार्यांचे खरे प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी विभागनिहाय व्यापारी मतदार संघ निर्माण करावेत आदी महत्वाच्या ठरावांचा समावेश असून ठराव वाचन झाल्यानंतर उपस्थितांनी या ठरावांना दोन्ही हात उंचावून पाठींबा दर्शविला.