
सावंतवाडीत ‘बीपीओ’ सेंटर उभारले
सावंतवाडीत ‘बीपीओ’ सेंटर उभारले
हर्ष साबळे ः भविष्यातही तरुणांना रोजगार देणार
सावंतवाडी, ता. ४ ः तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीने कोकणात सावंतवाडी येथे पहिले ‘बीपीओ’ सेंटर सुरू केले आहे. यामार्फत स्थानिक २० जणांना रोजगार प्राप्त झाला असल्याची माहिती व्हरेनियम क्लाउड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन उर्फ हर्ष साबळे यांनी दिली.
त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘‘मुंबई युनिव्हर्सिटीचे सबसेंटर सावंतवाडीत सुरू केले असून व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि ऍडमिशन यांनी इफास्ट्रक्चर आणि टेक्निकल सुविधा पुरविली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती म्हणजे कुडाळ येथे कंपनीचे सेंटर होणार आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही अशा प्रकारची सेंटर होणार आहेत. या सर्वांच्या माध्यमातून कंपनी शिक्षण विषयक कोर्सेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थांना प्रदान करणार आहे. कोकणाबद्दल नितांत प्रेम आहे. माझी आई मूळची कोकणातली आणि म्हणूनच कोकणातील विद्यार्थ्यांसाठी, येथील तरुणांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशानेच व्हेरेनियम क्लाउड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम करत आहे. एकूणच या विकास प्रकल्पात कोणीही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी ही कंपनी केव्हाही बांधील नाही आणि यापुढेही राहणार नाही. कोकणात रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. येथे येणाऱ्या कंपन्या मुंबई, पुणे, गोवा येथीलही असतील. त्यामुळे ज्यांना जिथे आवश्यक आहे, त्या ठिकाणी जॉब दिले जातील. आपल्या शैक्षणिक पात्रता व आलेल्या कंपन्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी त्या त्या ठिकाणी अर्ज सादर करावेत. रोजगार मेळाव्यासह आणखी सुद्धा इतर प्रकल्प कोकणात येणार असून या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल.
साबळे पुढे म्हणाले की, व्हरेनियम क्लाउड लिमिटेड कंपनीकडून मोडेल करिअरच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी येथील स्थानिक युवक-युवतींना देण्यात आल्या आहेत. तर सावंतवाडी तालुक्यातील १२ जणांना हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये गोवा आणि बेंगलोर येथे रोजगार मिळवून दिले आहेत. ५ जानेवारीला व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि ऍडमिशन आयोजित रोजगार मेळाव्यात अनेक कंपन्या दाखल झाल्या होत्या. त्यातून येथील स्थानिकांना १० ते २५ हजार वेतन असलेले रोजगार मिळाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या कुडाळ येथे लवकरच सर्वात मोठे ''हायड्रा'' हे डाटा सेंटर उभारण्यात येणार आहे. हे भारतातील महत्त्वाचे सेंटर ठरेल. याद्वारे स्थानिकांना तसेच कोकणातील नागरिकांना रोजगार प्राप्त होईल. तसेच गेल्या २७ डिसेंबरला गोवा-पणजी येथे सुरू झालेल्या डाटा सेंटरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. कोकणात हे सगळे प्रकल्प राबविण्यामागे माझा एकच हेतू आहे. पुढच्या काळात विविध प्रकल्प कंपनीच्या माध्यमातून कोकणात आणू. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोणीही यात राजकारण करू नये.’’
---
सर्वांचे सहकार्य अपेक्षित
साबळे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत ऍडमिशन सेंटरने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्प राबवले आहेत. यात कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान घेतलेले नाही. कंपनी स्वतःच्या खर्चातून हे सगळे उपक्रम राबवत आहे. मुंबई विद्यापीठालासुद्धा मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. हे करत असताना कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान न घेता ऍडमिशन सेंटर हे प्रकल्प राबवत आहे. अशाच प्रकारचे प्रकल्प भविष्यातही राबविणार आहोत. कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान घेणे हा कंपनीचा उद्देश नाही, तर इथल्या तरुणांना काम देणे, या एकमेव उद्देशाने कंपनी काम करत असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.