देवगडमध्ये उद्यापासून क्रीडा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये उद्यापासून क्रीडा महोत्सव
देवगडमध्ये उद्यापासून क्रीडा महोत्सव

देवगडमध्ये उद्यापासून क्रीडा महोत्सव

sakal_logo
By

80429
जामसंडे ः येथील मैदानावर स्पर्धेची तयारी सुरू आहे. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)


देवगडमध्ये उद्यापासून क्रीडा महोत्सव

अ‍ॅड. अजित गोगटे ः कबड्डीसह व्हॉलीबॉल, कुस्ती, कॅरम स्पर्धेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ ः जामसंडे येथील सन्मित्र मंडळाच्या वतीने सोमवारपासून (ता. ६) जामसंडे येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवारपर्यंत (ता. ११) महोत्सव चालणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय पुरुष (निमंत्रित खुलागट कबड्डी स्पर्धा), जिल्हास्तर पुरुष व महिला (निमंत्रित) खुलागट कबड्डी स्पर्धा तसेच जिल्हास्तर कुस्ती स्पर्धा ६ ते ८ या कालावधीत, जिल्हास्तर व्हॉलीबॉल स्पर्धा १० ला, तर जिल्हास्तर कॅरम स्पर्धा ११ ला घेण्यात येतील. सर्व स्पर्धा दिवस-रात्र होणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजन समिती कार्याध्यक्ष तथा माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे यांनी दिली.
स्पर्धेबाबत माहिती देताना सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष राजा भुजबळ, कार्यवाह चंद्रकांत पाटकर, आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र अनभवणे आदी उपस्थित होते. मंडळाच्यावतीने गेली १३ वर्षे निमंत्रित राज्यस्तरीय पुरुष व महिला खुला गट व जिल्हास्तरीय पुरुष खुलागट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गेली दोन वर्षे कबड्डी स्पर्धेबरोबर जिल्हास्तरीय कुस्ती, कॅरम, बुद्धिबळ व डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा मंडळाने ६ ते ११ या कालावधीत क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत १५ संघ सहभागी होणार आहेत. साखळी पध्दतीने सामने होतील. यातील विजेत्या संघाला ३५ हजार व चषक, उपविजेत्या संघाला २५ हजार व चषक, उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांना प्रत्येकी १० हजार व चषक देण्यात येतील. यातील शिस्तबद्ध संघास ५ हजार व सन्मानचिन्ह, अष्टपैलू खेळाडूस ३ हजार व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यासाठी प्रत्येकी एक हजार व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय (पुरुष व महिला) कबड्डी स्पर्धेत १६ पुरुष संघ, तर ८ महिला संघ सहभागी होणार आहेत. बादफेरीनुसार सामने होतील. यातील विजेत्या संघाला १० हजार व चषक, उपविजेत्या संघाला ७ हजार व चषक, उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांना प्रत्येकी ४ हजार व चषक तसेच शिस्तबद्ध संघ आणि अष्टपैलू खेळाडूस प्रत्येकी एक हजार व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धा निरीक्षक म्हणून प्रवीण सावंत, पंचप्रमुख म्हणून विद्याधर घाडी काम पाहतील. जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी एकूण ३० हजाराची, कुस्ती स्पर्धेसाठी एकूण १ लाख १० हजाराची, तर कॅरम स्पर्धेसाठी एकूण २५ हजाराची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कुस्ती स्पर्धेमध्ये सुमारे १२० स्पर्धक, कॅरम स्पर्धेमध्ये सुमारे ८० स्पर्धक तर व्हॉलबॉल स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत.
...................
चौकट
स्पर्धेतील सहभागी संघ
राज्यस्तरीय पुरुष संघ-गोल्फादेवी शहर, ओम पिंपळेश्वर, जयभारत, गुडमॉर्निंग, शिवनेरी, संकल्प प्रतिष्ठान, सह्यादी क्रीडा मंडळ, उत्कर्ष क्रीडा मंडळ, नवभारत शिरोली, मावळा सडोली, जागर, पंचक्रोशी फोंडा, जय महाराष्ट्र सावंतवाडी, अमरहिंद मुंबई, हनुमान सेवा संघकल्याण.
जिल्हास्तरीय पुरुष संघ-सिंधुपुत्र कोळोशी, श्रीराम भटवाडी, दिर्बाई पाटकरवाडी, यंगस्टार कणकवली, स्थानेश्वर किंजवडे, गुरुकृपा बेलवाडी, शुभम स्पोर्टस् जामसंडे, महालक्ष्मी वळकूवाडी, दिर्बा रामेश्वर जामसंडे, शिवभवानी सावंतवाडी, संघर्ष म्हापण, लक्ष्मीनारायण वालावल, जयगणेश पिंगुळी, मानसीश्वर वेंगुर्ले, महिला संघ-जय मानसीश्वर वेंगुर्ले, हॉलीक्रॉस सावंतवाडी, एस.एम. सिंधू कुडाळ, यंगस्टार कणकवली, शुभम स्पोर्टस् जामसंडे, श्रीराम व्यायाम शाळा देवगड, जय गणेश मालवण, जय गणेश वैभववाडी.