घाटातल्या कचऱ्याचा सावंतवाडीला ताप

घाटातल्या कचऱ्याचा सावंतवाडीला ताप

80504
इन्सुली ः येथील घाटीतील कचरा.
80505
मळगाव ः येथील घाटीत टाकलेला कचरा.


घाटातल्या कचऱ्याचा सावंतवाडीला ताप

नियंत्रण कोणाचे? प्रवेशद्वारावरच स्वागत करतात कचऱ्याचे ढीग

लीड
सावंतवाडी शहराला संस्थानकालीन वारसा आहे. त्यात मोती तलाव आणि बाजूला असलेल्या नरेंद्र डोंगरामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नावारुपास आलेल्या सावंतवाडी शहराकडे येणाऱ्या चारही घाटात मात्र आता कचऱ्याचे ‘डम्पिंग ग्राउंड’ बनत आहे. मळगाव, आकेरी, इन्सुली आणि आंबोली हे चारही घाट वनविभाग अखत्यारित येतात. याकडे या विभागाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही वनविभागाच्या उदासीनतेमुळे सावंतवाडीच्या स्वच्छतेत ही डोकेदुखी ठरत आहे.
.....................
शहर ‘चकाचक’; सीमेवर ‘गंदगी’
शहरात सध्या स्वच्छ भारत सर्वेक्षण, ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत परिसर स्वच्छ करून मोकळ्या जागांची रंगरंगोटी केली जात आहे. यामुळे शहरातील परिसर चकाचक झाला आहे; मात्र, शहर चकाचक होत असताना शहराच्या सीमेवर ‘गंदगी’ पाहायला मिळत आहे. प्रवेशद्वारालगत रस्त्याकडेला साचलेला हा कचरा डोक्याला ताप बनला आहे. सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून स्वच्छ भारत सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली. यासाठी मुख्य ठिकाणांसह शहरात सुशोभीकरण करण्यात येत आहे. स्वच्छतेचा संदेश भित्तीचित्रांद्वारे दिले जात आहे. ओला-सुका कचरा विलगीकरण, पर्यावरण संतुलनाबाबत जनजागृती केली जात आहे. त्यामुळे शहर चकाचक दिसत असले तरी शहराच्या हद्दीवरील अस्वच्छतेचे करायचे काय, असा प्रश्न पालिकेला पडला आहे.
..............
येरे माझ्या मागल्या...
आंबोलीमार्गे सावंतवाडी शहरात प्रवेश करताना या कचऱ्याचे दर्शन होते. याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांसह नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांची शहरालगतच्या ग्रामपंचायतीसोबत बैठकही झाली होती. पालिका व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्याबाबत यावेळी निर्णय घेतला होता; परंतु ‘येरे माझ्या मागल्या’, अशीच परिस्थिती येथे दिसून येत आहे. प्रशासनासह नागरिकही या प्रकारास तितकेच कारणीभूत आहेत. सावंतवाडी पालिका व कारीवडे ग्रामपंचायतीची ही हद्द आहे. तर जवळच डंपिंग ग्राऊंड, कचरा वर्गीकरण प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यामुळे शहर ‘चकाचक’ करीत असताना हद्द देखील ‘चकाचक’ रहावी, हद्दीवर घाण करण्याची हिंमत कोणी करू नये, यासाठी पालिका प्रशासनाने कडक पावले उचलणे आवश्यक आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही सुजाण नागरिकांकडून केली जात आहे. अस्वच्छतेची सलामी देत शहरात येणाऱ्यांचे स्वागत करणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
.................
सावंतवाडीसाठी निधीची मागणी
सावंतवाडी शहर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असून जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासासाठी कोट्यवधींच्या निधीची गरज आहे. सावंतवाडी पालिका ‘क’ वर्ग पालिका असून पालिकेचा स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता दिलेली आहे. प्रकल्प अहवालात नमूद उपकरणे, मशिन, यंत्रे आदींची खरेदी करून नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी करावयाची कार्यवाही सुरू आहे. सावंतवाडी पालिका क्षेत्रात अंदाजे प्रतिदिन ७ ते ८ टन ओला कचरा व ५ टन सुका कचरा निर्माण होतो. या निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी येथील पालिकेने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कारीवडे येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारलेला आहे. या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. सावंतवाडी पालिका सुक्या कचऱ्याचे किमान ३५ प्रकारांत वर्गीकरण करते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट व गांडूळ खत निर्मिती करण्यात येते. तसेच याठिकाणी सांडपाणी प्रक्रिया (एफएसटीपी) प्रकल्प उभारला आहे; परंतु हा प्रकल्प अपुरा पडणारा आहे. सावंतवाडी पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये राज्यस्तरावर सातवा क्रमांक प्राप्त केला असून याहीपेक्षा प्रगतीने काम करून त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी पालिकेस सुक्या कचऱ्यापासून ब्रिकेट तयार करण्यासाठी डस्टर मशिन खरेदीसाठी ९ लाख अशी घनकचरा व्यवस्थापनासाठी निधीची मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
---
50526
जैवविविधतेवर परिणाम
शहरात येताना लागणाऱ्या या घाटात जंगल असून ते जैवविविधतेने परिपूर्ण आहे. या ठिकाणी काही विशिष्ट प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आढळून येतात; मात्र उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे जैवविविधतेच्या अधिवासाला धोका पोहोचत आहे. टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याने पाळीव प्राणी व परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रोग पसरण्याची शक्यताही दाट आहे. येथे शिळे अन्नपदार्थ टाकले जातात. डोंगरात चारण्यासाठी सोडलेली जनावरे आणि वन्यप्राणी हे अन्य पदार्थ खातात. या अन्नासह प्लास्टिकच्या पिशव्या जनावरांच्या पोटात जातात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते.
..................
80515
कचरा टाकतोय कोण?
सावंतवाडी शहरात प्रवेश करताना आणि माघारी जाताना मिळणाऱ्या घाटात आपल्या ताब्यातील गाडीतून काही स्थानिक नागरिक कचरा फेकतात. तर सावंतवाडी तालुक्यातील होणाऱ्या आठवडा बाजारादिवशी सुद्धा शहरात येणारे परप्रांतीय विक्रेते त्या घाटात कचरा टाकतात, असा दावा यंत्रणा करतात. याबाबत पालिका प्रशासनाने आणि वनविभागाने कचरा टाकणाऱ्यांना समज दिली आहे; मात्र तरी सुद्धा काही नागरिक त्या ठिकाणीच कचरा टाकत आहेत. त्यामुळे जनजागृती होणे गरजेचे आहे.
...................
80516
पर्यटनासाठी धोकादायक
सिंधुदुर्गातील निसर्गसंपन्न आंबोली घाटात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पसरलेला नजरेस पडतो. आकेरी, इन्सुली, मळगाव घाटात सुद्धा हीच स्थिती आहे. हे पर्यटनाच्या दृष्टीने धोकादायक आहे. सावंतवाडी शहरात येण्यापूर्वी पर्यटकांना जागोजागी कचऱ्याच्या ढिगांचेच दर्शन होते. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात येणारा पर्यटक हा कचरा पाहण्यासाठी येणार आहे का, असाही प्रश्न आहे.
...................
13421
रेल्वेस्थानक परिसरातही प्रश्न
सावंतवाडी तालुक्यात मळगाव येथे असणाऱ्या रेल्वेस्थानक परिसरात मोठमोठे कचऱ्याचे ढीग दिसतात. त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून आणि प्रवाशांकडून हा कचरा टाकण्यात येतो. त्यात अन्नपदार्थांसह प्लास्टिक कापड आदी कचऱ्याचा समावेश आहे. हे अन्नपदार्थ कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी मळगाव ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले असून ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
.................
80517
प्रयत्न झाले, पण...
ओल्या कचऱ्यासह प्लास्टिक पिशव्या, मिनरल वॉटर व शीतपेयाच्या बाटल्या, पाणी व अन्य पदार्थांचे बॉक्स, थर्माकोल आदी कचऱ्याचा जागोजागी ढिग जमा झाल्याचे चित्र दिसत होते. या पार्श्वभूमीवर चारही घाटात ग्रामस्थ, जागरूक संघटनांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येते; मात्र काही महिन्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. त्यामुळे लोकांची मानसिकताही बदलण्याची गरज आहे.
................
80518
वन विभागाची उदासीनता
या चारही घाटींमध्ये कचरा टाकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा भाग वन विभागाकडे येतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. घाटीत काही दिवसांतच सोलार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, कचरा फेकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असे वन विभागाकडून सांगण्यात येते; मात्र प्रत्यक्षात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. निसर्गसंपन्न घाटीत सध्या कचऱ्याचे साम्राज्य दिसते.
.................
80519
घाटातील परिसरात दुर्गंधी
घाटीत कचरा टाकण्यात आल्यामुळे तो कुजल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरते. याचा त्रास त्या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहन चालकांसह पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तेथील कचरा उचलून त्याचे विघटन करणे महत्त्वाचे आहे.
..................
कचऱ्याचे दुष्परिणाम
* कचऱ्यामुळे साथीचे तसेच इतर आजारांच्या रुग्णांत वाढ
* कचरा साठून राहिल्याने जमीन नापीक होण्याचा धोका.
* हवेचे, जमिनीचे प्रमाण वाढल्यास जैवविविधतेला धोका.
* कचरा गोळा करणाऱ्या कामगारांनी आवश्यक खबरदारी न घेतल्यास त्वचारोग
* कचऱ्यातील अविघटनशील घटक खाल्ल्याने प्राणी, पक्ष्यांचा मृत्यू
* पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित
.....................
80520
काय करायला हवे?
आपल्या रोजच्या वापरात प्लास्टिक वापर टाळणे, कचऱ्यापासून घरीच खतनिर्मिती करणे या गोष्टींचे पालन केल्यास कचराच निर्माण होणार नाही. कचरा ही सध्या मोठी समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्यात सर्वाधिक वापर प्लास्टिकचा असतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळल्यास अनेक प्रश्न सुटतील. प्रत्येकाने घरातील प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. घरात ओला कचरा आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करत खतनिर्मिती करावी. कचऱ्याचे घरच्या घरी नियोजन केल्यास आपण ‘शून्य कचरा’कडे वाटचाल करू शकतो. ‘स्वच्छ भारत’ अभियानात प्रत्येकाने भविष्यातील गरज ओळखून स्वच्छ भारतासाठी योगदान देण्याची गरज आहे. याकडे नागरिकांनी एक जबाबदारी म्हणून लक्ष द्यावे. यासाठी घरातील कचरा येता-जाताना रस्त्यावर टाकणे टाळावे.
------
80521
मानसिकता बदलाची गरज
देशात ‘स्वच्छ भारत’, तर राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान सुरू आहे. यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे; मात्र सरकार कितीही प्रयत्न करत असले तरी शहरातील नागरिकांची मानसिकता स्वच्छतेबाबत बदलणे महत्त्वाचे आहे. राज्याद्वारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे कचरा आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्याची गरज आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ हा सर्वेक्षणापुरता भाग न राहता तो सवयीचा भाग होण्याची गरज आहे.
-------
कोट
कुठल्याही वनक्षेत्रात कचरा टाकल्याने वन्यजीवांचा अधिवास नष्ट होतो. त्या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, बटल्या आणि अन्य कचरा वन्य प्राण्यांसाठी घातक आहे. त्या ठिकाणी कचरा टाकल्यामुळे वन्य प्राण्यांनी तो कचरा खाल्ल्यामुळे त्यांच्या घशात किंवा पचनसंस्थेत अडकतो आणि त्यात वन्य प्राण्यांचा मृत्यू सुद्धा होतो. आम्ही वनक्षेत्रात कोणीही कचरा टाकू नये, असे फलक लावले आहेत; मात्र तरीसुद्धा लोक कचरा टाकत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतो. कोणी कचरा टाकताना आढळल्यास जागरूक नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा. लोकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही काही बंद अवस्थेत असून ते सुरू करण्यात येणार आहेत.
- मदन क्षीरसागर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सावंतवाडी
..................
कोट
मळगाव घाटीतील कचरा टाकणाऱ्यांविरोधात योग्य ती उपाययोजना करून आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही लावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वनविभागाकडे केली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा सुद्धा करीत सुरू आहे; मात्र वन विभाग कोणत्याही हालचाली करत नसल्याचे दिसून येते. रेल्वेस्थानक परिसरातील विक्रेत्यांना तसेच हॉटेल व्यवसायिकांना कचरा टाकू नका असे ग्रामपंचायत प्रशासनाचे पत्रही दिले आहे. यावर त्यांनी कचराकुंडी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आम्ही ती मागणी पूर्ण करू शकलो नाही. कारण कचराकुंडी भरली की तो कचरा अन्य ठिकाणी टाकण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे दुकानदारांनी कचऱ्याची स्वतःच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मळगाव ग्रामपंचायत हद्दीत कोणीही कचरा टाकताना आढळल्यास तत्काळ ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधावा.
- स्नेहल जामदार, सरपंच, मळगाव
...............
कोट
सावंतवाडी शहर स्वच्छ व कचराकुंडी मुक्त असून प्रत्येक भागात कचरा गाडी जाते. शहरात ई-रिक्षांसह मोठ्या कचरा गाड्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी इतर कोणत्याही ठिकाणी कचरा न टाकता येणाऱ्या सुका आणि ओला असे विलगीकरण करून कचरा वाहनांत किंवा कुंडीत टाकावा. उघड्यावर कचरा टाकताना कोणी आढळल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शहराच्या हद्दीत प्लास्टिक कचरा जाळून प्रदूषण केल्यास त्याच्यावर पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची जबाबदारी समजून कचरा गाडीतच टाकावा. अन्य ठिकाणी कचरा टाकू नये. आठवडा बाजारादिवशी येणाऱ्या व्यापाऱ्यांन तशा सूचना केल्या आहेत.
- पांडुरंग नाटेकर, आरोग्य निरीक्षक, पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com