आनंदव्हाळमध्ये फुलली नीर फणसाची बाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदव्हाळमध्ये फुलली नीर फणसाची बाग
आनंदव्हाळमध्ये फुलली नीर फणसाची बाग

आनंदव्हाळमध्ये फुलली नीर फणसाची बाग

sakal_logo
By

80800
आनंदव्हाळ ः येथील खडकाळ जमिनीत केलेली नीर फणसाची लागवड.
80801
झाडाला लागलेले नीर फणस दाखविताना वैभव नाईक.


आनंदव्हाळमध्ये फुलली नीर फणसाची बाग

वेगळा प्रयोग ः खडकाळ जमिनीत जगवली पाच हजार झाडे

प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन वेगळी वाट आणि परिश्रमामध्ये सातत्य ठेवल्यावर काय होऊ शकते, हे तालुक्यातील आनंदव्हाळ येथील वैभव नाईक या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्यासाठी त्यांनी विलायती अर्थात नीर फणसाची लागवड करण्याचा निर्धार केला. खडकाळ जमीन असल्याने जागा मिळेल तिथे त्यांनी लागवड केली. आज पाच हजारपेक्षा जास्त झाडे त्यांच्याकडे आहेत. आता त्यांची मेहनत आणि शेती व्यवसायातील सातत्य यामुळे वर्षातून दोन वेळा विलायती फणसाचे भरघोस उत्पादन ते घेत आहेत.
गोव्यातील व्यापारी बागेत येऊन फणस घेऊन जातात. या पिकाच्या माध्यमातून त्यांना २ लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. काळाच्या ओघात नगदी आणि हंगामी पिकांवर शेतकऱ्यांचा भर आहे; पण नाईक यांनी तब्बल ७ वर्षे कोणत्याही उत्पादनाची अपेक्षा न बाळगता नीर फणसाची जोपासना केली. नियमित खत आणि सिंचनाचे त्यांनी व्यवस्थापन केले. शिवाय रासायनिक खते टाळून सेंद्रीय खतांचा वापर करून हे पीक त्यांनी जोपासले आहे. शिवाय या भागात विलायती फणसाचे पीक घेतले जात नसल्याने नाईक यांच्या या फळाला मागणी होत आहे. त्यांची ५५ फळे बाजारपेठेत विक्रीसाठी गेल्यास या बदल्यात त्यांना ५ हजार रुपये मिळतात. उन्हाळ्यात ऊर्जा, जीवनसत्व, खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात देणारे फळ म्हणून फणसाची ओळख आहे. आता बाजारात फणस फारशी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्याच्या या फळाला चांगला भाव मिळत आहे. उत्पादन कमी अन् अधिकचे दर फणसाचे उत्पादन क्वचित शेतकरी घेत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मागणी आहे. मागणीनुसार बाजारपेठेत पुरवठा होत नसल्याने अधिकचा दर त्यांना मिळत आहे.
..............
चौकट
गोव्यात मार्केट
विलायती फणसापासून ब्रेड आणि भाकरी बनवली जाते. गोव्यात हॉटेलसाठी मोठी मागणी आहे. या फणसात ७१ टक्के कार्बोहाइड्रेट असतात. फळ आकाराने लहान असते. अनेकजण हा फणस भाजी किंवा काप करून भाजून खातात. चव बटाट्यासारखी लागते. अर्धा ते एक किलो वजनाचे हे फळ असते. वर्षातून दोन वेळा उत्पन्न देणारे झाड असून गोव्यातील एजंट जागेवर येऊन या फणसाची खरेदी करतात. त्यामुळे दरही चांगला मिळतो. यातील काही झाडे पारंपरिक आहेत.
................
कोट
येथील शेतकरी पारंपरिक पिकांवरच भर देत आहे. त्यामुळे उत्पादनात भर पडत नाही. उलट मेहनत आणि वेळ दोन्ही वाया जाते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने असा वेगळा प्रयोग केल्यास उत्पादनात भर पडेल. शिवाय विलायतीफणसासाठी अधिकचा खर्च नसून केवळ पाणी आणि खताचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी अधिकचा कालावधी लागणार असला तरी यामधून मिळणारे उत्पादनही तसेच आहे.
- वैभव नाईक, शेतकरी