
कोकणातील फक्त 30 टक्के काजूबीवर प्रक्रिया
rat०६४०.TXT
( पान ३ मेन )
कोकणातील ३० टक्के काजू बीयांवर प्रक्रिया
भांडवलाचा अभाव; १ लाख ८० हजार मेट्रिक टन उत्पादन
रत्नागिरी, ता. ६ ः आर्थिक पाठबळ नसल्यामुळे कोकणातील १ लाख ८१ मेट्रिक टन उत्पादनापैकी ७० टक्के काजू बी प्रक्रियेसाठी परराज्यात पाठवली जाते. भांडवलाअभावी कोकणातील कारखानदारांना काजू बी साठवण करता येत नाही. यामध्ये बँकांचे उदासीन धोरण आहे. यासाठी प्रक्रियादारांसाठी केरळच्या धर्तीवर धोरण बनवणे आवश्यक आहे, अशी मागणी काजू प्रक्रियाधारकांकडून करण्यात आली आहे.
काजू प्रक्रियाधारक संघाचे अध्यक्ष विवेक बारगीर, उपाध्यक्ष प्रताप पवार, सचिव संदेश पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना कोकणातील काजू व्यवसायाची माहिती दिली. काजू उद्योगातून सुमारे ३ हजार कोटीहून अधिक उलाढाल होते. केरळमध्ये काजू उद्योग घराघरात आहेत. शंभर किलो प्रक्रिया करणाऱ्या काजू उद्योगातून सहा महिलांना रोजगार मिळतो. कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे; परंतु येथील उत्पादित केली जाणारी काजू बी परराज्यात प्रक्रियेसाठी पाठवली जाते. गावागावात बी संकलित केली जाते; पण व्यावसायिक ती विकत घेऊन परराज्यातील कंपन्यांना देतात. स्थानिक प्रक्रियादारांची काजू बी विकत घेण्याची आर्थिक क्षमता कमी आहे. त्यामुळे १ लाख ८१ हजार मेट्रिक टन काजू बी उत्पादनापैकी अवघी ३० टक्केच बीवर कोकणातील कारखान्यात प्रक्रिया केली जाते. बँकांच्या उदासीन धोरणामुळे कर्ज उपलब्ध होत नाही. यासाठी राज्य शासनाने धोरण ठरवले तरच येथील उद्योग वाढतील. सध्या महाराष्ट्रात विविध प्रकारचे मोठे उद्योग आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत तसेच प्रयत्न काजू बीवरील प्रक्रिया उद्योगांसारख्या शाश्वत रोजगार देणाऱ्या कारखान्यांसाठी केले तर काजू उद्योगाला चांगले दिवस येतील. त्यासाठी काजू कारखाने जगवा हे धोरण अवलंबावे लागणार आहे. कोकणातील काजूची गुणवत्ता चांगली असल्यामुळे जगभरातून मागणी आहे. त्या दृष्टीने शासनाने नियोजन करण्याची मागणी संघटनेकडून केली आहे.
--
पूर्ण सुकलेली काजू बी कमी
गावागावातून गोळा करण्यात येणारी काजू बी पूर्णतः सुकलेली नसते. त्यामुळे दर्जा घसरतो आणि किलोचा दरही शेतकऱ्यांना पाच ते दहा रुपयांनी कमी मिळतो. त्यासाठी फेरीवाल्यांना काजू बी देताना शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.
---
ओला काजूगर टिकवून ठेवण्यावर भर द्या
गेल्या काही दिवसात ओले काजूगर विक्री व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. हॉटेल उद्योगात याचे महत्व लक्षात घेऊन ओली काजू बी वर्षभर वापरण्यास मिळावी यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. हा काजू सहा महिन्याहून अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी अभ्यास झाला तर शेतकऱ्याला अधिक नफा मिळवता येईल, असे बारगीर यांनी सांगितले.
दृष्टीक्षेपात...
* बँकांचे उदासीन धोरण
* केरळच्या धर्तीवर पॉलिसी गरजेची
* प्रक्रिया उद्योगांची संख्या माफक
* काजू बी साठण्याची क्षमता कमी