
बागायतदार, प्रक्रियाधारकांना काजू परिषदेतून उभारी
rat६४५TXT
( पान ३ साठी, अॅंकर)
बागायतदार, प्रक्रियाधारकांना काजू परिषदेतून उभारी
काजू उत्पादक संघ ; पाचशेहून अधिक प्रक्रियादारांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः काजू प्रक्रियाधारक संघाच्या माध्यमातून ११ आणि १२ फेब्रुवारीला राज्यस्तरीय परिषदेमधून काजू उत्पादक शेतकरी आणि काजू प्रक्रियाधारकांना उभारी मिळावी अशा कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला राज्यातून अनेक शेतकरी, काजू व्यावसायिक, काजू व्यापारी, यंत्रसामग्री तयार करणारे कारखानदार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विवेक बारगीर यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला काजू संघाचे उपाध्यक्ष प्रताप पवार, सचिव संदेश पेडणेकर, मुकेश देसाई, संदेश दळवी उपस्थित होते. ही परिषद रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीमध्ये सी ५८ दळवी कॅश्यू प्रक्रिया कंपाउंडमध्ये होणार आहे. या परिषदेत काजू उत्पादक शेतकऱ्यांकरिता लागवड, नियोजन, अर्थकारण, बाजारभाव तसेच काजू उद्योजकांकारिता अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन, व्यवस्थापन, अर्थकारण, काजू बी संकलन, बाजारभाव, समस्या यावर मार्गदर्शन आणि चर्चेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर काजूक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. या वेळी कोकणातील पाचशेहून अधिक काजू प्रक्रियादार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाकरिता पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, उद्योगपती किरण सामंत उपस्थित राहणार आहेत. यंत्रसामग्रीचे प्रदर्शनही भरवले जाणार आहे.
गेली पाच वर्ष जिल्हा काजू प्रक्रियाधारक संघ आणि महाराष्ट्र काजू संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आजारी काजू उद्योगाला उभारी मिळण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. काजू बीचे संकलन व्हावे, काजू कारखानदारांना वर्षभर काजू बी पुरवठा व्हावा याकरिता काजू बोर्डामार्फत तरतूद व्हावी अशा विविध मागण्या संघटनेने सरकार दरबारी मांडल्या आहेत. त्याची दखल घेऊन शासनाने १ हजार १७५ कोटीची तरतूद काजूसाठी केली आहे. त्याबाबत धोरण ठरवत असताना काजू लागवडीबरोबरच काजू बी प्रक्रियाधारकांचा विचार केला पाहिजे. रत्नागिरीत होत असलेल्या काजू परिषदेच्या निमित्ताने प्रक्रियादारांची व्यथा शासनाकडे मांडली जाईल.
----
बँकांच्या जाचक अटी
कोकणातील काजूचे ब्रॅंडिंग करणे, प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न, काजू बोंडे प्रक्रिया उद्योगाविषयी माधव महाजन करणार आहेत. नोकरीमागे न धावता ५ लाख रुपयात उद्योग सुरू करता येईल. बँकांच्या जाचक अटी यावर साधकबाधक चर्चा करून शासनदरबारी मांडल्या जाणार आहेत, असे बारगीर यांनी सांगितले.