
प्रतिष्ठेसाठी वाढतायत आत्मसंरक्षण शस्त्रपरवाने
प्रतिष्ठेसाठी वाढताहेत आत्मसंरक्षण शस्त्रपरवाने
वर्षात नवीन १४ परवाने; शेती संरक्षणासाठी केवळ १ परवाना
चौकट
दृष्टिक्षेपात...
* शेती संरक्षण - ३,४२६
* आत्मसंरक्षण - १,३५३
* स्पोर्ट -१९
* एकूण परवाने ४ हजार ७९८
राजेश शेळकेः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः आत्मसंरक्षणासाठी परवानाधारक शस्त्र बाळगणे आता प्रतिष्ठेचे बनले आहे. जिल्हा शांतताप्रिय असला तरी आत्मसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्मसंरक्षणाच्या नावाखाली शस्त्राचा गैरवापर केल्याचे प्रमाण अल्पच आहे. तरी जिल्ह्यात जानेवारी २०२१-२२ मध्ये १४ नवीन आत्मसंरक्षणासाठीचे शस्त्रपरवाने दिले आहेत. हे परवाने देण्याचे प्रमाण फार कमी असले तरी यावर्षी वाढले आहे. शेती संरक्षणासाठी केवळ १ परवाना तर स्पोर्टसाठीही १ परवाना दिण्यात आला आहे. एकूण शस्त्रपरवान्यांची संख्या ४ हजार ७९८ एवढी आहे.
काहीवेळा व्यक्तीला पूर्ववैमनस्यातून जीवाला धोका आहे, असे वाटत असते. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागितला जातो. राजकीय हेवेदाव्यातूनही काहींना परवाना हवा असतो. काही व्यावसायिकांना समव्यावसायिकांकडून धोका वाटतो, धनवान लोक, राजयकीय, काहींना मालमत्तेला धोका असल्याचे वाटते. त्यामुळे या व्यक्ती आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागू शकतात; मात्र, शस्त्र परवाना देताना त्याचा गैरवापर होण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला अधिक खबरदारी घेऊन परवाने दिले जातात अन्यथा हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फेटाळले जात होते.
सध्या परवाने अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. परवानाधारक असलेल्या मयत व्यक्ती, नूतनीकरण न केलेले अशांचे परवाने रद्द करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर नवीन परवाना देताना पोलिस यंत्रणेकडूनही काटेकोर पडताळणी केली जात आहे. निवडणुका सर्वच राजकीय पक्षांच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या असतात. अशावेळी राजकीय वैमनस्यातून शस्त्राचा वापर होण्याचा धोका राजकीय कार्यकर्त्यांकडून असतो. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुका जाहीर होताच परवानधारकांना शस्त्रे प्रशासनाकडे जमा करावी लागतात. यापूर्वी आत्मसंरक्षण परवाना देण्याचे प्रमाण अगदी पाच ते दहा टक्केच होते. गेल्या वर्षी मात्र त्यामध्ये वाढ झाली आहे. फक्त आत्मसंरक्षणाचेच १४ परवाने प्रशासनाने दिले आहेत तर शेतीसंरक्षणासाठी केवळ १ परवाना दिला आहे. स्पोर्टमॅनसाठीही शस्त्रपरवाना अनिवार्य आहे. त्यासाठी शूटिंग स्पर्धा खेळल्याचे सर्टिफिकेट आवश्यक आहे. स्पोर्टसाठी गेल्या वर्षी १ परवाना दिला आहे. जिल्ह्यात असे १९ परवाने आहेत.
---------------
चौकट-
...असा काढला जातो परवाना
परवाना काढताना कुटुंबातील सर्व सदस्यांचे यासाठी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्याचप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र, पोलिस पाटील, तलाठी यांचा दाखला, पोलिस यंत्रणेकडून गुन्ह्यांची पडताळणी होते. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सुनावणीनंतरच परवाना दिला जातो.
-----------
चौकट
रत्नागिरीत सर्वाधिक, गुहागरात सर्वात कमी
रत्नागिरी हे तालुका आणि जिल्ह्याचेही मुख्य ठिकाण असल्याने राजकीय, बडे व्यावसायिक, धनवान व्यक्ती यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात ५१३ परवानाधारक आहेत. गुहागर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४३ तसेच लांजा आणि मंडणगड तालुक्यातही लोकसंख्या कमी असल्याने या दोन्ही तालुक्यांत ४८ शस्त्र परवानाधारक आहेत. परवान्यांचे नूतनीकरण सुरू असल्याने आकडा कमी जास्त होण्याची शक्यता आहे.