
एसटीचा दिव्याखाली अंधार
एसटीचा दिव्याखाली अंधार
मुंबई : एसटी महामंडळ मुख्यालयाच्या सुरक्षा भिंतीला लागूनच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आपले बुकिंग केंद्र थाटात सुरू केले आहे. धक्कादायक म्हणजे रोज कार्यालयात ये- जा करणारे मुंबई सेंट्रल आगाराच्या डेपो मॅनेजर वर्षा एवतकर आणि मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी सोमनाथ तिकोटकर यांना याबद्दल माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले. एसटी महामंडळाची मालमत्ता असलेल्या ठिकाणापासून २०० मीटरपर्यंत नो पार्किंग झोन असतो. त्या परिसरात कोणत्याही खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट आरक्षण केंद्र किंवा वाहतूक करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे; मात्र या सूचनांच्या अंमलबजावनीसाठी खुद्द एसटी महामंडळ प्रशासनच अपयशी ठरत आहे. गेल्या तीन वर्षांत एसटीचे उत्पन्न झपाट्याने घटले आहे. विशेषतः अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई सुरू असल्यास अचानक एसटीच्या उत्पन्नात वाढ होते. मात्र, कारवाई बंद झाल्यावर उत्पन्नात पुन्हा घट होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाच्या मुख्यालयाला लागून असलेल्या मुंबई सेंट्रल डेपो आणि मुख्यालयाच्या सुरक्षा भिंतीला लागूनच खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आपला तिकीट बुकिंगची कार्यालये थाटली आहेत, ज्याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
---
कर्करुग्णांच्या जेवणासाठी संस्थांचा पुढाकार
मुंबई : परळच्या टाटा रुग्णालयात कर्करोगावरील उपचारांसाठी संपूर्ण देशभरातून रुग्ण दाखल होतात. अनेकदा रुग्णांसह नातेवाईक परिसरातील फुटपाथवर दिसतात. उपचार पूर्ण होईपर्यंत ते महिनोंमहिने आपल्या संसारासह राहतात. रुग्णाला पोषक आहार मिळावा, यासाठी अनेक नातेवाईकांकडे पैसेदेखील नसतात. हीच समस्या कमी व्हावी आणि किमान रुग्णाला तरी दोन वेळचा पोषक आहार मिळावा, यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. रुग्णालयाच्या परिसरात काही ठराविक अंतरावर या संस्था कर्करोगग्रस्तांना दोन वेळचे मोफत आणि पोषक आहार देतात. शिवाय, त्यांची राहण्याची सोयही करतात. गेल्या नऊ वर्षांपासून अन्नदाता सुखी भव माणुसकीची ऊब या संस्थेचे संस्थापक जय होलमुखे हे कर्करुग्णांना मोफत एक वेळचे जेवण देतात. त्यांनी आईच्या मदतीने पहिल्यांदा छोटे-छोटे डबे रुग्णांसाठी पुरवले होते; मात्र मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याचे कळल्यानंतर त्याने स्वत:च्या हिमतीवर कर्करुग्णांसाठी मदत करण्याचा धाडसी निर्णय घेतला. याचेच रूपांतर सामाजिक कार्यात झाले आणि २०१३ पासून एक वेळचे मोफत अन्नदान या संस्थेमार्फत दिले जाते. दररोज अडीचशे लोकांना अन्न पुरवले जाते.
---
मानसिक आजारांच्या रुग्णांचा शोध
मुंबई : मुंबईतील मानसिक आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या नायर धर्मादाय रुग्णालयाच्या वतीने विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारे निवडलेल्या तीन हजार ६०० व्यक्तींची घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. या माध्यमातून मानसिक आजारांचे प्रमाण ठरवत मानसोपचार यंत्रणेची उभारणी करणे आणि त्याचे बळकटी करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण सन २०१५-१६ मध्ये करण्यात आले. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान या संस्थेची मध्यवर्ती समन्वय केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती. या सर्वेक्षणात देशातील १२ राज्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणानुसार मनोविकारांचे आजीवन प्रमाण शहरी भागात १४ टक्के, तर ग्रामीण भागात १० टक्के आहे. त्यामध्ये चिंता (नर्व्हस्), नैराश्य (मूड डिसऑर्डर), अति मद्यसेवनाचा समावेश होता. यातील बहुतेक आजारांसाठी उपचारांची गरज आणि प्रत्यक्ष उपलब्धता यातील तफावत ६० टक्क्यांहून अधिक आढळली.
---
विद्यार्थ्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञाची सेवा
मुंबई : पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर दंत रुग्णालयात ८९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सर्व विद्यार्थ्यांच्या आणि काही प्राध्यापकांच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली गरज आणि चिंताग्रस्त झटके, नैराश्याची वाढती संख्या लक्षात घेता पूर्णवेळ वैद्यकीय मानसोपरचारतज्ज्ञांची सेवा दिली जात आहे. पाच वर्षांपूर्वी रुग्णालयात आत्महत्येचे प्रकरण घडले होते. त्यानंतर, मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती व्हावी यासाठी सातत्त्याने पाठपुरावा केला गेला. पण, आता फक्त दंत महाविद्यालयासाठी पद मंजूर होण्यासाठी ४ वर्षे लागली असे नायर दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता व वैद्यकीय संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले. शासकीय दंत रुग्णालयांपैकी नायर दंत रुग्णालयाने पहिल्यांदाच हा पुढाकार घेतला असून प्राधान्याने मानसिक आरोग्यावर लक्ष देणारे नायर दंत रुग्णालय पहिले रुग्णालय ठरले आहे. हे मानसोपचारतज्ज्ञ रुग्णांना समुपदेशन करणार नसून विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणार आहे. रुग्णालय प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये भीती, नैराश्य आणि शैक्षणिक तडजोडी यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
-------
सीबीएसई बोर्ड सुरू करण्याची मागणी
घाटकोपर ः मुंबई महापालिकेच्या अंतर्गत शाळांपैकी १३ शाळांना सीबीएसई बोर्ड मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्ड मान्यता प्राप्त शाळांमधून सामान्य वर्गातील मुले देखील शिक्षण घेत असल्याने आनंद व्यक्त होत आहे. त्याच प्रमाणे घाटकोपर पश्चिम मधील भटवाडी, खंडोबा टेकडी या भागातील शाळेत सीबीएसई बोर्ड सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. येथील बहुतांश भाग हा झोपडपट्टी वर्गातील आहे. भटवाडी मधील स. गो. बर्वेनगर शाळा क्रमांक तीनमध्ये सीबीएसई बोर्डला मान्यता दिल्यास येथील गोरगरीब, सामान्य मुले शिक्षण घेऊ शकतील, असे निवेदन घाटकोपर मधील सामाजिक कार्यकर्ते वैभव आवटे पाटील यांनी महापालिका शिक्षणाधिकारी यांना दिले आहे. हे निवेदन मान्य झाल्यास विद्यार्थी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.
---