
सावंतवाडीत ''मिशन रेबीज'' सुरु
swt९१५.jpg
81549
सोनुर्लीः येथे कुत्र्यांना लसीकरण करताना रेबीज मिशन संस्थेचे कर्मचारी.
सावंतवाडीत ‘मिशन रेबीज’ सुरु
वेंगुर्लेत मोहिम फत्तेः दोडामार्गमध्येही होणार श्वानांचे लसीकरण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः ''मिशन रेबीज'' या संस्थेकडून कुत्र्यांची लसीकरण मोहिम सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तीन तालुक्यांमध्ये हाती घेण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मान्यतेने ही मोहीम सध्या सावंतवाडी तालुक्यात सुरू आहे. आतापर्यंत वेंगुर्ले तालुका पूर्ण झाला असून सावंतवाडीनंतर दोडामार्ग तालुका पुर्ण करण्यात येणार असल्याचे मिशन रेबीज संस्थेकडून सांगण्यात आले.
गोवा राज्यात दरवर्षी रेबीज मुक्तसाठी आवश्यक असलेले लसीकरण राबविले जाते. गोवा शासन दरवर्षी यासाठी लाखो रुपये खर्च करते. परंतु, लाखो रुपये खर्च करून सुद्धा शंभर टक्के रिझल्ट मिळत नसल्याने शासनाने यामागचे कारण शोधले. गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्र राज्यातील गावामधून कुत्रे गोवा राज्यात स्थलांतरित होत असल्याने आणि या कुत्र्यांना लसीकरण न केल्याने गोव्यात शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही. एकूणच हे कारण समोर आल्यानंतर मिशन रेबीज संस्थेकडून महाराष्ट्र शासनाकडे गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या वेंगुर्ले, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात कुत्र्यांचे लसीकरण करण्यासाठी परवानगी मागितली. सुरवातीला काहीशा नकारात्मक प्रतिसादानंतर महाराष्ट्र शासनाने ही परवानगी दिली. परवानगी मिळाल्यानंतर मिशन रेबीज या संस्थेने गोव्याच्या सीमेवरील गावात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. गेले काही महिने ही मोहीम संस्थेचे कर्मचारी राबवित आहे. आतापर्यंत वेंगुर्ले तालुका पूर्णपणे लसीकरणमय झाला असून घरोघरी कुत्र्यांना रेबीज लस देण्यात आली आहे. सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यात ही मोहीम सुरु झाली आहे. सुरवातीच्या टप्प्यात सावंतवाडी शहर व टप्प्याटप्प्याने गावागावात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मिशन रेबीज या संस्थेचे कर्मचारी कुत्र्यांचे लसीकरण करत आहेत. सद्यस्थितीत ६० टक्के सावंतवाडी तालुका पूर्ण करण्यात आला आहे. उर्वरित भागातील लसीकरण पूर्ण केल्यानंतर दोडामार्ग तालुक्यामध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
चौकट
वर्षभरात पुन्हा होणार लसीकरण
ज्या कुत्र्यांना लसीकरण केले, अशा कुत्र्यांना मार्किंग करून त्या घरातील घरमालकांची नाव नोंदणी व कुत्र्याची नोंदणी करून आवश्यक कार्ड ते घरमालकांकडे सुपूर्त करण्यात येत आहे. तब्बल वर्षभरानंतर पुन्हा एकदा कुत्र्यांना लसीकरण केले जाणार आहे. परंतु, महाराष्ट्र शासनाकडून तशा प्रकारची परवानगी मिळणे आवश्यक आहे, असे संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.