रामेश्वर-छत्रपतींचा जिव्हाळा जपणारा सोहळा

रामेश्वर-छत्रपतींचा जिव्हाळा जपणारा सोहळा

Published on

डोके - ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा

swt९११.jpg
L८१५४५
कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर वारेसूत्र, तरंगासह भेटीसाठी रवाना होतानाचे संग्रहित छायाचित्र.
swt९१२.jpg
८१५४६
श्रीदेव रामेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज भेट सोहळ्यातील एक क्षण.

रामेश्वर-छत्रपतींचा जिव्हाळा जपणारा सोहळा
- प्रशांत हिंदळेकर, मालवण

लीड
कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज व आई भवानी माता यांचा ऐतिहासिक त्रैवार्षिक पारंपरिक भेट सोहळा आज शुक्रवारी होत आहे. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली असून कांदळगाव ते मालवण या मार्गावरील भाविक देवतेच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. या अभूतपूर्व भेट सोहळ्याच्या निमित्ताने...
...............
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज, डच, फिरंगी यांना शह देण्यासाठी आपले आरमार मजबूत हवे, असा विचार घेऊन अलिबाग येथील मुरुड जंजिरा किल्ल्यावर एकदा नव्हे, तर पाच वेळा स्वाऱ्या केल्या. एक स्वारी तर स्वतः छत्रपतींनी केली. असे असतानाही छत्रपतींना अपयश आले. किनारपट्टीवर आपले आरमार नसल्याचे शल्य छत्रपतींना होते आणि म्हणूनच पश्चिम किनारपट्टीवर शिवाजी महाराजांनी मोहीम आखली. या मोहिमेत त्यांना मालवणच्या समुद्रात कुरटे बेट दृष्टीस पडले. छत्रपतींनी या बेटावर ''किल्ले सिंधुदुर्ग'' उभारायचे ठरविले. ४८ एकर जमिनीवर किल्ला बांधण्याचे ठरले. ‘मोरयाचा धोंडा’ या ठिकाणी भूमिपूजनही पार पडले. १६६४ मध्ये स्वराज्याच्या आरमाराचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीची सुरुवात केली.
किल्ल्याचे बांधकाम उभे राहत होते; मात्र पश्चिमेकडचा तट काही केल्या उभा राहत नव्हता. एके रात्री छत्रपतींना दृष्टांत झाला. त्यानुसार छत्रपती कांदळगावच्या श्री देव रामेश्वराच्या भेटीस गेले. त्या ठिकाणी श्री देव रामेश्वरांची पूजाअर्चा करून छत्रपतींनी तेथील शिवपिंडीवर एक छोटीशी घुमटी बांधली आणि आठवण म्हणून त्या घुमटीसमोर वडाचे एक छोटेसे रोपटे लावले. याच भेटीदरम्यान छत्रपतींनी दर तीन वर्षांनी श्री देव रामेश्वराला शक्तिमान चैतन्य किल्ले सिंधुदुर्गावर भेटीसाठी यावे, असे सांगितले. रामेश्वरानेही आनंदाने कबूल केले. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्गचा पश्चिमेकडचा तट पूर्णत्वास जाऊन हिंदवी स्वराज्याची सागरी राजधानी किल्ले सिंधुदुर्ग उभा राहिला. छत्रपती आणि श्री देव रामेश्वर यांच्या या जीवा-शिवाच्या भेटीचा सिलसिला इतिहास काळापासून सुरू झाला आणि आजही तसाच तो सुरू आहे.
प्रियजनांच्या भेटीचा आनंद हा अवर्णनीय असतो, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदळगावचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर यांच्या दर तीन वर्षांनी होणाऱ्या भेटीचा हा अनुपम सोहळा डोळ्यांचे पारणे फिटणारा असाच होतो. इतिहास काळापासून श्री देव रामेश्वर व छत्रपतींची ही भेट सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात म्हणजेच २६ वर्षे काही अडचणींमुळे ही प्रथा बंद होती. २००५ साली ही प्रथा पुन्हा सुरू झाली.
सर्वसाधारणपणे महिनाभर अगोदर श्री देव रामेश्वर आणि छत्रपती महाराज यांच्या या भेटीचा कार्यक्रम जाहीर होतो. आठवडाभर अगोदर कांदळगावात संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. कांदळगावचा रामेश्वर ज्या मार्गाने छत्रपतींच्या भेटीस जाणार आहे, त्या मार्गावर कमानी, गुढ्या उभारल्या जातात. स्वागताचे ठिकठिकाणी बॅनरही लावले जातात. रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात. ज्या दिवशी या भेटीचा कार्यक्रम होणार आहे, त्या दिवशी पहाटेपासूनच कांदळगावच्या मंदिर परिसरात लोकांची लगबग सुरू होते.
सूर्य जसजसावर वर चढू लागतो, तसतसा कांदळगावचा परिसर हजारो भाविकांच्या उपस्थितीने गजबजून जातो. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रामेश्वराला मानकरी कौल लावून परवानगी घेतात आणि श्री देव रामेश्वर देव देवतांच्या तरंगासह पालखीत बसून छत्रपतींच्या भेटीसाठी आपले राऊळ सोडतो.
ढोल-ताश्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत रामेश्वर हा किल्ले सिंधुदुर्गवर जाण्यासाठी रवाना होतो. उपस्थितांमध्ये उत्साहाची एकच लाट पसरते. कांदळगावातून आपल्या रयतेसमवेत निघालेला रामेश्वर ओझरमार्गे कोळंब येथे मालवणच्या वेशीवर आल्यानंतर मालवणमधील व्यापारी व नागरिक देव रामेश्वराचे स्वागत करतात. याचवेळी श्री देव रामेश्वराचा भाऊ गांगो हा कोळंबचे देवस्थान खापरेश्वराची भेट घेतो आणि तद्नंतर अपूर्व उत्साहात मालवणच्या मार्गक्रमणेसाठी पालखीत बसून श्री देव रामेश्वर पुढे चाल धरतो.
शहरातील धुरीवाडा, फोवकांडा पिंपळ मार्गे बंदर जेटीवर श्री देव आल्यानंतर तेथील होडी चालक, मालक श्री देव रामेश्वराचे स्वागत करतात. त्यानंतर जोशी मांड येथे श्री देव रामेश्वर पारंपरिक पद्धतीने श्री देव महापुरुषाची भेट घेतो आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुन्हा एकदा श्री देव रामेश्वर हा आपल्या लवाजम्यासह रयतेस सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीतून जाण्यासाठी प्रस्थान करतो. किल्ले सिंधुदुर्गवर श्री देव रामेश्वराचे आगमन झाल्यानंतर किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच कोंबडा व बकरा सोडण्यात येतो. हा धार्मिक विधी पार पडल्यानंतर श्री देव रामेश्वर हा शिवराजेश्वर मंदिरात प्रवेश करतो आणि याचवेळी श्री देव रामेश्वर आणि छत्रपती यांची भेट होते. यावेळी श्री देव रामेश्वर आणि छत्रपती यांचा जयजयकार केला जातो. रितीरिवाजानुसार श्री रामेश्वर हा छत्रपती जिरेटोप पागोटे, कंठहार प्रदान करतो, तर छत्रपती हे श्री देव रामेश्वराला श्रीफळ व जोड पागोटे देतात. हा ऐतिहासिक नजराणा भेटीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर श्री देव रामेश्वर आपल्या तरंगासह भवानी मातेचे दर्शन घेतो.

चौकट
तीन वर्षांच्या भेटीची आस !
हा अनुपम सोहळा पार पडल्यानंतर श्री देव रामेश्वर पुन्हा परतीच्या प्रवासास निघतो. या परतीच्या प्रवासात पद्मगड, श्री देव दांडेश्वर या ठिकाणी भेट देतो. तद्नंतर सायंकाळच्या सुमारास श्री देव रामेश्वर हा मालवण मेढा राजकोट येथील मौनिनाथ मंदिर येथे वास्तव्याला येतो. दुसऱ्या दिवशी मेढ्यातील कुशेवाड्यास भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर श्री देव रामेश्वर बाजारपेठ येथील रामेश्वर मांड येथे दाखल होतो. महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर श्री देव रामेश्वर कांदळगावाकडे आपल्या राऊळात जाण्यासाठी निघतो. दोन-अडीच तासांच्या परतीच्या प्रवासात आशीर्वाद देत श्री देव रामेश्वर आपल्या राऊळात विराजमान होतो, तो पुन्हा तीन वर्षांच्या भेटीची आस घेऊनच !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.