मालवणात आजपासून त्रैवार्षिक भेट सोहळा

मालवणात आजपासून त्रैवार्षिक भेट सोहळा

Published on

मालवणात आजपासून त्रैवार्षिक भेट सोहळा
दोन दिवस आयोजन ः विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह छत्रपती शिवाजी महाराज व कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक, पारंपरिक, त्रैवार्षिक भेट सोहळा किल्ले सिंधुदुर्ग येथे १० ते ११ फेब्रुवारीला होत आहे. उद्या (ता. १०) सकाळी ९ वाजता श्री देव रामेश्वर मानकरी, गावकरी यांच्यासह रयतेसमवेत लवाजम्यासह किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवराय व आदिमाया कुलस्वामिनी भवानी मातेच्या त्रैवार्षिक भेटीसाठी जाणार आहे. या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पारंपरिक शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उदय राणे आणि सेक्रेटरी संतोष परब यांनी केले आहे.
उद्या सकाळी ८ वाजता कांदळगाव येथून श्री देव रामेश्वराचे मालवणकडे प्रयाण होणार आहे. दुपारी १२ वाजता जोशी मांड मेढा-मालवण येथे प्रस्थान व उपस्थितांना अल्पोपहार असेल. त्यानंतर समुद्र मार्गे किल्ले सिंधुदुर्ग येथे श्री देव रामेश्वर छत्रपती शिवाजी महाराज व आदिमाया आई श्री भवानी देवी माता यांचा ऐतिहासिक भेट सोहळा होईल. सायंकाळी ४ वाजता किल्ले सिंधुदुर्गवरून परतीचा प्रवास सुरू होईल. यात दांडेश्वर मंदिर दांडी-मालवण येथे आगमन होईल. सर्व भाविकांना चहापाणी आणि शीतपेय दांडी गावातर्फे दिली जाईल. त्यानंतर तेथून मौनीनाथ मंदिराकडे प्रयाण होईल. रात्री मेढा येथील मौनीनाथ मंदिर येथे मुक्काम असेल. मौनीनाथ मंदिर व कुशेवाडा येथे सर्व भाविकांसाठी महाप्रसाद असेल.
शनिवारी (ता. ११) सकाळी ८ वाजता मौनीनाथ मंदिरामध्ये पारंपरिक विधी व पूजाअर्चा करून जमलेल्या सर्व भाविकांना आशिर्वचन देऊन श्री देव रामेश्वर आणि इतर सर्व वारेसूत्र आणि पालखी कुशेवाडा येथे मार्गस्थ होणार आहे. सकाळी ९ वाजता मेढा-कुशेवाडा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबीयांना पारंपरिक भेट व आशिर्वचन होईल. १० वाजता रामेश्वर मांड येथे आगमन होईल. दुपारी १२ वाजता रामेश्वर मांड मंडळाच्या वतीने उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी आणि भंडारी हायस्कूलच्या पाठीमागील हॉलमध्ये सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप होईल. सायंकाळी ४ वाजता रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे स्वगृही परतीचा प्रवास होईल. रात्री १० वाजता रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे हा सोहळा विसर्जित होईल.

चौकट
मोफत होड्यांची व्यवस्था
या सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जल पर्यटन संस्था, रामचंद्र महादेव आचरेकर यांच्यावतीने तसेच दांडीगाव यांच्यावतीने किल्ल्यावर जाण्यासाठी मोफत होड्यांची व्यवस्था केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.