
संगमेश्वर-अंत्रवली-चिखली रस्त्यासाठी आंदोलन
अंत्रवली-चिखली रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थ आक्रमक ः वर्कऑर्डर निघूनही काम ठप्प
संगमेश्वर, ता. १२ ः नजीकच्या अंत्रवली ते चिखली या रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. गेली दोन वर्षे या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून वर्क ऑर्डरही निघाली असल्याचे समजते. मात्र अजतागायात या कामाला सुरवात झाली नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या एका बैठकीत आठ दिवसात या कामाला सुरवात न झाल्यास लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
अंत्रवली फाटा ते चिखली हा रस्ता गेली तीन वर्षांपासून खराब झाला असून यावरून वाहतूक करणे जीवघेणे झाले आहे. ग्रामस्थांमधून याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचेकडे दाद मागूनही दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया होऊन हे काम एका ठेकेदारास देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र आजतागायत कामाला सुरवात झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या कामाची निविदा ही जुनी असल्याने सध्याचे दर व पूर्वीचे दर याचा ताळमेळ बसत नसल्याने या निविदा रकमेत हे काम पूर्ण होत नसल्याने हे काम रखडले असल्याची चर्चा आहे. नुकतीच हेदली, आंत्रवली, तांबेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संतप्त ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम आठ दिवसात सुरू न झाल्यास लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.