रत्नागिरी- देवाचे गोठणे येथे दुर्मिळ काळ्या करकोच्याचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- देवाचे गोठणे येथे दुर्मिळ काळ्या करकोच्याचे दर्शन
रत्नागिरी- देवाचे गोठणे येथे दुर्मिळ काळ्या करकोच्याचे दर्शन

रत्नागिरी- देवाचे गोठणे येथे दुर्मिळ काळ्या करकोच्याचे दर्शन

sakal_logo
By

(टुडे पान 1फ्लायर)

फोटो ओळी
-rat13p18.jpg-KOP23L82445 काळा करकोचा.
-------------
देवाचे गोठणेत दुर्मिळ काळ्या करकोच्याचे दर्शन

पाण्याजवळील उंच झाडावर घरटे ; थंडीच्या दिवसात आफ्रिका, भारतीय उपखंडात स्थलांतर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे गावातील देऊळ वाडी परिसरातील रावणाचा सडा आहे. या सड्यावरील कातळ खोद चित्र आणि परिसरातील नैसर्गिक आश्चर्य जांभ्या दगडातील चुंबकीय विस्थापन हे आता तसे सर्व परिचित. परंतु याच परिसरात कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात दुर्मिळ असणाऱ्या काळ्या करकोच्याचे दर्शन झाल्याची माहिती पक्षीमित्र व कातळ खोद चित्रांचे संशोधक सुधीर रिसबुड यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘तांबड्या रंगाचे लांब सडक पाय, लांब मान, तांबड्या रंगाची लांब चोच. छातीच्या खालच्या भागापासून शेपटीच्या टोकापर्यंत पांढरा शुभ्र रंग सोडला तर शरीराचा उरलेला सर्व काळा त्याला हिरवट झाक असलेले सुमारे तीन फूट उंच आकाराचा काळा करकोचा होता. पक्षी निरीक्षणाच्या गेल्या 15 वर्षांच्या कालखंडात रत्नागिरीमधील किनारपट्टीच्या प्रदेशात हे पक्षी तसे प्रथमच पाहत होतो. अर्थात त्यामुळे अधिक उत्सुकता. स्वभावाने लाजऱ्या असणाऱ्या या पक्षांना माझी चाहूल लागली आणि सुमारे ५ फूट लांब पंखाच्या पसाऱ्याचे दर्शन घडवत आकाशात भरारी घेतली. हातात कॅमेरा नसल्याने हळहळण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, जमेल तसे मोबाईलवर रेकॉर्ड शॉट घेतले.
उत्तर गोलार्धात स्पेन ते चीन परिसरातील राहणारे हे पक्षी थंडीच्या दिवसात स्थलांतर करून दक्षिण आफ्रिका आणि भारतीय उपखंडात येतात. मुख्यतः उत्तर भारतात स्थलांतरण करून येणारे हे पक्षी काहीवेळा दक्षिणेकडे विदर्भ, पुणे, अमरावती, बेळगाव याठिकाणी देखील आढळून येतात. पण कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात या पक्षांचा आढळ दुर्मिळच आहे, असे रिसबुड यांनी सांगितले. पाणथळ जागा, गवताळ जागा, शेतीचे प्रदेश, तलावांचे काठ, नदीचे किनारे येथे त्यांचा अधिवास असतो. बेडूक, मासे, कीटक, खेकडे, गोगलगायी, सरपटणारे लहान जीव यांच्यावर गुजराण करणारे हे पक्षी पाण्याच्या जवळील उंच झाडावर काटक्यांचे घरटे करतात, असे रिसबूड यांनी सांगितले.

चौकट
जैवविविधतेचे भांडार
राजापूर तालुक्यातील बारसू, धोपेश्वर, राजापूर शहर, शिवणे, गोवळ, सोलगाव, देवाचे गोठणे या गावांना कुशीत घेणाऱ्या या सड्यावर आणि परिसरात अनेक दुर्मिळ गोष्टी आढळून आल्या आहेत. एकंदरीतच हा भाग भौगोलिक विविधता आणि जैवविविधतेचे भांडार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, असे रिसबूड म्हणाले.