वामनदादांच्या लेखणीत कष्टकऱ्यांचे चित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वामनदादांच्या लेखणीत कष्टकऱ्यांचे चित्र
वामनदादांच्या लेखणीत कष्टकऱ्यांचे चित्र

वामनदादांच्या लेखणीत कष्टकऱ्यांचे चित्र

sakal_logo
By

वामनदादांच्या लेखणीत कष्टकऱ्यांचे चित्र

प्रकाश मोगले ः सावंतवाडीत जनशताब्दीनिमित्त महाचर्चा

सावंतवाडी, ता. १३ ः वामनदादा म्हणजे तमाम शाहिरांची हाक; मात्र त्यांच्यापासून सुरू झालेली शाहिरांची अवहेलना आजही कायम आहे. संतसूर्य तुकाराम महाराजांनी साडेचार हजार अभंग लिहिले. त्यात तत्कालीन समाज व्यवस्थेचा विद्रोह आणि मराठी संस्कृतीची बांधणी केली. तेच काम वामनदादांनी केले. कष्टकरी, शेतकरी, सामान्य जनतेचे चित्र त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने संत तुकोबांच्या विचारांचे वारसदार आहेत, असे वक्तव्य विचारवंत डॉ. प्रकाश मोगले यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.
सावंतवाडी शहरातील नवसरणी सभागृहात काल (ता. १२) सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने महाकवी वामनदादा कर्डक जनशताब्दी वर्षानिमित्त महाचर्चा झाली. या महाचर्चेच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. मोगले बोलत होते. यावेळी विचारमंचावर महाचर्चाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक योगीराज बागुल, बीजभाषाकार प्रा. आदिनाथ इंगोले, स्वागताध्यक्ष अनिल जाधव, कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर, सुनील हेतकर, विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर उपस्थित होते.
डॉ. मोगले म्हणाले, ‘‘महामानव डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या सावंतवाडीत येऊन आज धन्य झालो. आज आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवणारा उपाशी मरतोय, हे आंबेडकरी बांधवांचे दुर्दैव आहे. बाबासाहेबांवर १३ हजाराचे कर्ज होते. ते त्यांनी समाजासाठी घेतले होते. एक खासदार, कायदामंत्र्याच्या नावावर मरेपर्यंत कर्ज होते, यातून आजच्या काळातील राजकारणी व्यक्तींनी शिकवण घ्यावी. यातून आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आज बाबासाहेबांच्या विचारांवर गाणे लिहिणारी किती प्रामाणिक लोक आहेत? बाबासाहेबांनी जगण्याचा अधिकार दिला, म्हणून वामनदादांनी भाकरीवर गाणे कधीच लिहिले नाही. त्यांनी लेखणीवर लिहिले. त्यांच्या लेखणीतून आलेला जागतिक संघर्ष हा जगण्याचा आहे.’’
बीजभाषण करताना प्रा. इंगोले म्हणाले, ‘‘वामनदादा म्हणजे आंबेडकरी विचारांचे सांस्कृतिक विद्यापीठ होते. आंबेडकरीवादाचे सर्वोत्तम लेखन, गायन करणारे कलावंत, शास्त्रशुद्ध आंबेडकरी विचारवंत म्हणजे वामनदादा. असे असताना अनेक लेखक, कवींनी बाबासाहेब यांच्यावर आरत्या लिहिल्या, हे क्लेशदायक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान साध्या, सोप्या भाषेत लिहिणारे वामनदादा अत्यंत प्रतिभावान व प्रबोधनकार व्यक्तिमत्व होत. त्यांचा एकूण लढा हा भांडवलशाही विरोधात असल्यामुळे आजही तोच लढा आम्हाला लढावा लागतोय.’’
योगीराज बागुल म्हणाले, ‘‘वामनदादा म्हणजे कधीच न संपणारा अखंड प्रवास. संत कबीरांचे ते दुसरे रुप होय. एक अशिक्षित माणूस आपल्या अफाट प्रतिभाशक्तीने काय करू शकतो, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वामनदादा होत.’’ प्रास्ताविक सुनील हेतकर यांनी, सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार मधुकर मातोंडकर यांनी मानले. उद्‍घाटन सत्रानंतर ‘वामनदादा कर्डक यांचे महाकाव्य’ विषयावर महाचर्चा रंगली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सोमनाथ कदम होते. यावेळी प्रा. सीमा हडकर, प्रा. सिद्धार्थ तांबे यांनी अभ्यासपूर्ण भाषणे केली. त्यानंतर अध्यक्ष डॉ. कदम यांनी वामनदादांच्या साहित्य प्रवासावर भाष्य केले. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार प्रवीण बांदेकर, कवयित्री सरीता पवार यांचा सत्कार झाला. चर्चासत्राचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. प्रा. रुपेश पाटील यांनी आभार मानले.
................
चौकट
‘तुफानातले दिवे’ कवी संमेलनाने रंगत
दुपारच्या सत्रात ‘तुफानातले दिवे’ कवी संमेलन पार पडले. अध्यक्षस्थानी कवी वीरधवल परब होते. विचारपिठावर कवी डॉ. अनिल कांबळी, कवयित्री संध्या तांबे उपस्थित होत्या. कवी अरुण नाईक, सुनील कांबळे, प्रा. रुपेश पाटील, मोहन कुंभार, अनिल कांबळी, विठ्ठल कदम, सिद्धार्थ तांबे, संध्या तांबे, मनीषा जाधव, सरिता पवार, अनिल जाधव, राजेश कदम, कल्पना मलये, मधुकर मातोंडकर, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम, योगेश सकपाळ, प्रकाश तेंडुलकर, दीपक तळवडेकर, शालिनी मोहाळे, बाळकृष्ण जाधव, नीलम यादव, मनोहर परब, ऋतुजा सावंत-भोसले, दीपक पटेकर, एकनाथ कांबळे, अनिल कांबळे, मंगल नाईक, संतोष वालावलकर, गौरी डिचोलकर, किशोर वालावलकर यांनी काव्य रचना सादर केल्या.