
बॉक्स क्रिकेटमध्ये वैभववाडी पोलिसांची बाजी
82537
सिंधुदुर्गनगरी ः बॉक्स क्रिकेट स्पर्धेत विजेता वैभववाडी पोलिस ठाण्याचा संघ.
बॉक्स क्रिकेटमध्ये वैभववाडी पोलिसांची बाजी
सिंधुदुर्गनगरीतील स्पर्धा; २२ महिलांसह १७६ जणांचा सहभाग
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ : जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांना रोजच्या दैनंदिन तणावापासून काही काळ विरंगुळा मिळावा, त्यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा, एकोपा व्हावा, खिळाडू वृत्ती व कौशल्य यांना वाव मिळावा, खेळभावना निर्माण व्हावी, याकरिता सिंधुदुर्ग पोलिस दलातील पोलिस अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित अंडरआर्म बॉक्स स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत वैभववाडी पोलिस ठाणे संघ विजेता, तर मोटार परिवहन विभाग संघ उपविजेता ठरला. मानव संसाधन शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली.
पोलिस परेड मैदान येथे आयोजित स्पर्धेमध्ये २२ संघांच्या एकूण १७६ खेळाडूंनी सहभाग घेतला. प्रत्येक संघामध्ये एक याप्रमाणे २२ महिलांचाही सहभाग होता. पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग व वैभववाडी पोलिस ठाणे यांची अंतिम सामन्यासाठी निवड झाली. अंतिम सामन्यात वैभववाडी पोलिस ठाणे संघाने मोटार परिवहन विभाग संघाचा पराजय करून विजेतेपद पटकावले. तर मोटार परिवहन विभाग संघ उपविजेता ठरला. एकंदरीत दोन दिवस चाललेल्या नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता संघ वैभववाडी पोलिस ठाणे, उपविजेता संघ मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग, अंतिम सामन्याचा सामनावीर-गणेश भोवड (वैभववाडी पोलिस), मालिकावीर अभिजित तावडे (वैभववाडी पोलिस ठाणे), उत्कृष्ट गोलंदाज-भालचंद्र दाभोलकर (मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग), उत्कृष्ट फलंदाज-अमित निब्रे (मोटार परिवहन विभाग, सिंधुदुर्ग) यांना घोषित करून सर्वांना चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरविले.