
कुणकेश्वर यात्रेसाठी एसटी सज्ज
कुणकेश्वर यात्रेसाठी एसटी सज्ज
८० गाड्या ः कणकवली, विजयदुर्ग, देवगडसह मालवणमधून सेवा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ ः दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या कुणकेश्वर (ता.देवगड) येथील महाशिवरात्र यात्रेसाठी एसटी महामंडळाचे नियोजन झाले असून कणकवली, विजयदुर्ग, देवगड आणि मालवण या आगारातून ८० एसटीच्या बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावणार आहेत.
कोकणातली सर्वात मोठी महाशिवरात्र यात्रा कुणकेश्वर येथे भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंनी भाविक या यात्रेसाठी येत असतात. मुंबईसह पुण्यावरून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते. दक्षिण कोकणातील काशी अशी ओळखलेल्या अरबी समुद्राच्या तीरावरील कुणकेश्वर हे तीर्थस्थान मानले जाते. महाशिवरात्रीला सलग तीन दिवस येथे मोठी यात्रा भरते. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून भाविकांसाठी दरवर्षी नियोजन केले जाते. यंदा ८० बस गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या यात्रेसाठी मालवण आगारातून २० गाड्या धावणार आहेत. यात मालवण ते कुणकेश्वर ८ गाड्या, हिर्लेवाडी ते कुणकेश्वर १, मसुरे बांदिवडे त्रिंबक आचरातिठा कुणकेश्वर, तोंडवली वांयगणी ते कुणकेश्वर प्रत्येकी एक, आडबंदर मुणगे, हिंदळे मार्गे कुणकेश्वर ५ गाड्या, तांबळडेर्डे ते कुणकेश्वर आणि मोर्वे ते कुणकेश्वर अशा प्रत्येकी दोन गाड्या धावणार आहेत. कणकवली आगारातून २५ गाड्यांचे नियोजन केले आहे. या स्थानकातून कुणकेश्वरसाठी थेट २० गाड्या सोडण्यात येणार आहेत. फोंडा बस स्थानकातून कुणकेश्वरसाठी ४, वैभववाडी ते नांदगाव कुणकेश्वर १ बस धावणार आहे. देवगड तालुक्यातून तब्बल ३२ गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात देवगड आगार ते कुणकेश्वर १३ बस गाड्या, निरोमा आरे कुणकेश्वर, किंजवडे ते कुणकेश्वर, नारिंग्रे ते कुणकेश्वर, तेलीवाडी ताम्हाणेतर वानिवडे ते कुणकेश्वर प्रत्येकी एक गाडी, मीठमुंबरी दाभोळे पुलावरून कुणकेश्वर दोन गाड्या, नाद ओंबळ ते कुणकेश्वर, शिरवली ते कुणकेश्वर, रेंबवली साळशी चाफेड भरणी मार्गे कुणकेश्वर, मोंडतर टेंबवली ते कुणकेश्वर, वळीवंडे तोरसळे ते कुणकेश्वर प्रत्येकी एक, जामसंडे ते कुणकेश्वर तीन गाड्या, बाघतळवडे तळेबाजार ते कुणकेश्वर एक गाडी, आयनल कोळोशी ते कुणकेश्वर आणि टेंभवली तेलीवाडी कुणकेश्वर प्रत्येकी दोन अशा ३२ गाड्या धावणार आहेत. विजयदुर्ग आगारातून ३ गाड्या धावणार आहेत.
------------------
चौकट
आंगणेवाडी यात्रेतून २४ लाखाचे उत्पन्न
एसटी महामंडळाच्यावतीने यंदा आंगणेवाडी यात्रेसाठी जादा बसेसची सेवा देण्यात आली होती. अशा एसटी बस गाड्यांमधून मिळालेल्या भाविकांच्या प्रतिसादातून एसटीला तब्बल २४ लाख ४२ हजार ९०५ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. आंगणेवाडी यात्रेसाठी चार आणि पाच फेब्रुवारीसाठी या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. आंगणेवाडी यात्रेसाठी यंदा सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड, विजयदुर्ग आणि वेंगुर्ले आजारातून एकूण १३६१ गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदा ९० टक्के पेक्षा अधिक भारमान मिळाल्याने २४ लाख ४२ हजार ९०५ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.
---------
आगारनिहाय सोडलेल्या एसटी
देवगड - ३२ गाड्या
कणकवली - २५ गाड्या
मालवण- २० गाड्या
विजयदुर्ग - ३ गाड्या