खावटी कर्जवसुली तूर्त थांबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खावटी कर्जवसुली तूर्त थांबवा
खावटी कर्जवसुली तूर्त थांबवा

खावटी कर्जवसुली तूर्त थांबवा

sakal_logo
By

82685
सिंधुदुर्गनगरी : कार्यालयीन अधीक्षक उर्मिला यादव यांना निवेदन देताना शेतकरी कृष्णा चिपकर, महेश चव्हाण, प्रकाश वारंग, संदीप देसाई, शामसुंदर राणे आदी.

खावटी कर्जवसुली तूर्त थांबवा

शेतकऱ्यांची मागणी; सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालयीन अधीक्षकांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः जिल्ह्यातील सर्व खावटी कर्ज आणि दोन लाखांवरील तसेच मध्यम मुदत थकबाकीदार शेतकऱ्यांची सुरू करण्यात आलेली वसुली तूर्त थांबवावी, अशी मागणी जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार आणि शेतकरी वर्ग यांच्याकडून करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन आज जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक उर्मिला यादव यांच्याकडे देण्यात आले.
जिल्हा सहकार विभागाला देण्यात आलेल्या निवेदनावर ३४ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना कृष्णा चिपकर, महेश चव्हाण, प्रकाश वारंग, संदीप देसाई, शामसुंदर राणे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, गेले कित्येक दिवस जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार खावटी व दोन लाखांवरील कर्जमाफीसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत तसेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत समावेश होण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. २०१४ पासून खावटी कर्जदार यासाठी प्रयत्नांत आहेत. याबाबत शासनस्तरावर निर्णय होईपर्यंत थकित वसुलीची कार्यवाही थांबवावी. शेतकरी गेली आठ वर्षे शासन ठोस निर्णय घेत नसल्याने कर्ज भरू शकलेले नाहीत.
---
थकबाकीदार शेतकऱ्यांची स्थिती नाजूक
दरम्यानच्या काळात कोरोनामुळे आणि नैसर्गिक अवकृपेमुळे या थकबाकीदार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झालेली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तरीही वसुली सुरू ठेवली तर शेतकरी आत्महत्या करू शकतो. त्यामुळे वसुलीची कार्यवाही थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.