पालकमंत्रिपद भाजपकडे; विसरु नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्रिपद भाजपकडे; विसरु नका
पालकमंत्रिपद भाजपकडे; विसरु नका

पालकमंत्रिपद भाजपकडे; विसरु नका

sakal_logo
By

82692
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली. बाजूला संजू परब, मनोज नाईक, अजय गोंदावळे, आनंद नेवगी आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

पालकमंत्रिपद भाजपकडे, विसरु नका

तेलींचा केसरकरांना सल्ला; भाजी मंडई प्रकल्पाबाबत निर्णय घेताना विश्वासात घ्या

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः राज्यात शिंदे व फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता आहे. केसरकर जरी आमदार असले, तरीही पालकमंत्री भाजपचे आहेत, याचा विसर न पडता भाजी मंडईसंदर्भात कोणताही निर्णय घेताना केसरकर यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक आहे, असा सल्ला वजा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिला.
आठवडा बाजार जागेसंदर्भातील निर्णय स्थानिक व्यापारी, ग्रामीण भागातील शेतकरी व सावंतवाडीकर नागरिकांशी चर्चा करून घेणे गरजेचे आहे. भाजपा जनतेच्या भूमिकेशी ठाम राहणार आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांच्या भावनांचा विचार करूनच निर्णय घ्यावा व तो सर्वमान्य असावा, अशी स्पष्ट भूमिकाही तेली यांनी मांडली.
सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या नूतन इमारतीच्या प्रक्रियेमध्ये बैठक घेताना मंत्री केसरकर यांनी नगरपालिकेतील भाजपच्या माजी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. या इमारतीच्या भूमिपूजनाबाबत ते आग्रही असल्याचे दिसून आले होते. इमारतीचे भूमिपूजन करण्यापूर्वी तेथील व्यापाऱ्यांचे योग्य पुनर्वसन करणे आवश्यक असल्याची भूमिका माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतली होती. दोन दिवसांपूर्वीच सावंतवाडीचा मोती तलावाकाठी असलेला आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होळीच्या खुंटावर हलविण्यात येईल, असे वक्तव्य केसरकर यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर तेली यांनी आपली भूमिका मांडली. येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक तथा जिल्हा चिटणीस मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
तेली म्हणाले, "भाजी मंडईतील व्यापाऱ्यांचे योग्य जागी पुनर्वसन व्हावे तसेच कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होऊ नये, यासाठी भाजप सुरुवातीपासूनच आग्रही आहे. त्यामुळे केसरकरांनी याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये. वेळ पडल्यास याबाबत त्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. एकत्र बैठक घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करूया. आठवडा बाजार सध्या आहे त्या ठिकाणी योग्य की अयोग्य याबाबतचे मत नागरिक, ग्रामीण भागातील शेतकरी यांच्याशी चर्चा करून घेणे गरजेचे आहे. सगळ्यांना मान्य असेल तर तो निर्णय अंतिम करावा; मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये जनतेच्या भूमिकेसोबत भाजप राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही लोकांच्या भावनेचा विचार करून यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहे. लोकांचा उद्रेक होऊ नये, याचे भान त्यांनी ठेवावे."
..............
चौकट
तलावाच्या काठालाच लोकांची पसंती
आपण नगराध्यक्ष असताना उभा बाजार येथे नागरिकांना अडचण होत असल्याने व स्थानिक व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आठवडा बाजार मोती तलावाच्या काठावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजही बाजार आहे तिथेच राहावा, ही लोकांची मागणी आहे. त्यामुळे जनतेच्या मागणी सोबत आम्ही ठाम आहोत, अशी भूमिका यावेळी माजी नगराध्यक्ष परब यांनी व्यक्त केली.