सदर ःगावचे रक्षण करणारी कोकणातील चाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ःगावचे रक्षण करणारी कोकणातील चाळा
सदर ःगावचे रक्षण करणारी कोकणातील चाळा

सदर ःगावचे रक्षण करणारी कोकणातील चाळा

sakal_logo
By

rat१५१२.txt

( टुडे पान ३ साठी)

rat१५p७.jpg ः
८२९०६
डॉ. विकास शंकर पाटील

जनरिती- भाती ........ लोगो


कोकणात भगवान शंकर आणि भवानीची (पार्वतीची) मंदिरे अधिक आढळतात याची नोंद आधीच केली आहे. भगवान शंकरांच्या अधीन गण, वेताळ, चाळामेळा, राक्षस, भूत पिशाच हे असतात अशी श्रद्धा. कोकणात यांना रक्षक, देवाचार असेही म्हणतात. वेताळाची तर कोकणात स्वतंत्र मंदिरेच आहेत. भगवान शंकराबरोबरच त्यांचे सोबती म्हणून गांगोचाळा असा उल्लेख अनेक चाळ्यांच्या ठिकाणी येतो. गावावर येणाऱ्या साऱ्या लहान-मोठ्या संकटांपासून सुटका करण्याचे काम हा चाळा करतो, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. याचे काम वाईट शक्तीपासून रक्षण करणे, मर्यादा शाबूत ठेवणे, माणसे, झाडे, गुरे, वासरे या सर्वांचे रक्षण करणे आहे, असे मानले जाते. या अज्ञात शक्तीला वर्षातून एकदा वा परंपरेनुसार त्याचा मान दिला जातो.

--
गावचे रक्षण करणारी कोकणातील चाळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी गावी ३६० चाळ्यांच्या देवासाठी विशेष ३६० वाड्या केल्या जातात. भात आणि खोबरे असा वाडीचा थाट असतो. येथे मध्यरात्री १२ वाजता मंदिराच्या मागच्या बाजूला पाच कोंबडे कापून त्यांचे शिजवून आणलेल्या भातावर रक्त सांडले जाते. हा सर्व भात रक्तमिश्रित केला जातो. माऊलीच्या मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. माऊलीला हा आवाज जाऊ नये म्हणून घन गंभीर आवाजात पुजारी आतमध्ये घंटानाद करत राहतो. बाहेर हा रक्तमिश्रित भात घेऊन ढोलांच्या कर्णकर्कश आवाजात मंदिर प्रदक्षिणा सुरू होते. मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर रक्तमिश्रित भात मंदिराभोवती पेरला जातो. मग सर्वजण मंदिरापासून काही क्षण दूर जातात. मंदिरातील हा विधी पूर्ण झाल्यावर सर्वजण धावत मोडक्या वडाकडे जातात. जाताना जोराजोरात हाकारेकुकारे सुरू होतात. मंदिरापासून काही अंतरावर ढोल वाजू लागतो. सीमेवर पोहोचल्यावर येथेही एक कोंबडा कापला जातो. राऊळ बांधवांनी आणलेल्या भातावर कोंबड्याचे रक्त सांडले जाते. रक्तमिश्रित भात येथे सीमेवरही पेरला जातो. हा अज्ञात शक्तीचा वाटा आहे, असे मानले जाते. रात्री भाताचा पडलेला हा खच सकाळी मात्र पूर्ण मोकळा झालेला असतो. तिथे भाताचे एक शीतही दिसत नाही. हा भात पिशाच्च खातात, असे ग्रामस्थ सांगतात. ग्रामस्थ सीमेवरून मध्यरात्री घरी पोहोचतात. आता वर्षभर कोणत्याही वाईट शक्तीपासून भीती नाही. गावावर कोणतेही अरिष्ट्य आता येणार नाही, अशी लोकांची श्रद्धा दृढ होत जाते. देवी माऊलीवरील विश्वास दृढ असतो.
लोरे येथील श्री देव गांगेश्वर देवस्थान (गांगोचाळा) या विषयी अशीच एक प्रथा रूढ असल्याचे दिसते. या देवस्थानाचे गांगोचे दक्षिण दिशेस तोंड असून अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या या देवतेचा ७२ खेड्यावर अधिकार आहे. तीन वर्षातून एकदा रेडा बळी देण्याची प्रथा या देवस्थानाची होती. गांगोचा चाळा येथे विशिष्ट आकाराच्या दगडावर रेड्याची मान ठेवून तीक्ष्ण पात्याच्या धारदार तलवारने रेड्याची मान एका घावात तोडली जात असे. रेड्याचा बळी देत असताना गांगोच्या चाळ्याचे जमिनीत असलेले पाषाण आपोआप बाहेर येत असे. त्यावर जणू रेड्याच्या रक्ताचा अभिषेकच होत असे. जत्रेदिवशी पहाटे चार वाजता रेड्याचा बळी दिला जात असे. त्यानंतर एक पायली भातात रक्तमिश्रित करून तो भात आकाशात उडवला जाई. हा नैवेद्य ७२ खेड्यातील भुतांसाठी असे. त्यातील एकही भाताचा कण जमिनीवर पडत नसे, अशी जाणकारांची माहिती आहे. या देवतेने साक्षात यमालाही आपल्या अधीन केले आहे. त्यामुळे यमाच्या दक्षिण दिशेस या देवाचे तोंड असल्याचे सांगितले जाते. १९६४ नंतर ही रेडा बळी देण्याची प्रथा बंद झाली. त्यानंतर देव गांगेश्वराच्या आदेशाने कोंबडा, बकरी यांचा बळी दिला जातो. बळी दिल्यानंतर चाळा अभय देतो. इच्छित मनोकामना पूर्ण करतो, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. अशाप्रकारे कोकणात चाळा ही रक्षक देवता मानली जाते. तिला भूत, पिशाच्च असे न मानता त्याला देवत्वरूप देऊन कोकणी व्यवस्थेत सामावून घेतले आहे. ही देवता गावच्या रक्षणात खूप मोठी भूमिका बजावते, अशी येथील लोकांची श्रद्धा असल्याने तिच्याविषयीच्या प्रथा परंपरा आजही जपल्या जातात. ही देवता अतृप्त राहिल्यास ती गावावर कोप धरेल म्हणून तिला कोंबडा, बकरा यांचा बळी देऊन तिचे समाधान केले जाते. शंकराच्या अधीन असल्यामुळे हा चाळा या कोकणी व्यवस्थेत पूजनीय बनला आहे.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)

--