
रत्नागिरी-संगीत नाट्य स्पर्धा
rat१५१४. txt
(टुडे पान ४ साठी, अॅंकर)
सं. राज्य नाट्य स्पर्धा--लोगो
फोटो ओळी
-rat१५p८.jpg ः
८२९०७
रत्नागिरी ः अमृत नाट्यभारती मुंबई या संस्थेने सादर केलेल्या संगीत माऊली या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
संगीत माऊलीमधून विठ्ठलपंत-रूक्मिणीचा जीवनप्रवास उलगडला
तांत्रिक बाजूचा उत्तम वापर ः अमृत नाट्यभारती मुंबई यशस्वी
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः महाराष्ट्राला संताची परंपरा आहे. पंढरपूरला तर दक्षिण काशी संबोधले जाते. त्या काळी ब्रह्मवृंदाच्या धर्मकांडामुळे ज्ञानेश्वर माऊलीच्या आई-वडील विठ्ठलपंत आणि रूक्मिणी यांचा जीवनपट लेखक व पदरचनाकार प्रदीप ओक ''संगीत माऊली'' या नाटकातून उलगडला. राज्य नाट्यस्पर्धेत अमृतनाट्य भारती, मुंबई या संस्थेने हा प्रयोग केला. संगीत दिग्दर्शक डॉ. राम पंडित यांच्या संगीत संकल्पनेची जोड मिळाली. संगीतातून नाटकाचा भावार्थ, धार्मिकता उत्तमरितीने मांडली. या नाटकात तांत्रिक बाजूचा उपयोग चांगला झाला. चक्क या नाटकात विठ्ठलपंतांची तिर्थयात्रेची ओढ, निवृत्ती, ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई यांचे बालपण, त्यांचे शिक्षण हे चित्रफितीद्वारे नेपथ्याच्या आतील पडद्यावर दाखवून वेगळेपण साधले. धर्म, कर्मकांड या विषयाचे अचूक भाष्य, अभिनय व नाट्यपदांनी नाटक रंगतदार झाले. टाळ्यांच्या गजरात रसिकांनी दाद दिली.
-------
काय आहे नाटक?
संगीत माऊली या नाटकाची सुरवात सुत्रधाराकडून होते. या नाटकात ज्ञानेश्वर माऊलीचे आई-वडील विठ्ठलपंत आणि रूक्मिणी यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. प्रमोद पवार यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. विठ्ठलपंतांना ज्ञानाची ओढ असते. ते तिर्थयात्रेला निघून जातात. अलंकापुरीत श्री सिद्धेश्वर मंदिरात थांबतात. तेथे त्यांना सिद्धोपंत भेटतात. सिद्धोपंतांना आकाशातून झालेल्या भविष्यवाणीची आठवण होते. त्यांच्या मुलीचं लग्न विठ्ठलपंताशी होईल. सिद्धोपंत विठ्ठलपंताना घेऊन घरी येतात. विठ्ठलपंत पुन्हा तिर्थयात्रेस निघतात. सिद्धोपंत मुलीला गीतापठणाचे शिक्षण द्यावे असे सांगतात. दोघेही एकत्र राहिल्याने त्यांच्याही मनात प्रेमाचा अंकूर फुलतो. शेवटी विठ्ठलपंत-रूक्मिणीचा विवाह होतो. विठ्ठलपंताची ज्ञानाची भूक शमलेली नसते. पत्नी रूक्मिणी झोपेतच त्यांना तिर्थयात्रेला जा, असे सांगते. पडत्या फळाची आज्ञा समजून ते तिर्थयात्रेसाठी काशीला जातात. तेथे रामानंद स्वामींना भेटतात. ज्ञानाच्या ओढीने विठ्ठलपंत खोटे बोलतात. अविवाहित आहे असे सांगतात. संन्यासी होतात. रूक्मिणी त्यांची वाट पाहात बसते. कृष्णभक्तीत दिवस घालवते. एकेदिवशी विठ्ठलपंत, रामानंदस्वामी गावात येतात. रूक्मिणी भेटण्यास जाते. त्या वेळी स्वामी तिला आशीर्वाद देतात. तुझी लवकरच पतीशी भेट होईल, असे सांगतात. रामानंदन स्वामी विठ्ठलपंतांना घरी जाण्याची आज्ञा करतात. पुन्हा रूक्मिणी आणि विठ्ठलपंताचा संसार सुरू होतो; पण अलंकापुरीतील ब्रह्मवृंद त्यांचा छळ करतात. भिक्षा मिळत नाही. पुढे विठ्ठलपंतांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई चार मुले होतात. ती जसजशी मोठी होत जातात तसे त्यांना वेदांचे, योगाचे शिक्षण देतात, ती वेदांमध्ये पारंगत होतात. पुढे त्यांचं व्रतबंध करण्यासाठी कर्मठ ब्राह्मणांपुढे प्रस्ताव ठेवतात. शास्त्री विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित सांगतात. संन्यासाची मुले म्हणून हेटाळणी करतात. विठ्ठलपंत-रूक्मिणी आणि चार मुले त्र्यंबकेश्वर यात्रेला जातात. त्या वेळी सिंहाच्या डरकाळीने सारेजण पळतात. त्यामध्ये निवृत्ती गायब होते. मोठे झाल्यावर पुन्हा माता-पिता, भावंडं एकत्र येतात. विठ्ठलपंत रूक्मिणाला प्रायश्चिताची आठवण करून देतात. दोघेही इंद्रायणीच्या डोहात जीवन संपवतात, अशी या नाटकाची कथा.
-----
* पात्र परिचय
गौरी ः तन्वी गोरे, महादेव ः आनंद पालव, उमाताई ः ऋता पिंगळे, सूत्रधार ः श्रेयस व्यास, शास्त्री ः ऋषिकेश भोसले, सिद्धोपंत ः सचिन नवरे, विठ्ठलपंत ः साहिल विशे, रूक्मिणी ःशरण्या शेणॉय.
--
सूत्रधार आणि साह्य
निर्मितीप्रमुख ः डॉ. आश्विन भालेराव, दिग्दर्शक ः प्रमोद पवार, नेपथ्य ः सुधीर ठाकूर, प्रकाशयोजना ः शाम चव्हाण, नितीन बायकर, पार्श्वसंगीत ः सुमेध उन्हाळेकर, तंत्रनिर्देशक ः सुहास पराडकर, यश जाधव, दिग्दर्शक सहाय्यक ः ऋषिकेश भोसले, ऑर्गन ः प्रकाश वगळ, हार्मोनियम ः विजय रानडे, तबला ः सुहास चितळे, पखवाज ः विशाल जोगळेकर, नेपथ्य साहाय्य ः सुरज निवळे, प्रमोद निवळे, भिकू लिगम, वेशभूषा ः वैदही मुळे. सूत्रधार ः प्रमोद पवार,
--
लेखकाचे मत..
या नाटकातील पात्रांची संख्या कमी करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा या दृष्टीने नेपथ्याच्या भागातून चित्रफितद्वारे चार मुलांचा जीवनपट, त्यांचे शिक्षण, वावर उलगडण्यात आला आहे. तसेच स्पर्धेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग मान्य असल्याचे लेखक प्रदीप ओक यांनी मुलाखतीतून ''सकाळ''शी बोलताना सांगितले.
-----
आजचे नाटक
नाटक ः संगीत आपुलाची वाद आपणासी, सादरकर्ते ः आगम, पुणे. स्थळ ः स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायं. ७ वा.
--