वाटदला हातभट्टी दारूविक्रीवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाटदला हातभट्टी दारूविक्रीवर कारवाई
वाटदला हातभट्टी दारूविक्रीवर कारवाई

वाटदला हातभट्टी दारूविक्रीवर कारवाई

sakal_logo
By

जयस्तंभ येथे अपघातप्रकरणी गुन्हा
रत्नागिरीः जयस्तंभ येथे दुचाकीला ठोकर देऊन महिलेच्या दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. चिन्मय पित्रे (वय २६, रा. शांतीनगर, नाचणे रोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जयस्तंभ येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित पित्रे हे गुरुवारी सायंकाळी मोटार (क्र. एमएच-०८ एएन २६५२) घेऊन जयस्तंभ नगर वाचनालय येथून मिरकरवाडा येथे जात असताना अमृता अशोक भाटकर यांच्या दुचाकीला (क्र. एमएच-०८ बीए ६११०) धडक बसली. या अपघातात अमृता भाटकर यांना दुखापत झाली.
----------
वाटदला हातभट्टी दारूविक्रीवर कारवाई
रत्नागिरीः वाटद येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारूविक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. संशयिताकडून ४९५ रुपयांची ९ लिटर दारू जप्त केली. त्याच्याविरुद्ध जयगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश गंगाराम साईलकर (वय ५१, रा. वाटद-मेस्त्रीवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाटद येथे विनापरवाना हातभट्टी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत संशयिताकडून ४९५ रुपयांची नऊ लिटर दारू जप्त केली.
-----------
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा
लांजाः सहा महिन्यापूर्वी वडिलांची कॉलर धरून शिवीगाळ केल्याप्रकरणी जाब विचारल्याच्या रागातून काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना गोविळ येथे घडली होती. या प्रकरणी तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोविळ बौद्धवाडी येथील सुधीर श्रीपाल कदम (वय ३७, रा. पुलपाडा रोड, विरार इस्ट, सध्या रा. गोविळ बौद्धवाडी) हे नोकरीनिमित्त कुटुंबांसह मुंबईत राहत असून, ते त्यांच्या नातेवाइकांच्या जलदान विधीनिमित्त गोविळ येथे आले होते. १२ फेब्रुवारीला जलदानाचा विधी झाल्यानंतर सुधीर कदम हे आपल्या घरी जात असताना वाटेत भेटलेल्या विजय लखू पवार (रा. बौद्धवाडी गोविळ, ता. लांजा) यांना तुम्ही सहा महिन्यापूर्वी माझ्या वडिलांची कॉलर धरून शिवीगाळ का केली? असा जाब विचारला आणि ते तिथून निघून गेले. त्यानंतर रविवारी (ता. १२) फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास सुधीर कदम हे आपल्या नातेवाइकांच्या इथे विजय पवार यांच्या घरासमोरून जात असताना सकाळी जाब विचारल्याच्या रागातून विजय पवार यांनी घरातून काठी आणून घराच्या अंगणात सुधीर कदम यांना मारहाण केली. या मारहाणीत सुधीर कदम यांच्या डोक्याला दुखापत झाली. दरम्यान, घटनास्थळी विजय पवार यांच्यासह दोन महिलांनी सुधीर कदम यांना मारहाण व शिविगाळ केली. या वेळी विजय पवार यांनी सुधीर कदम यांना ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सुधीर कदम यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर विजय लखू पवार व इतर दोन महिलांवर रविवारी (ता. १२) फेब्रुवारीला रात्री गुन्हा दाखल झाला आहे.

......
देवरूखच्या तरुणाला दोन लाखांचा गंडा
देवरूखः ऑनलाइन नोकरी देण्याच्या बहाण्याने देवरूखातील एका तरुणाला २ लाख १४ हजार ५८० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही रक्कम तरुणाने आई-वडिलांच्या बँकखात्यातून गुगल पेद्वारे भरली असून, हा प्रकार ७ ते ९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला. या प्रकरणी देवरूख पोलिसात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीप्रकरणी अलोक प्रमोद नलावडे (देवरूख, संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे.
..........
रेल्वेमधून पडून एकाचा मृत्यू
संगमेश्वर ः संगमेश्वर रेल्वेस्टेशन ते भिरकोंडदरम्यान पायी गस्त घालत असताना आंबेड तेलेवाडी बोगद्याजवळ आंध्रप्रदेश येथील गव्वा समरसिम्हा रेड्डी हा जखमी अवस्थेत सापडला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. रेल्वेतून पडून तो जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. योगेश वसंत हुमणे हा रेल्वे ट्रॅकमन संगमेश्वर रेल्वेस्टेशन ते भिरकोंड अशी ड्युटी पेट्रोलिंग करत असता दरम्याने आंबेड तेलेवाडी बोगद्याजवळ सकाळी ११.४० च्या सुमारास संगमेश्वर रेल्वेस्टेशन दिशेने जात गव्वा समरसिम्हा रेड्डी हा जखमी अवस्थेत सापडला. त्याला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले. याबाबत योगेश वसंत हुमणे (रा. काम हुमनेवाडी) यांनी खबर दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, सचिन कामेरकर, बरगाळे, संतोष झापडेकर आदींनी जाऊन चौकशी केली.