''मोबाईल संस्कृती'' बालमनासाठी घातक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मोबाईल संस्कृती'' बालमनासाठी घातक
''मोबाईल संस्कृती'' बालमनासाठी घातक

''मोबाईल संस्कृती'' बालमनासाठी घातक

sakal_logo
By

swt163.jpg
83136
आसोलीः स्नेहसंमेलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. रुपेश पाटील.

‘मोबाईल संस्कृती’ बालमनासाठी घातक
प्रा. रुपेश पाटील ः आसोलीत वार्षिक बक्षीस वितरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः छत्रपती शिवराय घडले नाहीत, तर जाणीवपूर्वक घडविले गेले आहेत. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांनी त्यांना बालवयातच शौर्य, धाडस, आत्मसन्मान आणि संस्कृती रक्षणाचे धडे दिले. अलीकडच्या काळात मोबाईल व चॅनेल संस्कृती फोफावल्यामुळे बालमनावर त्याचे दुष्परिणाम पाहावयास मिळतात. म्हणून मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी सजगता बाळगणे गरजेचे आहे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी आसोली येथे व्यक्त केले.
वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्यामंदिर, आसोली नंबर एक प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा काल (ता. १५) झाला. यावेळी प्रा. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नीलेश पोळजी होते. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, आसोली ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष अशोक धुरी, आसोली ग्रामपंचायतीचे सरपंच बाळा जाधव, आसोली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विष्णू रेडकर, सेवा निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक तथा छावा संघटनेचे उपाध्यक्ष कल्याण कदम, राजे प्रतिष्ठानचे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, पत्रकार साबाजी परब, मुंबई विकास मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश धुरी, विकास मंडळाचे प्रकाश परब, विजय धुरी तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विनोद गावडे, माता-पालक संघ उपाध्यक्ष संपदा नाईक, मुख्याध्यापक प्रफुल्ल ठोकरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुचिता गावडे, माजी शालेय समिती अध्यक्ष सुजाता देसाई, राजेंद्र धुरी, प्रसाद गावडे, सहाय्यक शिक्षक संदीप सावंत, अमोल आग्रे, प्रसाद गावडे, ईश्वर थडके, शिक्षिका सुकांती नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. पाटील यांचे ‘कुठे हरपलेत संस्कार’ या विषयावर व्याख्यान झाले. प्रा. पाटील म्हणाले, ‘‘अलीकडे मुले ऐकत नाहीत, अशी अनेक पालकांची समस्या असते; मात्र आपण आपल्या मुलांना किती विश्वासात घेतो ? त्यांच्यासाठी आपला किती वेळ खर्ची घालतो ? हेही पाहणे गरजेचे आहे. ज्या घरात छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व साने गुरुजी यांच्यासारख्या महापुरुषांची जीवनगाथा सांगितली जाते, त्या घरात वाढणारा बालक पुढच्या काळात संस्कारक्षम व आदर्श नागरिक म्हणून निर्माण होतो.’’
यावेळी आसोली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष धुरी यांनी शाळेच्या प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या गरजांसाठी योग्य ते आर्थिक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. उपाध्यक्ष सुरेश धुरी यांनीही शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योग्य ते सहकार्य करण्याची हमी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोळजी यांनी येत्या आगामी वर्षात शाळेला शंभर वर्ष पूर्ण होत असल्यामुळे शाळेचा शताब्दी महोत्सव धुमधडाक्यात करण्याचा मानस व्यक्त केला. शाळेतील आजी-माजी विद्यार्थी, पालक व आसोली पंचक्रोशीतील दात्यांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक ईश्वर थडके यांनी, मुख्याध्यापक प्रफुल्ल ठाकरे यांनी आभार मानले. ही सर्व बक्षिसे राजे प्रतिष्ठानने प्रायोजित केली होती. मुख्याध्यापक ठोकरे यांना ‘आदर्श शिक्षक’ म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.