कुणकेश्वर यात्रा तयारी अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणकेश्वर यात्रा तयारी अंतिम टप्प्यात
कुणकेश्वर यात्रा तयारी अंतिम टप्प्यात

कुणकेश्वर यात्रा तयारी अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

swt१६७.jpg
८३१४०
कुणकेश्‍वरः येथील यात्रेसाठी दर्शन रांग व्यवस्था केली आहे. (छायाचित्रः संतोष कुळकर्णी)

कुणकेश्वर यात्रा तयारी अंतिम टप्प्यात
दर्शन रांगांची व्यवस्थाः तीन देवस्वाऱ्या येणार भेटीला
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ ः तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यात्रा परिसरातही रोषणाई करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांग व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाभरातील विविध ठिकाणच्या तीन देवस्वार्‍या श्री देव कुणकेश्‍वर भेटीसाठी येणार आहेत.
यंदा शनिवार (ता.१८) ते सोमवार (ता. २०) या कालावधीत श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथील यात्रा होणार आहे. जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रा झाल्यानंतर कुणकेश्‍वर यात्रेला भाविकांची हजेरी असते. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेनंतर व्यापारी कुणकेश्‍वर यात्रेकडे वळतात. ''कोकणची दक्षिण काशी'' म्हणून ओळख असलेल्या कुणकेश्‍वरला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन श्री देव कुणकेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून यात्रा नियोजन सुरू आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरही आढावा सभा घेण्यात आला. भाविक भक्तांना दर्शनासाठी व त्यांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन केले जात आहे. यात्रा नियोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंडप व्यवस्था, दर्शन व्यवस्था पूर्ण झाली आहे. मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरीकेटिंग व रेलिंग करण्यात आले आहे. मंदिरासह यात्रा परिसरात आवश्यक त्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक आणि समुद्र किनारी सागरी सुरक्षा दल ठेवण्यात येणार आहे. पोलिस यंत्रणेबरोबरच कुणकेश्वर ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्र किनारी सुरक्षा पथके असणार आहेत. प्रशासकीय विविध कामेही आता शेवटच्या टप्प्यात आली आहेत. तारामुंबरी पुलावरून मंदिराकडे जाणारा रस्ता सुधारण्यात आला आहे. या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे. आरोग्य विभाग, महावितरण विभागाची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. एसटी महामंडळ हंगामी आगार उभारण्याच्या तयारीत दिसत होते. यात्रा परिसरात पूजाताट विक्रेते तसेच येणार्‍या व्यापार्‍यांना प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करण्यास निर्बंध घातले आहेत. देवस्थान मंडळींची उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर धावपळ दिसत होती.

चौकट
समुद्रस्नानावेळी सोमवतीचा योग
यात्रेत मालवण वायंगणी येथील श्री देव रवळनाथ, आसरोंडी (मालवण) येथील श्री देव लिंगेश्‍वर पावणाई आणि पळसंब (मालवण) येथील श्री जयंतीदेवी आदी तीन देवस्वाऱ्या कुणकेश्‍वर भेटीला येणार आहेत. यंदा यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता. २०) सोमवती अमावस्येचा योग असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार आहे. सोमवार असल्याने समुद्रस्नानावेळी भाविकांच्या गर्दीत वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. सोमवती अमावस्यामुळे तीर्थस्नानास भाविकांना व देवभेटीकरिता येणाऱ्या देवस्वाऱ्यांना संपूर्ण दिवस लाभ घेता येणार आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही यात्रेत गर्दी राहण्याची शक्यता दिसते.

चौकट
सुरक्षितेसाठी उपाययोजना
यात्रा कालावधीत भाविकांच्या अधिक सुरक्षिततेसाठी कार्डियाक रुग्णवाहिका, आरोग्य कक्षात खाटांची व्यवस्था, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धतता, पुरेसा औषधसाठा, पाणी शुध्दीकरणावर लक्ष दिले जावे, आदी जिल्हाधिकार्‍यांच्या प्रशासनास सूचना आहेत.

चौकट
जिल्हाभरातून ८० गाड्या धावणार
श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेसाठी जिल्हाभरातून सुमारे ८० एसटी गाड्या धावणार आहेत. यातील सुमारे ३२ गाड्या देवगड आगाराच्या असतील. याशिवाय तालुक्यातील विजयदुर्ग तसेच कणकवली, मालवण आगाराच्या गाड्या धावतील. तर तारामुंबरी-मिठमुंबरी पुलामुळे या भागातून खासगी वाहतुकीवर अधिक भर राहील. यासाठी पार्किंग व्यवस्था करण्यात येत होती.