संगमेश्वर ः कळंबस्तेत शिवमंदिरासह पुरातन रामेश्वर पंचायतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर ः   कळंबस्तेत शिवमंदिरासह पुरातन रामेश्वर पंचायतन
संगमेश्वर ः कळंबस्तेत शिवमंदिरासह पुरातन रामेश्वर पंचायतन

संगमेश्वर ः कळंबस्तेत शिवमंदिरासह पुरातन रामेश्वर पंचायतन

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat17p11.jpg ःKOP23L83357 संगमरवरात कोरलेल्या मूर्ती.
-rat17p12.jpg ः शिवमंदिर.23L83358
---------
कळंबस्तेत शिवमंदिरासह पुरातन रामेश्वर पंचायतन
उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र; थक्क करणारे कोरीवकामही
संगमेश्वर, ता. १७ ः निसर्गसंपन्न कोकण भागात चालुक्य राजवटीत सर्वाधिक मंदिरे उभारली गेली. चालुक्य राजे शिवाचे उपासक असल्याने त्यांनी उभारलेली मंदिरे ही शिवाचीच आहेत. ज्या भागात जो पाषाण उपलब्ध होईल त्या पाषाणामध्ये ही शिवमंदिरे उभारली गेली. या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य शास्त्राबरोबरच त्यातील कोरीवकाम. संगमेश्वर तालुक्यामधील कसबा गावात चालुक्यकालीन शिवमंदिरे स्थापत्यशास्त्राचा अद्भूत आविष्कार दाखवत आजही उभी आहेत. शिवमंदिरांव्यतिरिक्त नजीकच्या कळंबस्ते गावांत ''रामेश्वर पंचायतन'' मंदिर आहे. हे अत्यंत पवित्र असे ठिकाण आहे. पंचायतन म्हणजे पाच देवांचे एकत्रित ठिकाण.
भग्न होते की काय अशी अवस्था झालेल्या या ठिकाणाचा कळंबस्ते साटलेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी, गानू मंडळी यांनी मंदिर परिसराला नजर लागेल असा जीर्णोद्धार करून दाखवला. शिवमंदिरात आता महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होऊ लागलाय. संगमेश्वर ते कसबा येथून पुढे फणसवणे येथे गेल्यानंतर उमरे मार्गावर जायचे. तेथून कळंबस्ते हायस्कूल जवळून पुढे गेल्यानंतर एक छोटा पूल लागतो त्याच्या पुढे उजव्या हाताला वळल्यानंतर तो रस्ता साटलेवाडी येथील रामेश्वर पंचायतन मंदिराकडे जातो.

वैशिष्ट्य
पंचायतन मंदिराच्या सभामंडपात नंदी
अलंकृत नंदी एका बाजूला रेलल्यासारखा भासतो
नंदीवर एवढे बारीक अलंकरणही अपवादानेच
शिवलिंगाची लकाकी डोळ्यात भरते
शिवलिंगापाठीमागे संगमरवरातील अष्टदुर्गा

जांभ्या दगडातील रेखीव मंदिर
जांभ्या दगडात उभारण्यात आलेले हे मंदिर रेखीव आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर दोन्ही बाजूला उंच दीपमाळा आहेत . मध्यभागी शिवमंदिर आणि चार कोपऱ्यात गणपती, अष्टदुर्गा, सूर्यनारायण आणि विष्णूच्या मूर्ती असणारी छोटी मंदिरे असे मिळून रामेश्वर पंचायतन तयार झाले आहे. येथील गणपती उजव्या सोंडेचा आहे. विशेष म्हणजे चार कोपऱ्यात असणाऱ्या देवतांच्या मूर्ती आकाराने सारख्याच आहेत. याबरोबरच मंदिरांची उंचीदेखील एकसारखीच आहे. पंचायतनातील सर्व मूर्ती या अप्रतिम संगमरवरात कोरलेल्या आहेत.

अहिल्याबाईंनी दिले शिवधन
कळंबस्ते येथील एक गानू नामक व्यक्ती मध्यप्रदेशला अहिल्याबाई होळकर यांच्या संस्थानात सेवेत होती. अहिल्याबाई या शिवभक्त असल्याने त्यांनी काही शिवधन या गानूंच्या हाती सोपवून त्यांच्या गावात शिवमंदिर उभारायला सांगितले. त्यानुसार या मंदिराची उभारणी झाली. मंदिरात असणाऱ्या सर्व मूर्ती या त्या काळात घोड्यावरून कळंबस्ते येथे आणण्यात आल्या.