
सिंधुदुर्गनगरीत ‘मूक आंदोलन’
83461
सिंधुदुर्गनगरी ः वारिशे खुनाच्या निषेधार्थ येथे मूक आंदोलन करण्यात आले.
सिंधुदुर्गनगरीत ‘मूक आंदोलन’
पत्रकार वारिशे खून प्रकरणाचा निषेध; पत्रकारांसह नागरिकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः रिफायनरी प्रकल्पाविरोधी भूमिका घेणारे राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार, नागरिकांतर्फे आज सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी दहा ते दुपारी एक दरम्यान मूक आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील सजग नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे अनौपचारिक व्यासपीठ असलेल्या ‘आम्ही सारे भारतीय’ मंचाने सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व मुख्यालय पत्रकार संघाच्या सहकार्याने हे आंदोलन आयोजित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून आंदोलन सुरू करण्यात आले. मूक आंदोलन असल्याने कोणाचेही भाषण झाले नाही.
पत्रकार वारिशे यांचा खून झाल्यावर समाजातून आवश्यक तेवढी तीव्र प्रतिक्रिया उमटली नाही. समाजाच्या भावना, संवेदना बोथट झाल्या की काय, असे वाटावे अशी ही परिस्थिती आहे. अशा हिंसक आणि लोकशाही विरोधी, घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली करणाऱ्या घटनांबाबत समाजाने एक निश्चित भूमिका घेऊन उभे राहिले पाहिजे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विचारवंत सामाजिक कार्यकर्ते, संविधान प्रेमी, लोकशाही प्रेमी, स्वयंसेवी संस्थेच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या अनौपचारिक विचार मंचाने आजचे हे तोंडबंद आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन प्रतिकात्मक आहे. मत मांडण्याच्या, व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणणाऱ्या प्रवृत्तींविरोधात हे आंदोलन होते. या आंदोलनात आम्ही सारे भारतीय मंचाचे पदाधिकारी, सतीश लळीत, देवदत्त परुळेकर, मंगल परुळेकर, श्रीकांत सावंत, सई लळीत, महेश परुळेकर, नागेश मोरये, इरशाद शेख यांच्यासह जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, देवयानी वरस्कर, बाळ खडपकर, जिल्हा मुख्यालय पत्रकार संजय वालावलकर, मनोज वारंग, नंदकुमार आयरे, दत्तप्रसाद वालावकर, विनोद दळवी, विनोद परब, लवू म्हाडेश्वर आदी सहभागी झाले.