‘वराडकर’च्या शिक्षकांची कांदळवन सफर
83508
आचरा : येथील समुद्रकिनारी कांदळवन लागवड करताना वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक. शेजारी इतर.
‘वराडकर’च्या शिक्षकांची कांदळवन सफर
आचरा किनारी वृक्षारोपण; विधायक उपक्रमाचे कौतुक
ओरोस, ता. १७ ः कांदळवन वृक्षांबाबत सर्वसामान्य जनता, विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांचे महत्त्व समजावे. जेणेकरून कांदळवनाच्या संवर्धन, संरक्षणास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टाच्या शिक्षकांनी आचरा खाडीतील जामडुल वाडीतील युवक ओमप्रकाश आचरेकर यांना सोबत घेऊन कांदळवनांची माहिती जाणून घेतली. तसेच रोपांची लागवड केली.
कांदळवनांचा प्रसार होण्यासाठी एक छोटीशी नाटिका बसविण्याची संकल्पना मुख्याध्यापक संजय नाईक यांनी शिक्षकांच्या समोर मांडली आणि लागलीच सर्व सहकारी शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ही संकल्पना प्रशालेचे शिक्षक सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ सचिव प्रकाश कानूरकर यांनी जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना सांगितली. सर्वांनी या कांदळवनांचा प्रसार करावा, अशी विनंती केली. याला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी कांदळवन सफर करण्याची इच्छा व्यक्त केली.
कांदळवन हे आचरा बंदराजळच्या खाडीत आहे. हे कांदळवन म्हणजे सागराजवळ वाढणारा अनेक वनस्पतींचा समूह. याला मराठीत ‘कच्छ वनस्पती’ असेही म्हणतात. या कांदळवनामुळे समुद्री अन्नसाखळी टिकून राहते. कांदळवने समुद्र किनाऱ्याचा लाटांपासून, त्सुनामीपासून तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करतात. अनेक समुद्र प्रजातींचे प्रजनन कांदळवन क्षेत्रात होते. यासाठी ‘पांढरी चिप्पी’ (सोनेरेशिया अल्बा) या वृक्षास ‘राज्य कांदळवन वृक्ष’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
पांढऱ्या चिपीची फुले संगधी असून मधमाशा, कीटक व पक्षांना आकर्षित करात. देशातील कांदळवनांच्या एकूण प्रकारापैकी सुमारे वीस प्रकार आपल्या महाराष्ट्र किनारपट्टीवर दिसून येतात. या वीस प्रजातींपैकी पांढरी चिप्पी ही एक प्रजाती आढळते. या कांदळवन सफारी लागवडीसाठी मुख्याध्यापक संजय नाईक, शिक्षक प्रकाश कानूरकर, महेश भाट, समीर चांदरकर, संजय पेंडूरकर, भूषण गावडे या शिक्षकांनी पुढाकार घेत संपूर्ण माहिती जाणून घेतली.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टाचे विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. सोनू पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती चेअरमन सुधीर वराडकर, सहसचिव एस. डी. गावडे आदींनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.