गडकोट संवर्धनाचा ध्यास घेतलेले दुर्गवीर प्रतिष्ठान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडकोट संवर्धनाचा ध्यास घेतलेले दुर्गवीर प्रतिष्ठान
गडकोट संवर्धनाचा ध्यास घेतलेले दुर्गवीर प्रतिष्ठान

गडकोट संवर्धनाचा ध्यास घेतलेले दुर्गवीर प्रतिष्ठान

sakal_logo
By

शिवजयंती विशेष--लोगो
rat१८p१०.jpg, rat१८p११.jpg
८३६११, ८३६१२
साखरपाः दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि संग्रहातील नाणी.
--------------
गडकोट संवर्धनाचा ध्यास घेतलेले दुर्गवीर प्रतिष्ठान
अपरिचित किल्ल्यांचे संवर्धन; सामाजिक आणि शैक्षणिक कामातही पुढाकार

दृष्टिक्षेपात...
* २००८ ला प्रतिष्ठानची स्थापना
* प्रतिष्ठानचे एक हजार नोंदणीकृत कार्यकर्ते
* अपरिचित किल्ल्यांचे संवर्धन
* संवर्धनावेळी मिळालेल्या वस्तूंचे जतन
* इतिहासकालीन नाण्यांचा संग्रह
* सामाजिक कार्यातही सहभाग

अमित पंडित ः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १८ ः गडकोट केवळ पाहणे म्हणजे इतिहास जाणून घेणे नव्हे तर आपला हा ऐतिहासिक वारसा संवर्धित करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. याच जाणिवेतून स्थापन झालेल्या दुर्गवीर संस्थेने अपरिचित गडकोट लोकांना परिचित करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हे काम करत असताना किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवून या किल्ल्यांना नवे रुपडे दिले आहे.
संतोष हसूरकर हे असेच एक दुर्गवेडे. बेळगावसारख्या सीमाभागात राहून शिवप्रेरणेने भारलेले हे दुर्गप्रेमी. गडकोटांची भ्रमंती करताना अपरिचित गडकोटांनी त्यांना आकर्षित केले. २००४ पासून त्यांनी भ्रमंती सुरू केली. हे करत असताना दुर्गांची दयनीय अवस्था त्यांना अस्वस्थ करत होती. या दुर्गांच्या संवर्धनासाठी काहीतरी केले पाहिजे या जाणिवेतून त्यांनी २००८ ला दुर्गवीर प्रतिष्ठानची स्थापना केली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या कोकणातल्या जिल्ह्यासह नाशिक, कोल्हापूर आणि बेळगाव या विभागांमध्ये दुर्गवीरचे संवर्धन कार्य सुरू आहे. प्रतिष्ठानची स्थापना झाल्यावर अपरिचित गडकोट लोकांना परिचित करून द्यावेत हा विचार पुढे आला आणि त्यातून अनेक अपरिचित किल्ले स्वच्छतामोहीम सुरू झाली. प्रारंभी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील मानगड संवर्धित करून प्रतिष्ठानच्या कामाला सुरवात झाली. सध्या कोल्हापूर इथे सामनगड आणि चंदगड बेळगावातील सडाकिल्ला, वल्लभगड, संकेश्वर नाशिकचे साल्हेर आणि मुल्हेर, रायगडमधील मृगगड, मानगड आणि सूरगड, रत्नागिरीतील महिमतगड आणि महिपतगड, साटवली गढी, सिंधुदुर्गमध्ये रामगड आणि भगवन गड या किल्ल्यांवर संवर्धन मोहीम सुरू आहे.
या वेळी किल्ल्यांवर अनेक वस्तू सापडल्याचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रशांत डिंगणकर सांगतात. त्यात त्या काळातील भांड्यांचे अवशेष, जाती, पाटे, नाणी, तोफा, तोफगोळे, वीरगळी, देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. सूरगड घेरूयात १२ टनी तोफ मिळाली आहे. मानगडमध्ये मिळालेल्या वीरगळी, मूर्ती, जातीचे कलादालन करण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी मिळालेल्या नाण्यांचा संग्रहही प्रतिष्ठानकडे आहे. त्यात शिवराई, जुनागड संस्थांचे नाणे, गजनी, अकबर, शहाजहान, जहांगीर यांची नाणी, जिंजी आणि मौर्य साम्राज्यातील नाणी आहेत. प्रतिष्ठानच्या राकेश मोरे यांनी हा संग्रह केला आहे.
--

आदिवासी पाड्यांवर वस्तूंची मदत
केवळ गडकोट संवर्धन हेच कार्य प्रतिष्ठान करत नाही तर ज्या गडावर संवर्धन मोहीम सुरू असते, त्या गडघेऱ्यातील आदिवासी पाड्यांमधील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही केला जातो. गडघेऱ्यातील मुले शिकून मोठी व्हावीत म्हणून शालोपयोगी वस्तूंचेही वाटप केले जाते. सामाजिक बांधिलकी म्हणून ही मदत केली जाते. तसेच गडांवर जाऊन स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्र दिन, दिवाळी, गुढीपाडवा हे सण प्रतिष्ठान साजरा करते.
--
कोट
गडकोट संवर्धन ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिष्ठानचा प्रत्येक कार्यकर्ता मानतो. त्यामुळे अनेकवेळा पदरमोड करून आणि लोकाश्रयावर हे प्रतिष्ठान काम करते. गेल्या १४ वर्षात केलेल्या कामाचा आनंद आहे.
- प्रशांत डिंगणकर, दुर्गवीर प्रतिष्ठान