‘धाडस दाखव मर्दा’ ‘धाडस दाखव मर्दा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘धाडस दाखव मर्दा’
‘धाडस दाखव मर्दा’
‘धाडस दाखव मर्दा’ ‘धाडस दाखव मर्दा’

‘धाडस दाखव मर्दा’ ‘धाडस दाखव मर्दा’

sakal_logo
By

बिग स्टोरी
83813
83810
83815
83818
83819


‘धाडस दाखव मर्दा’

- नंदकुमार आयरे

लीड
लोकसंख्या नियंत्रणात सिंधुदुर्गाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. येथे मुला-मुलींच्या समानतेविषयी सुध्दा बरीच साक्षरता दिसून येते; पण याच जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची (नसबंदीची) भीती पुरुषांमध्ये असल्याचे आकडेवारीवरून पुढे येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या ६ वर्षांत केवळ ११८ पुरुषांनी नसबंदी केली आहे. या तुलनेत १० हजार ६४ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यामुळे पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढविण्यासाठी आता ‘धाडस दाखव मर्दा’ अशी हाक प्रशासनाने दिली आहे.
...............
महिलांनाच आग्रह का?
लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन ही काळाची गरज आहे. त्यासाठी शासनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची संकल्पना अंमलात आणली. यासाठी २० वर्षांपूर्वी आरोग्य यंत्रणेला पुढाकार घ्यावा लागत होता. गेल्या काही वर्षांपासून समाजात कुटुंब नियोजनाचे महत्त्व लक्षात आल्याने आता कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी संबंधित लाभार्थींकडून स्वतःहून पुढाकार घेतला जातो आहे. ही समाधानाची बाब आहे; मात्र एक-दोन मुलांनंतर महिलांनीच शस्त्रक्रिया करावी, अशी एक मानसिकता समाजात दृढ झाली असून आजही ती कायम आहे. त्यामुळेच महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांपेक्षा पुरुषांवर झालेल्या शस्त्रक्रियांची संख्या अगदीच नगण्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत आढावा घेतला असता गेल्या ६ वर्षांत (२०१७-१८ पासून) आतापर्यंत १० हजार ६४ महिलांच्या, तर पुरुषांच्या केवळ ११८ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. पुरुषांच्या शस्त्रक्रियेचे प्रमाण पाहता ते अगदीच नगण्य असे आहे. पुरुषांमध्ये अद्यापही नसबंदीबाबत गैरसमज आणि मनामध्ये भीती असल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी प्रबोधनही केले जात आहे. पुरुष नसबंदीसाठी जिल्हाभरात विविध ठिकाणी विशेष नसबंदी शिबिरांचे आयोजन करण्यात आले; पण जिल्ह्यातील पुरुष लाभार्थींकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. कुटुंब नियोजन ही काळाची गरज असून यासाठी केवळ महिलांची शस्त्रक्रिया नव्हे, तर आता पुरुषांनी सुध्दा पुढाकार घेण्याची गरज आहे; मात्र नसबंदीसाठी पुरुष पुढे येत नाहीत. त्यामुळे पुरुषांमध्ये कोणता गैरसमज आहे की, त्यांना भीती सतावते, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
---------------------
* काय सांगते आकडेवारी?
लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने ‘हम दो हमारे दो’ अशी संकल्पना मांडून एक-दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची मोहीम राबविली. त्याची आरोग्य प्रशासनाच्या वतीने प्रचार, प्रसिद्धी करत नागरिकांमध्ये कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर समाजात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. सद्यस्थितीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी अधिक प्रबोधनाची आवश्यकता राहिलेली नाही. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्वतःहून करून घेणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली आहे; मात्र या शस्त्रक्रिया करताना महिलांनीच शस्त्रक्रिया करून घ्यावी, अशी परंपरा समाजात रुढ झाली आहे. त्यामुळे महिलांच्या शस्त्रक्रिया अधिक प्रमाणात (९९ टक्के) होऊ लागल्या; मात्र याबाबत पुरुषांमध्ये अद्यापही गैरसमज आणि भीती दिसून येत आहे. त्यामुळे पुरुष नसबंदीचे प्रमाण जिल्ह्यात फारच कमी, अर्थात १ टक्का एवढे आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चालू वर्षात २०२२-२३ साठी २८७४ एवढे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट असून गेल्या ९ महिन्यांत १३१७ महिला व १० पुरुषांच्या अशा एकूण १३२७ शस्त्रक्रिया करून ४७.१७ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. त्यामध्ये दोडामार्ग तालुक्यात ११०, वैभववाडी ८२, कुडाळ २५३, सावंतवाडी २१८, कणकवली २०९, देवगड १७७, मालवण १५४, तर वेंगुर्ले तालुक्यात १२४ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये केवळ कुडाळ तालुक्यात ६, कणकवली २ व देवगड तालुक्यात २ अशा एकूण १० पुरुषांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
--------------
* महिलांची भूमिका महत्त्वाची
स्त्री मुलांना जन्म देते. त्यासाठी ती नऊ महिने त्रास सहन करते. प्रसुती वेदना आनंदाने सहन करून मुलांना जन्म देण्याचे कार्य करते. असे असूनही कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठीही त्यांनाच पुढे केले जाते; मग पुरुषांचे कर्तव्य काय? त्यांनी किमान कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून आपल्या कुटुंबासाठी व पत्नीसाठी योगदान देण्याची गरज आहे. त्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी आपल्या पतीजवळ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्याचा आग्रह धरण्याची गरज निर्माण झाली आहे.
...............
* काय आहेत गैरसमज?
कुटुंब नियोजन ही काळाची गरज असली तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (नसबंदी) करून घेतल्याने पुरुषांना श्रमाची कामे करताना लवकर थकवा येईल, शारीरिक कमजोरी येईल, वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतील, असा गैरसमज पुरुषांमध्ये असल्याने ते सहजासहजी नसबंदीसाठी तयार होत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे गेल्या ६ वर्षांत १० हजार ६४ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर केवळ ११८ पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे धाडस दाखविले आहे. हे प्रमाण अगदी नगण्य असे सुमारे १ टक्का एवढेच असल्याचे दिसून येत आहे.
................
चौकट
शासनाकडून प्रोत्साहन
शासनाकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार्‍या लाभार्थींना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जातो. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, संवर्गातील लाभार्थींना ६०० रुपये, तर दारिद्र्य रेषेवरील लाभार्थींना २५० रुपये अनुदान दिले जाते. या व्यतिरिक्त पुरुषाने कुटुंब नियोजन नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्यास त्याला ११०० रुपये एवढे प्रोत्साहन अनुदान दिले जाते.
..................
* पॉईंटर्स
गेल्या ६ वर्षांत झालेल्या शस्त्रक्रिया
वर्ष*महिला शस्त्रक्रिया संख्या*पुरुष शस्त्रक्रिया संख्या
*२०१७-१८*२२१७*४९
*२०१८-१९*२०१६*२१
*२०१९-२०*२१००*१९
*२०२०-२१*१४८६*१०
*२०२१-२२*१३२४*९
*२०२२-२३*१३१७*१०
----------------------
कोट
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही अगदी सोपी आणि काही मिनिटांत पूर्ण होणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी पुरुषांना जास्त वेळ दवाखान्यात अ‍ॅडमिट रहावे लागत नाही. तसेच नसबंदीमुळे पुरुषाच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही अडचणी अथवा शारीरिक कमजोरी येत नाही. पुरुषांनी मनात कोणतेही दडपण अथवा भीती न ठेवता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घ्यावी.
- डॉ. संदेश कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
.....................
कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होत असल्या तरी पुरुष नसबंदीचे प्रमाण फारच कमी आहे. ते वाढावे, यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी पुरुष नसबंदीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येते; मात्र या शिबिरांना पुरुष लाभार्थींकडून प्रतिसाद मिळत नाही. नसबंदीसाठी पुरुष का पुढे येत नाहीत, त्यांच्यामध्ये कशाची भीती आहे, याचा शोध घेऊन त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
- डॉ. सई धुरी, माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
..................
कोट
सद्यस्थितीत विवाहित जोडप्यांमध्ये कौटुंबिक कलह (वाद) होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून होणारे घटस्फोट तसेच विवाहानंतर कलहातून पत्नी मुलांना घेऊन घर सोडून गेली तर अशावेळी नसबंदी झालेल्या पुरुषाला दुसरे लग्न करण्याचा पर्याय उरत नाही, अशी ही भीती पुरुषांना सतावते.
- एक पुरुष लाभार्थी.
..................