
खेड ः जगबुडीवरील दुसरा पूल मार्चअखेर वाहतुकीस खुला
जगबुडीवरील दुसरा पूल मार्चअखेर खुला
दाभिळ उड्डाणपूलही लागणार मार्गी; ५ कोटी ८० लाख मंजूर
खेड, ता. १९ ः मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या दुसर्या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून मार्चअखेर हा पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. भरणे येथील उड्डाणपूल, जगबुडी नदीवरील पूल आणि दाभिळ येथील उड्डाणपुलाची कामे आता पूर्ण होत आली असल्याने येत्या काही महिन्यात महामार्गावरील खेड तालुक्याच्या हद्दीतील प्रवास सुसाट होणार आहे.
दरम्यान, महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आणि कल्याण टोलवेज या ठेकेदार कंपनीचे ठप्प झालेले पुलाचे काम पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली. कामाला सुरवात केल्यानंतर कल्याण टोलवेज या कंपनीने पुलाचे काम २ वर्षात पूर्ण केले आणि २०१९ ला जगबुडी नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता त्याच नव्या पुलाच्या बाजूला आणखी एक पूल उभारला जात असून, हा पूल महामार्ग चौपदरीकरणाच्या अंतर्गत उभारला जात आहे. या पुलासाठी ५ कोटी ८० लाख इतका निधी मंजूर असून या पुलाचे कामदेखील कल्याण टोलवेज या कंपनीकडून सुरू आहे. गेल्या तीन वर्षात कल्याण टोलवेज या कंपनीने दुसर्या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण करत आणले असून मार्च २०२३ अखेर जगबुडी नदीवरील दुसरा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत महामार्ग बांधकाम विभागाने दिले आहेत.
ऐकेरी वाहतूक
जगबुडीवरील दुसऱ्या पुलाचे काम सुरू असल्याने सध्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे; मात्र दुसरा पूल वाहतुकीस खुला झाल्यावर या दोन्ही पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे जगबुडी पुलावरील आधी किंवा आता असलेला अपघाताचा धोका कायमचा संपुष्टात येणार आहे. नव्या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून, आता दोन्ही बाजूच्या अॅप्रोच रोडचे काम सुरू करण्यात आले आहे.