
संक्षिप्त
पान ५ साठी, संक्षिप्त)
साखरपा-बौद्धवाडी रस्ता डांबरीकरण
साखरपा ः साखरपा येथील बौद्धवाडी येथे जाणार्या रस्त्याच्या डांबरीकरणास प्रारंभ झाला आहे. या कामाचा आरंभ आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आला. रत्नागिरी कोल्हापूर मुख्य रास्ता ते साखरपा बौद्धवाडी यांना जोडणार्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्याची डागडुजी व्हावी यासाठी वाडीतील ग्रामस्थांची मागणी होती. त्याबाबत आमदार साळवी आणि माजी सभापती जयसिंग माने यांनी लक्ष घातले आणि निधी मंजूर करून दिला. या कामाच्या डांबरीकरणाला प्रारंभ झाला आहे. या वेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, महिला बालकल्याण माजी सभापती रजनी चिंगळे, सरपंच रूचिता जाधव आदी उपस्थित होते.
मंडणगडात युवा जल्लोष डान्स स्पर्धा
मंडणगड ः आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या वतीने आयोजित युवा जल्लोष ही डान्स स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या क्रीडांगणांवर झाली. याप्रसंगी आमदार कदम यांच्या हस्ते शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, मंडणगड याचे जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते विविध गावातील नवनिर्वाचित सरपंचांना सन्मानित करण्यात आले. आमदार कदम यांनाही सन्मानित केले आणि केक कापून वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने आयोजित स्पर्धेत पहिली ते सहावी गटात लहान गटामध्ये श्रावणी महाडीक, सिमरन जाधव, समृद्धी खैरे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. सातवी ते खुला गटामध्ये अनुक्रमे पारितोषिक श्रावणी पोस्टुरे, तृषा माळी, दीप्ती येलवे यांनी क्रमांक मिळवले. सांघिक खुला गटात प्रथम पारितोषिक वारकरी नृत्यासाठी नूतन विद्यामंदिर, द्वितीय पारितोषिक विभागून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या तांडव नृत्य आणि पवार ब्रदर यांना, तृतीय पारितोषिक तुळशी न्यू इंग्लिश स्कूलच्या शेतकरी नृत्याला देण्यात आला.
‘हिंदुत्व’च्या शताब्दीनिमित्त २५ ला व्याख्यान
रत्नागिरी ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी येथील कारागृहात केलेल्या हिंदुत्व या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला ओम साई मित्रमंडळाच्यावतीने शनिवारी (ता. २५) सायं. ५ वा. साळवी स्टॉप येथील ओम साई मित्रमंडळ येथे राजापूर येथील सावरकरप्रेमी दिलीप गोखले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रदीर्घ वास्तव्य रत्नागिरीमध्ये होते. या कालखंडातील सावरकरांचे समाजसुधारणाचे कार्य हिंदुसमाज आणि एकूणच देशहितासाठी अपूर्व आहे. रत्नागिरीत त्यांच्या वास्तव्यात हिंदूसमाजातील जातीभेद, विषमता, अस्पृश्यता आणि यांसारख्या वाईट प्रथा, चालीरिती नाहीशा व्हाव्यात यासाठी असंख्य उपक्रम राबवले. असंख्य भाषणे, विपुल लेखन केले. या ग्रंथाला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्यासाठी विशेष म्हणजे या ग्रंथाचे लेखन आपल्या रत्नागिरीतील कारागृहात केलेले आहे. वीर सावरकरांच्या हिंदुत्व विचारांच्या जागरणासाठीच या व्याख्यानाचे आयोजन मंडळाने केले आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ओम साई मित्रमंडळाने केले आहे.
84290
शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
चिपळूण ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा रविवारी चिपळुणात पक्षाचे उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या वेळी अनेक तरुणांनी युवासेनेत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी चिपळूण काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे, माजी नगरसेवक करामत मिठागरी, हारून घारे, माजी नगरसेविका संजीवनी शिगवण, स्वाती दांडेकर, संजीवनी घेवडेकर, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संजय शिगवण व तृप्ती कदम यांनी शिवसेना पक्षामध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला. या सर्वांचा शिवसेना चिपळूण यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. चिपळूण शहरप्रमुखपदी महम्मद फकीर आणि युवासेना शहरप्रमुखपदी विनोद पिल्ले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.