कणकवलीत 56 फ्लॅटधारकांना नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत 56 फ्लॅटधारकांना नोटिसा
कणकवलीत 56 फ्लॅटधारकांना नोटिसा

कणकवलीत 56 फ्लॅटधारकांना नोटिसा

sakal_logo
By

swt२१२६.jpg
84469
कणकवली : शहरातील बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील रहिवाशांना एसीबीने चौकशीच्या नोटिसा बजावल्‍या.

कणकवलीत ५६ फ्लॅटधारकांना नोटिसा
एसीबी चौकशीः आमदार वैभव नाईक यांच्याकडून खरेदी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २१ : शहरातील बांधकरवाडी येथील ‘दत्तकृपा’ अपार्टमेंटमधील ५६ फ्लॅटधारकांना रत्‍नागिरी एसीबीने चौकशीच्या नोटिसा बजावल्या आहेत. आमदार वैभव नाईक यांच्याकडून २०१६ ते २०१८ या दरम्‍यान ही फ्लॅट खरेदी झाली आहे. फ्लॅटधारकांनी हे फ्लॅट कसे खरेदी केले, याची चौकशी एसीबी करणार आहे.
शहरातील बांधकरवाडी परिसरात आमदार नाईक यांनी अनेक निवासी संकुले, व्यापारी गाळे बांधले आहेत. यातील केवळ ‘दत्तकृपा’ या एकाच संकुलातील फ्लॅटधारकांच्या फ्लॅट खरेदी व्यवहाराची चौकशी होणार असली तरी उर्वरित सर्व फ्लॅट आणि गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्‍यान, एसीबीच्या चौकशीला आम्‍ही सहकार्य करणार आहोत. ही चौकशी कणकवलीत व्हावी, अशी विनंतीही आम्‍ही एसीबी अधिकाऱ्यांना केली असल्‍याची माहिती फ्लॅटधारकांनी दिली.
ठाकरे गटात राहिलेल्‍या आमदार नाईक यांची गेल्‍या तीन महिन्यांपासून रत्‍नागिरी एसीबी विभागाकडून चौकशी सुरू आहे. यात गेल्‍या महिन्यात त्यांचा बंगला, दुकान, पाईप फॅक्‍टरी आणि इतर मालमत्तांची मोजमापे घेण्यात आली. त्यांच्या आमदार फंडातून ज्‍या ग्रामपंचायतींमध्ये कामे झाली, त्‍या कामांचीही एसीबीकडून चौकशी सुरू आहे. याखेरीज कुडाळ तालुक्‍यातील काही विकास संस्थांनाही एसीबीच्या नोटिसा आल्‍या आहेत.
कणकवली शहरात बांधकरवाडी, परबवाडी, मधलीवाडी या भागात २०१५ ते २०१८ या दरम्‍यान अनेक निवासी संकुलांची उभारणी आमदार नाईक यांनी केली होती. यातील बांधकरवाडी येथील ‘दत्तकृपा’ अपार्टमेंटमधील ५६ फ्लॅटधारकांना रत्‍नागिरी एसीबीकडून चौकशीच्या नोटिसा पाठविण्यात आल्‍या आहेत. फ्लॅटधारकांनी हे फ्लॅट कसे खरेदी केले, त्‍याचा तपशील देण्याचे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. फ्लॅट ज्‍यांच्या नावे आहेत, त्‍यांना आधार कार्ड, पॅनकार्ड सादर करण्याचेही कळविण्यात आले आहे.

कोट
दत्तकृपा अपार्टमेंटमध्ये अनेक वयोवद्ध नागरिक आहेत. त्‍यांना चौकशीसाठी रत्‍नागिरी येथे जाणे शक्‍य होणार नाही. त्‍यामुळे फ्लॅट खरेदीबाबतची चौकशी कणकवलीतच करावी, अशी विनंती आम्‍ही एसीबीला केली आहे. फ्लॅटधारकांना आता नोटिसा आल्‍या आहेत. ज्‍यावेळी चौकशी होईल, त्‍यावेळी एसीबीला पूर्ण सहकार्य करणार आहोत.
- सुरेश पवार, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी