
ध्यास रंगभूमीवरून शिवइतिहास साकारण्याचा
rat२२६.txt
बातमी क्र..६ ( टुडे पान १ साठी)
-------------
फोटो rat२२p३.jpg ः
८४५०६
साखरपा ः ऐतिहासिक नाटकातील प्रसंग साकारताना कलाकार.
ध्यास रंगभूमीवरून शिवइतिहास साकारण्याचा
नवनिर्माण नाट्यमंडळ; ''जाग मराठ्या जाग''चा प्रयोग
साखरपा, ता. २२ ः नाट्यकलेला कोकणात मोठी परंपरा आहे. परचुरी वेल्येवाडी येथील नवनिर्माण नाट्यमंडळ ही परंपरा गेली ४७ वर्ष जपत आले आहे. पैकी सलग ३८ वर्षे केवळ ऐतिहासिक नाटके सादर करण्याचा विक्रमच मंडळाने केला आहे. यंदा मंडळातर्फे जाग मराठ्या जागा हो हे नाटक सादर करण्यात आले.
या वाडीत दरवर्षी माघ महिन्यात दर्श अमावास्येला सत्यनारायणाची महापूजा होते. पुजेनंतर नवनिर्माण नाट्यमंडळ नाटक सादर करते. या प्रथेचा प्रारंभ १९७६ ला झाला. त्यावर्षी जयचंडी हे नाटक मंडळाने बसवले होते. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील स्त्री भूमिका गावातील रघुनाथ वेल्ये यांनी साकारली होती. सुरवातीला काल्पनिक नाटके सादर झाल्यावर मंडळाने ऐतिहासिक नाटके करण्याचा निर्णय घेतला. याचा प्रारंभ १९८५ ला भास्कर राणे लिखित महाराष्ट्राचा बहुरूपी हे छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या नाटकाने करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत ऐतिहासिक नाटकांची ही परंपरा मंडळाने जपली आहे. सम्राट सह्याद्रीचा, सिंह गर्जला रणी, शिवशाहीचा शिरपेच, शिवकंकण, आग्राहून दख्खन, महाराष्ट्राचा सूर्योदय, व्यंकोजी वाघ, पावनखिंडीचा रणझुंजार, स्वातंत्र्याची सिंहगर्जना अशी नाटके सादर करण्यात आली. दरवर्षी देवदिवाळीला मंडळाची बैठक होते आणि तिथपासून तालमींना प्रारंभ होतो. यंदा मंडळाचे ४७वे वर्ष आहे. यावर्षी जाग मराठ्या जाग हे नाटक सादर केले. नाटकाचे लेखन भास्कर राणे यांनी केले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका संजय वेल्ये यांनी साकारली होती.
--
कोट
स्वराज्याच्या चंदनगडावर आधारित हे कथानक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देदिप्यमान आहे. तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे हे एक आव्हान असते आणि जबाबदारीही.
- संजय वेल्ये (नट)
दृष्टीक्षेपात...
* माघ महिन्यात दर्श अमावस्येला नाटक
* देवदिवाळीच्या मुहूर्तावर तालमींना प्रारंभ
* गेल्या ४७ वर्षांची नाटकांची परंपरा
* नाटकातून शिवइतिहास जागवण्याचा प्रयत्न