
रुग्णालयाशेजारीच ध्वनी प्रदूषण
84573
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. जयेंद्र परुळेकर. बाजूला लक्ष्मीकांत पणदूरकर.
रुग्णालयाशेजारीच ध्वनी प्रदूषण
डॉ. परुळेकर ः सावंतवाडीत इमारतीच्या तोडफोडीमुळे त्रास
सावंतवाडी, ता. २२ ः येथील डॉ. जयेंद्र परुळेकर हॉस्पिटल शेजारी इमारतीचे जुने बांधकाम पाडण्यात येत असून यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशनरीच्या आवाजामुळे रुग्णांना, शेजाऱ्यांना त्रास होत आहे. या होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन हा आवाज थांबवावा, अशी मागणी माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. परुळेकर हॉस्पिटल शेजारी आठ वर्षापुवी निवासी संकुल उभे करण्यासाठी केलेले बांधकाम पाडुन तेथे नव्याने संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले बाधकाम जेसीबीला ड्रील मशिन लावून पाडण्यात येत आहे. त्याच्या आवाजामुळे रुग्णांना तसेच आजुबाजुच्या रहिवाशांना त्रास होत आहे. नजिकच्या घरांनाही याचा धोका पोहचू शकतो. या होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन हा आवाज थांबवावा, अशी मागणी डॉ. परुळेकर यांनी आज येथे केली.
डॉ. परुळेकर म्हणाले, ‘‘आम्हाला काम करण्याबाबत कुठलाही आक्षेप नाही; मात्र ज्या पद्धतीने काम सुरू आहे, ते चुकीचे आहे. रुग्णांना आणि रहिवाशांना मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. ड्रील मशीनमुळे आजूबाजूच्या इमारतींनाही तडे जाण्याची शक्यता आहे.’’ यावेळी उपस्थित असलेल्या लक्ष्मीकांत पणदुरकर यांनी आपण वृद्ध असल्यामुळे या आवाजाचा त्रास होत आहे. हृदयाची धडधड होते. त्यामुळे अशा पद्धतीने सुरू असलेले काम बंद करावे, अशी आपली मागणी आहे, असे सांगितले.
--
...तर आवाज उठवू
या संदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळवले; परंतु त्यांनी लक्ष घातले नाही. अशा पद्धतीने सुरू असलेले काम तत्काळ थांबवणे आवश्यक आहे. त्याऐवजी मनुष्यबळ वापरून ही इमारत पाडणे आवश्यक आहे. अन्यथा ज्या पद्धतीने काम सुरू झाले आहे, त्याचा त्रास आम्हाला आणखी महिनाभर सहन करावा लागणार आहे. यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांचेही लक्ष वेधू. दखल न घेतल्यास यासंदर्भात आवाज उठवू, असा इशारा डॉ. परुळेकर यांनी दिला.