
चिपळूण ःवाशिष्ठी सीमांकनात अंतिक्रमणाचे पितळ उघडे
पान १ साठी)
८४६६०
वाशिष्ठी सीमांकनात अतिक्रमणाचे पितळ उघड
विनापरवाना संरक्षक भिंती पात्रात; राजकीय नेतेमंडळींची दबावासाठी फोनाफोनी
चिपळूण, ता. २२ ः वाशिष्ठी नदीपात्रात झालेल्या सीमांकनात अनेकांचे अतिक्रमणाचे पितळ उघड झाले आहे. काही नागरिकांची घरे, व्यावसायिक दुकानगाळे गाळेदेखील नदीपात्रात आहेत. विनापरवाना संरक्षक भिंती नदीपात्रात बांधलेल्या आहेत. अनेक ठिकाणी ५० फुटांपासून १०० फुटांपेक्षा जास्त नदीपात्र अरूंद झालेले आहे. अतिक्रमण निघू नये यासाठी काही राजकीय पुढारी, माजी लोकप्रतिनिधी, व्यावसायिक टाहो फोडू लागले आहेत. काही ठराविक लोकांच्या फायद्यासाठी शहरावर पुन्हा पुराचे संकट ओढवू नये, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
चिपळूण शहर व परिसरात २२ जुलै २०२१ ला आलेल्या महाप्रलयंकारी महापुराला वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ कारणीभूत असल्याचे पुढे आल्याने नद्यांतील गाळ उपशाला गती मिळाली. जसजसा गाळ उपसा झाला अन् शासकीय जमिनीतील मूळ नदीचे सीमांकन पूर्ण होत आहे, तसतसे या सीमांकनात उभारलेली घरे, दुकाने आणि व्यावसायिक जागा उघड होऊ लागल्या आहेत. अतिक्रमणांमुळे नदी गुदमरलेली असतानाही या अतिक्रमण वाचवण्यासाठी राजकारणी धावू लागले आहेत.
चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी पुढाकार घेतलेल्या नाम फाउंडेशनने गतवर्षी शिवनदीतील गाळ उपसा करून नदीपात्र मोकळे केल्यानंतर यावर्षी वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ उपसाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानुसार नाम फाउंडेशनने आवश्यक यंत्रसामग्री लावत उक्ताड, गोवळकोट धक्का, पेठमाप, बाजारपूल, गणेश विसर्जन घाट अशा ठिकाणी गाळ उपसा सुरू केला आहे; मात्र गतवर्षाच्या तुलनेत या वेळी गाळ उपशाला ठिकठिकाणी विरोधाचे सूर उमटत आहेत. उक्ताड बेटावरील गाळ उपशाला नागरिकांनी विरोध केला. त्यासाठी राजकीय नेतेमंडळींनीही फोनाफोनी केल्याने हे काम थांबले होते; मात्र प्रशासनाने बैठक घेतल्यानंतर पुन्हा ते काम सुरू झाले.
गतवर्षीपासून शहरातून जाणाऱ्या वाशिष्ठी नदीचे शासकीय यंत्रणेकडून सीमांकन करण्यात येत होत होते. महसूल, भूमी अभिलेखी यंत्रणा हा मुद्दा गांभीर्याने घेत नव्हती. पालकमंत्री उदय सामंत यांनी सीमांकन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यानंतर गेल्या आठवड्यात गणेश विसर्जन घाटासह एकूण ३ ठिकाणी सीमांकन केले. या सीमांकनात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. या सीमांकनात बाजारपूल परिसरात काही दुकाने, घरे व इमारतींचे अतिक्रमण झाल्याचे पुढे आले आहे. ही अतिक्रमणे वाचवण्यासाठी विविध कारणे संबंधितांकडून दिली जात आहेत.
चिपळूण व खेर्डी भागातील हजारो नागरिकांचे किंबहुना संपूर्ण चिपळूणवासीयांचे भवितव्य अंधारात आहे. वाशिष्ठीचे पात्र सीमांकनानुसार रुंद व खोल केल्यास चिपळूण पूरमुक्त होण्यास मदत होईल. निळी व लाल पूररेषा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते; मात्र जे माजी लोकप्रतिनिधी अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालतात ते योग्य नाही. काहीजण नाम फाउंडेशनच्या मुख्य कार्यालयात व वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा थेट फोन करत आहेत. हे तर अती होत आहे.
- शाहनवाज शाह, जलदूत, चिपळूण.