मातीच्या नावाखाली घनगाळाची वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातीच्या नावाखाली घनगाळाची वाहतूक
मातीच्या नावाखाली घनगाळाची वाहतूक

मातीच्या नावाखाली घनगाळाची वाहतूक

sakal_logo
By

rat२२४१.txt

बातमी क्र..४१ ( पान ३ साठी मेन)

मातीच्या नावाखाली घनगाळाची वाहतूक?

आवाशीत आरोप ; कंपनीकडून स्पष्ट इन्कार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २२ ः मोकळ्या जागेवर भराव टाकण्यासाठी माती नेत असल्याचे भासवून रासायनिक घनगाळ नेत असल्याचा धक्कादायक प्रकार आवाशी ग्रामपंचायतीच्या आजी-माजी उपसरपंचांनी उजेडात आणला . याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा गाळ रिव्हर साईड कंपनीचा असल्याचे पुढे आले आहे. खेड तालुक्यातील लोटे परशुराम रासायनिक औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सीईटीपी प्रकल्पातील घनगाळ आवाशी असगणी गावाच्या वेशीवर खड्डा मारून सुकवण्यात आल्याची घटना ताजी आहे. आता येथीलच रिव्हर साईड कंपनीच्या घनगाळाचा मुद्दा समोर आल्याने गावात संताप व्यक्त केला जात आहे.
आवाशीचे उपसरपंच संदेश शिगवण व माजी उपसरपंच अमित आंब्रे यांनी हा प्रकार समोर आणला आहे. मागील काही दिवसांपासून येथील रिव्हर साईड या रंग उत्पादन करणाऱ्या कंपनीत माती उत्खननाचे काम सुरू असून, त्याची कंपनीबाहेर वाहतूक होत आहे. वाहतूक करणाऱ्या डंपरची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यात मातीऐवजी घनगाळ असल्याचे समोर आले. याबाबत कंपनी मालक मनोज मुलचंदानी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मातीच असून रासायनिक घनगाळ नाही. त्याचबरोबर ही माती त्यांच्या मालकीच्या उधळे (ता. खेड) येथील जागेत भराव करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्याचा उत्खनन व वाहतूक परवाना असल्याचेही त्यांनी सांगितले; मात्र, वाहतूक होत असलेली माती नसून ते रासायनिक घनगाळच आहे असा आरोप संदेश शिगवण आणि अमित आंब्रे यांनी केला आहे. जरी ते स्वतःच्या जमिनीत टाकत असले तरी पावसाळ्यात त्याचा त्रास तेथील नागरिकांना होणार आहे. उधळे येथील नाले, ओढे, नदी यामुळे प्रदूषित होणार आहेत. त्यामुळे महसूल विभाग व प्रदूषण महामंडळाकडून दोन्ही ठिकाणची पाहणी करून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
---
परवानगी कितीची?
एका उपसरपंचांना दीडशे ब्रास तर दुसऱ्या उपसरपंचांना अडीचशे ब्रास व प्रसारमाध्यमांना दोनशे ब्रास उत्खननाची परवानगी घेतल्याचे कंपनी मालकांकडून सांगण्यात आले; पण महसूल विभागाकडे विचारणा केली असता केवळ शंभर ब्रासचीच परवानगी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमकी परवानगी कितीची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
---
चुकीची माहिती
या संदर्भात कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ही मातीच आहे. आम्ही या मातीचे नमुनेदेखील संबंधित यंत्रणेकडे तपासणीसाठी देऊ शकतो. चुकीची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रसारमाध्यमांना पुरवली जात आहे, असे कंपनीचे जनरल मॅनेजर दिनेश कदम यांनी सांगितले.
--