हळवल फाटा अपघातमुक्त करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळवल फाटा अपघातमुक्त करा
हळवल फाटा अपघातमुक्त करा

हळवल फाटा अपघातमुक्त करा

sakal_logo
By

swt२३२६.jpg
८४८३८
कणकवलीः येथील उपविभागीय कार्यालयात चर्चा करताना बाळू मेस्त्री, संदेश पारकर, नंदन वेंगुर्लेकर.

हळवल फाटा अपघातमुक्त करा
बैठकीत सूरः कायस्वरूपी तोडगा काढण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २३ः मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलापुढील हळवल येथील तीव्र वळणावर होणारे अपघात कायमस्वरूपी थांबवण्यासाठी हे तीव्र वळण अपघात मुक्त करता येईल का, या दृष्टिकोनातून उपाययोजना करावी, अशी सूचना प्रभारी प्रांताधिकारी वर्षा शिंगण यांनी महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांना दिले आहेत. तीव्र वळणावर वेगावर मर्यादा आणणे, उड्डाणपुलाला जोडूनच पुढे पुलांची लांबी वाढवणे यासाठी नवा प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना करण्यात आली. तुर्तास अपघात सुरक्षा समितीकडून ऑडिट केले जाईल, असे आश्वासन श्री. जाधव यांनी आजच्या बैठकीत दिले. जिल्ह्यातील वाहनांसाठी टोल मुक्ती मिळावी, यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्याची सुचना आजच्या बैठकीत करण्यात आली.
कणकवली शहरालगतच्या गडनदी पुलावरील तीव्र वळणावर हळवल फाटा येथे सातत्याने अपघात होत आहेत. याला तीव्र निषेध करण्यासाठी विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली तसेच टोल मुक्त कृती समितीच्या सहकार्यातून जन आंदोलन पुकारण्यात आले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या या आंदोलनानंतर आज बैठक घेण्याबाबत निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आज सकाळी साडेअकरा वाजता बैठक सुरू झाली. या बैठकीला प्रभारी प्रांताधिकारी सौ. शिंगण यांच्यासह महामार्ग प्राधिकरण रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता जाधव यांच्यासह बाळू मेस्त्री, कृती समितीचे नंदन वेंगुर्लेकर, संदेश पारकर यांच्यासह नायब तहसिलदार शंकर राठोड, उपअभियंता एस. व्ही. शिवणीवार, उपअभियंता सावंतवाडीचे एम. व्ही. रवटी आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने हळवल येथील तीव्र वळणाच्या कारणांनी होणाऱ्या अपघातावर प्राथमिक चर्चा झाली. या चर्चेनुसार सध्या ज्या उपायोजना करता येतील, त्या सुचविण्यात आल्या. उड्डानपुलापासून २०० मीटरच्या अंतरावर सध्या स्थितीत वेग नियंत्रण सूचना फलक लावण्यात आले असून येथे गतिरोधकही बसविण्यात आले आहेत. वाहनांवरील वेगावर नियंत्रण आले तर येथे अपघात होण्याची प्रमाण कमी होईल. परंतु, हे अपघात थांबवता येतील का, यावर महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी निरुत्तर झाले. बाळू मेस्त्री यांच्या मागणीनुसार या तीव्र वळणाच्या कारणाने होणाऱ्या अपघाताची जबाबदारी निश्चित करावी, अशी त्यांनी लेखी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली होती. यावरही बराचकाळ चर्चा झाली. परंतु, तूर्तास उपाययोजना सुचवाव्या, त्यानंतर ठोस असा निर्णय घेण्याबाबत कारवाई करावी, अशी सूचना प्रांताधिकारी सौ. शिंगण यांनी केली.
मुळात पूर्वीच्या गडनदी पुलाला समांतर असे दोन्ही नवे पूल बांधण्यात आले. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक तीव्र वळण या भागांमध्ये आहे. परिणामी येथे अपघात होतात, असे सर्वांचे म्हणणे होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या डिझाईनला कशा पद्धतीने परवानगी दिली? त्याची नेमकी कारणे काय? यावरही चर्चा झाली. त्यामुळे मूळ प्लॅन आजच्या सभेपुढे दाखवण्यात आला. त्याच प्लॅनप्रमाणे बांधकाम विभागाने काम करून घेतले आहे. यात नव्याने बदल करण्यासाठी ज्या सूचना आल्या आहेत, त्यानुसार नवे डिझाईन करावे लागेल. तसा प्रस्ताव अधीक्षक अभियंताकडे आपण पाठवू, अशी माहिती श्री. जाधव यांनी उपस्थितांना दिली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर केंद्रीय मंत्रालय पातळीवर खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहू, असे संदेश पारकर यांनी सांगितले.
सध्या स्थितीत महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना न करता अपघात मुक्त वळण व्हावे, या दृष्टिकोनातून उपाययोजना करावी, अशा सूचना केल्यानंतर याबाबत सुरक्षा समितीचे ऑडिट करून घेणे, असे निश्चित करण्यात आले. गडनदी आणि जानवली नदीच्या पुलावरून जाणारे पर्यायी रस्ते जोडण्यासाठी सध्याच्या रस्त्याची रचना करण्यात आली आहे. मात्र, जर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर दोन्ही नद्यांवरील महामार्गाचे उड्डान पूल पुढे १०० ते २०० मीटर वाढवावे लागेल. त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा लागेल. त्या आराखड्याला केंद्रीय मंत्रालयीन पातळीवर मंजुरी, निधी उपलब्ध करून देणे हा मोठा प्रस्ताव आहे. त्याबाबत सर्वांनी मिळून प्रयत्न करू. तूर्तास अपघात मुक्त होण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी सूचना या बैठकीत प्रांताधिकारी सौ. शिंगण यांनी मांडली. टोलमुक्तीबाबतही स्वतंत्र पातळीवर बैठक घेण्याची निश्चित करण्यात आले.
-------
टोला मुक्तीसाठी बैठकीची मागणी
राष्ट्रीय महामार्गावरील टोल मुक्तीबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत. राज्यभरात कशा पद्धतीने निर्णय झाले आहेत, त्याची माहिती नंदन वेंगुर्लेकर यांनी बैठकीत दिली. शासनाचे आदेश आणि सध्याच्या स्थानिक पातळीवरची स्थिती लक्षात घेऊन स्थानिकांना टोल मुक्ती करता येईल, यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी श्री. वेंगुर्लेकर यांनी यावेळी केली.
----------
चौकट
लोकविरोधामुळे काम थांबले ः जाधव
कणकवली शहरातील एसएम हायस्कूल ते जानवली पुलापर्यंत जो बॉक्स वेलचा भाग कोसळलेला आहे, तेथे पुन्हा काम केले जाणार आहे. मात्र, स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळे सध्या हे काम थांबविण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांनी दिली. ते म्हणाले, "या कामासाठी किमान चार महिन्याचा कालावधी लागणार आहे. पुलावारील वाहतूक शहरातून सुरू होईल. त्याचा कामावर ताण येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी येत्या नोव्हेंबर महिन्यात हे काम करावे लागेल." यावर पारकर यांनी आक्षेप घेत, शहरातील अर्धवट असलेली बांधकामे, नळ योजनेची समस्या आणि लोकांच्या मागणीनुसार थेट उड्डाणपूल व्हावे, बॉक्सवेल काढून टाकावे. यामुळे या कामाला लोकांचा विरोध असल्याचे श्री. पारकर यांनी नमूद केले.
-------------
चौकट
प्रमुख मागण्या
* उड्डाणपुलाची लांबी वाढवा
* टोलमुक्ती द्या
* शहरातील बॅक्सवेल काढून टाका
-------------