सदर-प्रवास दशावताराचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर-प्रवास दशावताराचा
सदर-प्रवास दशावताराचा

सदर-प्रवास दशावताराचा

sakal_logo
By

प्रवास दशावताराचा

swt2333.jpg
84863
प्रा. वैभव खानोलकर
swt2334.jpg
L84864
दशावतारातील शारदामाता

दशावतारातील ‘शारदा पदन्यास’

दशावतार हा लोककला प्रकार सर्वव्यापी असून या लाल मातीने तो कित्येक दशके जपल्याचे आढळते. दशावतारात जितके महत्त्व महागणपतीचे असते, तितकेच महत्त्वाचे स्थान मोरवाहिनी शारदामातेचे असते, याची सत्यता पटते ती कोकणच्या धयकाल्यात.
- प्रा. वैभव खानोलकर
..............
सूत्रधार रंगमंचावर शारदेची आळवणी करतो,
‘‘जय अंबे त्रिपुरारी भैरवी आदिमाये
तुझा गं आज महिमा वर्णू शारदे
धाव जगदंबीके पाव वेगे त्वरे
लागला घोर संसार मागे पुढे
सज्जीली सज्जना दृष्ट ममवासना
उघडीयले लोचना शरण आलो तुला ! ’’
यानंतर शारदा रंगमंचावर येते. कोणत्याही संवादात शारदा सहभागी होत नाही; मात्र तिचा पदन्यास लक्षवेधी असतो.
मृदंग वादक आपल्या मृदंगावर बोल वाजवतो आणि तेच बोल तोंडावाटे काढतो, अर्थात यात काही वेळा तालरक्षक म्हणजे झांज वादकही सहभागी असू शकतो. ‘धीन तदिना, धीन तदिना, था थैय था, धींता त्रक थैया, धींता त्रक थैया, धींता त्रक थैया’ या ठेक्यावर शारदा होणारा कलावंत पदन्यास करतो. दशावतारात शारदेची भूमिकाही पुरुष कलावंत साकारतो.
‘ब्रम्ह कुमारी पाव गं मला हे सरस्वती
मयूर आसन शुभ्र वसन हे सरस्वती...
धीन तदिना...
लाल चंचुवाळे
गुंज वर्ण तुझे डोळे
धीन तदिना...
द्रौपदीचे वस्त्रहरणकरिता झाला दुःशासन
नित्य ऐकून नामस्मरण धावला श्री हरी
धीन तदिना...
भावे ओवाळीया मोदक भावे ओवाळीया...
या प्रत्येक चरणावर पदन्यास ठरलेला असतो आणि तसाच तो साकारण्याचा प्रयत्न शारदा करणाऱ्या कलावंताकरवी होतो. दशावतारातील नियम हे अलिखित असतात. आता अनेक कलावंत सुशिक्षित आहेत; पण पूर्वी दशावतारातील अनेक कलावंत निरक्षर होते. तरीही त्यांनी केलेल्या भूमिका, सादर केलेल्या भूमिका इतिहास घडवणाऱ्या ठरल्या.
याचे कारण म्हणजे शारदेची असणारी कृपा होय, असे जुने जाणते कलावंत सांगतात. विद्येची देवता श्री सरस्वती देवी म्हणजे विद्या आणि कला यांची देवता. तिच्या भावपूर्ण उपासनेने उपासकाची बुद्धी सात्त्विक बनल्याने त्याला विविध प्रकारच्या कला आणि ज्ञान प्राप्त होते. बुद्धीने जे ग्रहण केले, ते शब्दबद्ध करण्याचे काम श्री सरस्वतीदेवीचे आहे. श्री सरस्वती देवीला संत ज्ञानेश्वरांनी ‘अभिनव वाग्विलासिनी’, तर श्री समर्थ रामदासस्वामी यांनी ‘शब्द मूळ वाग्देवता’ असे म्हटले आहे. ही विद्येची देवता आहे. श्री सरस्वती देवीला ‘शारदा’ही म्हटले जाते. अशा या शारदेचे केलेले पूजन दशावतारी संस्कृतीची आद्य परंपरा आहे. नववारी साडी नेसून, मोरावर बैसून उत्कृष्ट पदन्यास साकारणारे जर शारदा नृत्य बघायचे असेल, तर धयकाल्याला नक्कीच भेट द्या. ज्ञानाला आधार देणारी विद्याप्राप्तीसाठी श्री सरस्वतीची उपासना आणि प्रार्थना आवश्यक असते आणि आजही दशावतारात ती केली जाते.