पान एक-''त्या'' खनिज निर्यातीची चौकशी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-''त्या'' खनिज निर्यातीची चौकशी होणार
पान एक-''त्या'' खनिज निर्यातीची चौकशी होणार

पान एक-''त्या'' खनिज निर्यातीची चौकशी होणार

sakal_logo
By

‘त्या’ खनिज निर्यातीची चौकशी होणार

‘खनिकर्म’ला आदेश ः मौल्यवान धातू असलेल्या मातीची कवडीमोल किमतीत निर्यात

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः रेडी, साटेली, तिरोडा, कळणे आणि डेगवे याठिकाणी सोने आणि प्लॅटीनमचा अंश असलेले क्षेत्र आहे. या भागात अनेक वर्षांपासून खनिजयुक्त माती काढून ती निर्यात केली जात आहे. या प्रकाराची चौकशी करून प्राधान्यक्रमाने अहवाल सादर करण्याचे आदेश नागपूर येथील राज्याच्या भूशास्त्र आणि खनिकर्म विभागाचे उपसंचालक एम. एस. निखारे यांनी कोल्हापूर विभागीय भूशास्त्र आणि खनिकर्म विभागाच्या उपसंचालकांना दिले आहेत.
साटेली, तिरोडा, कळणे आणि डेगवे येथील काही क्षेत्रांत १९६७ पासून खनिजयुक्त माती काढून तिची निर्यात केली जात आहे. सगळ्यात जुनी खाण रेडी येथे आहे. डेगवे येथे अद्याप उत्खनन सुरू झाले नसले, तरी साटेली, तिरोडा आणि कळणे या ठिकाणाहून गेली अनेक वर्षे खनिज उत्खनन सुरू आहे. येथून खनिजयुक्त माती काढून ती निर्यात केली जाते. प्रामुख्याने जपानला याची जास्त प्रमाणात निर्यात झाली आहे. ‘आयर्न ओव्हर’ या खनिजाचा अंश असलेली ही माती असल्याचे सांगून आतापर्यंत ही निर्यात चालू आहे. अलीकडच्या काळात चीनमध्येही या कच्च्या खनिजाची निर्यात झाली आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने या भागात खनिजयुक्त जमिनीबाबत केलेल्या संशोधनानंतर या कच्च्या खनिजाच्या निर्यातीबाबत संशयाचे मोहोळ तयार झाले. काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या संशोधनात वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील काही भागात सोने आणि प्लॅटीनम या मौल्यवान धातूंचा अंश असल्याचे समोर आले. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये तपासणी करून त्याचे अहवाल या संशोधनाला जोडण्यात आले. यानंतर मातीमोल किमतीने निर्यात करून सोने आणि प्लॅटीनमयुक्त माती पळवली जात असल्याचे आरोपही झाले. या पार्श्वभूमीवर दिलेला हा चौकशी आदेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या संदर्भात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या प्रा. रामसिंग हजारे यांनी याबाबत नागपूर येथील उपसंचालक यांना ६ मार्च २०२२ ला पत्र पाठवले होते. यात रेडी, साटेली, तिरोडा, कळणे आणि डेगवे येथील सोने आणि प्लॅटीनमयुक्त माती (कच्चे खनिज) सर्वसामान्य खनिज म्हणता येईल, असे आर्यन ओव्हर म्हणून परदेशात पाठवले जात असल्याचे व याची चौकशी करावी असे म्हटले होते. त्याची दखल घेऊन नागपूर उपसंचालक निखारे यांनी २३ फेब्रुवारीला चौकशी करण्याचे आदेश कोल्हापूर विभागीय कार्यालयाले दिले आहेत. नागपूर उपसंचालक यांनी दिलेल्या आदेशात, साटेली, तिरोडा, कळणे आणि डेगवे येथील खनिज निर्यातीबाबत अहवाल मागवला आहे. हा अहवाल प्राधान्यक्रमाने देण्याचाही उल्लेख यात आहे.
दरम्यान, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. नागपूर उपसंचालक यांनी काढलेल्या आदेशाची प्रत दाखवून याबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितले. त्यावर पाटील यांनी याबाबत अद्याप आपल्याशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. तांत्रिक माहिती देण्यासाठी कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयात स्वतंत्र विभाग कार्यरत असल्याचे सांगितले.