
मराठा समाजाचा गोंधळ कार्यक्रम
मराठा समाजाचा
गोंधळ कार्यक्रम
खेडः शहर मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (ता. २५) सांस्कृतिक कार्यक्रम, तर २६ ला गोंधळ कार्यक्रम येथील मराठा भवन येथे होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २५ ला रात्री ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २६ ला दुपारी ३ वा. जोगवा मागणे, रात्री ८ वा. पूजा व गोंधळ तर रात्री ९ वा. महाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मराठा समाजाच्यावतीने कळवण्यात आले आहे.
-----------
‘थिन फिल्म
डिपॉझिशन’ मशीन
चिपळूण ः येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयात संशोधन करण्यासाठी उपयुक्त असणारे थिन फिल्म डिपॉझिशन मशीन बसवले आहे. या मशीनचे उद्घाटन महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. ए. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. या वेळी या प्रसंगी संस्थेचे सचिव अतुल चितळे, खजिनदार संजीव खरे, प्राचार्य डॉ. एम. एस. बापट उपस्थित होते. नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
-----------
राजापूर रुग्णालयात
५२ जणांचे रक्तदान
राजापूरः कुणबी समाजाचे नेते (कै.) माळी गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कुणबी तरुण मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये झालेल्या शिबिरामध्ये ५२ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. उपक्रमाला राजापूर अर्बन बँकेचे संचालक प्रकाश कातकर, दिनानाथ कोळवणकर, किशोर जाधव, विमा प्रतिनिधी सुभाष नवाळे, सुधीर विचारे, चंद्रशेखर मोंडे, दिलीप नलावडे, कुणबी समाजनेते प्रकाश कुवळेकर आदींनी उपक्रमाचे कौतुक केले.
--------