
सावंतवाडीत अद्ययावत अग्निशमन बंब सावंतवाडीत अद्ययावत अग्निशमन बंब
85072
सावंतवाडी ः येथील पालिकेचा नविन अग्निशमन बंब.
सावंतवाडीत अद्ययावत अग्निशमन बंब
अग्निसुरक्षा अभियान; भाजप-शिवसेनेत मात्र श्रेयवाद
सावंतवाडी, ता. २४ ः येथील पालिकेच्या ताफ्यात नवा कोरा अग्निशमन बंब दाखल झाला आहे. महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेतून हा बंब पालिकेला मिळाला आहे. त्यामुळे पालिकेकडे असलेली अद्ययावत बंबची कमतरताच आता कायमची मिटली आहे. या अग्निशमन बंबाच्या श्रेयावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात जुंपली असून मंत्री केसरकर यांच्यामुळे निधी मंजूर झाल्याचे केसरकर गटाचे म्हणणे आहे तर भाजपाने केलाल्या पाठपुराव्यामुळे हा बंब मिळाल्याचे भाजपाचे म्हणणे आहे.
येथील पालिकेचा अग्निशमन बंब जीर्ण झाला होता. वारंवार दुरुस्त करुन तो वापरात होता. बऱ्याचदा नादुरुस्त बंबामुळे अडचणी निर्माण होत असत नागरिकांतूनही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळेच अद्ययावत बंबाची मागणी शहरवासीयांकडून होत होती. बंबाची गरज ओळखून याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. मंत्री केसरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी यासाठी पाठपुरावा शासनस्तरावर केला होता. नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर परब यांनी अग्नि सुरक्षा अभियानांतर्गत अग्निशमन बंब मिळावा, यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव करुन लक्ष वेधले होते. मंत्री केसरकर यांनीही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. एकूणच त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. पालिकेकडे हा बंब दाखल होताच श्रेयवाद पुढे आला आहे. शिवसेनेचे बाबू कुडतरकर यांनी मंत्री केसरकर यांनी या बंबासाठी ५५ लाख रुपये मंजूर करून आणले, असे सांगितले तर भाजपकडून माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी नगराध्यक्ष या नात्याने संजू परब यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठ पुराव्यामुळे हा बंब मिळाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या ठिकाणी श्रेयवाद चांगलाच रंगणार असल्याचे दिसून येत आहे.