
सहभोजन, भजनाने रत्नागिरीत इतिहासाला उजाळा
rat२४p४१.jpg
85096
रत्नागिरी ः भागोजीशेठ कीरांच्या पुण्यतिथीनिमित्त पतितपावन मंदिरात सहभोजनाच्या सोहळ्यात संत गाडगेबाबा, विनायक दामोदर सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या प्रतिकात्मक वेशभूषा केलेल्या व्यक्तींनी ऐतिहासक वातावरण तयार केले.
सहभोजन, भजनाने रत्नागिरीत इतिहासाला उजाळा
पतितपावन मंदिर; गाडगेबाबा, सावरकर, भागोजीशेठ कीर यांचे स्मरण
रत्नागिरी, ता. २४ ः दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ७९ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील पतितपावन मंदिरात सर्व समाजाच्या एकत्रित सहभोजनाचा आणि भजनाच्या सोहळ्याने इतिहासाला उजाळा दिला. संत गाडगेबाबा, विनायक दामोदर सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या प्रतिकात्मक वेशभुषेमुळे निर्माण झालेले ऐतिहासिक वातावरण, सोबत अठरापगड जातीचे लोक, त्यानंतर दुपारी पतितपावन मंदिरात घडलेल्या सहभोजनाच्या पंगती, त्यामध्ये सामिल झालेल्या २ हजार जणांमुळे १९३१ ते १९४४ या कालखंडातील इतिहासच पुन्हा डोळ्यासमोर उभा झाला.
भागोजीशेठ कीर यांचे कार्य सर्व समाजांच्या माध्यमातून पुढे नेले जावे यासाठी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, पतितपावन मंदिर ट्रस्ट आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सहभोजनाचा सोहळा आयोजित केला होता. यानिमित्ताने अठरापगड जाती, बारा बलुतेदार एकत्र येऊन भैरी मंदिरमार्गे सकाळी ९ वाजता प्रभातफेरी निघाली. यामध्ये संत गाडगेबाबा, विनायक दामोदर सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या प्रतिकात्मक वेशभुषा असलेल्या व्यक्तींनी इतिहासाची आठवण करून करून दिली.
ही फेरी राममंदिर, पेठकिल्ला, भागेश्वर मंदिर परत मांडवी, घुडेवठार, चवंडेवठार, नगर वाचनालय, लॉ कॉलेज, मारूती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जयस्तंभ, राममंदिर, आठवठा बाजार, टिळकआळी, गाडीतळ, पतितपावन मंदिर आली. या दरम्याने मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याला मानवंधना दिली. लोकनेते शामराव पेजे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घातला. यामध्ये भंडारी समाजाच्या नेत्यांसह सर्व समाजातील लोक उपस्थित होते.
दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पतितपावन मंदिरात सहभोजनाच्या आणि भजनाच्या सोहळ्याला सुरवात झाली. संत गाडगेबाबा, विनायक दामोदर सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांच्या प्रतिकात्मक वेशभूषा केलेल्यांचा योग्य सन्मान करून भोजनावळ सुरू झाली. अनेक प्रतिष्ठितांनीही या भोजनाचा आस्वाद घेतला. सव्वाबारा ते सव्वाचारपर्यंत पंगती सुरू होत्या. यामध्ये सुमारे २ हजार जणांनी सहभोजनाचा लाभ घेतला. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, पतितपावन मंदिर ट्रस्ट आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघाच्या या सोहळ्याने भागोजीशेठ कीर यांना खरीखुरी आदरांजली वाहिली.