
निरोगी मनासाठी खेळ आवश्यक
85200
कुडाळ ः क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना उमेश गाळवणकर. शेजारी डॉ. सूरज शुक्ला, प्रा. अरुण मर्गज, प्रा. धावडे, प्रा. कल्पना भंडारी, अर्जुन सातोसकर, शुभांगी लोकरे, विभा वझे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
निरोगी मनासाठी खेळ आवश्यक
उमेश गाळवणकर; कुडाळात क्रीडा महोत्सवास प्रतिसाद
कुडाळ, ता. २५ ः मनाच्या निरोगी आयुष्यासह शरीर निरोगी असणे फार महत्त्वाचे आहे. आपल्यातील कला कौशल्यांचा या क्रीडा महोत्सवामध्ये कस लावून यश संपादन करा; मात्र आपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे होऊ देऊ नका, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले.
येथील बॅ. नाथ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. निरोगी शरीराच्या जडणघडणीसाठी निर्मळ मनाचा विकास झाला पाहिजे. सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत. त्याचा यथोचित उपयोग करून घ्यावा, असे सांगत गाळवणकर यांनी क्रीडा महोत्सवास शुभेच्छा दिल्या. बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
बॅ. नाथ पै महिला रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अरुण मर्गज यांनी खिलाडूवृत्तीने खेळा. विजयी होताना यशाची धुंदी चढू देऊ नका. राग, लोभ, ईर्षा मैदानातच ठेवून पुन्हा एकोप्याने शैक्षणिक जीवन यशस्वी करा, असे सांगत क्रीडा महोत्सवास शुभेच्छा दिल्या. यावेळी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूरज शुक्ला, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, सेंट्रल स्कूलच्या प्रा. शुभांगी लोकरे, उपप्राचार्य विभा वझे, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, ज्युनियर कॉलेजचे प्रा. अर्जुन सातोस्कर उपस्थित होते. कोकण विभागामध्ये एकमेव असलेल्या या फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये ५० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, थाळीफेक, गोळाफेक, थ्रो बॉल, क्रिकेट, लांब उडी अशा विविध खेळांचा विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीने आनंद लुटला. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक डॉ. शुक्ला यांनी केले. मृण्मयी खानविलकर यांनी सूत्रसंचालन केले.