राष्ट्रीय शिबिरात महाराष्‍ट्राची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय शिबिरात महाराष्‍ट्राची बाजी
राष्ट्रीय शिबिरात महाराष्‍ट्राची बाजी

राष्ट्रीय शिबिरात महाराष्‍ट्राची बाजी

sakal_logo
By

राष्ट्रीय शिबिरात महाराष्‍ट्राची बाजी
मुंबई, ता. २५ ः मुलाना येथील महर्षि मार्कंडेश्वर डीम्ड टू बी यूनिवर्सिटीमध्‍ये एन.एस.एस. राष्ट्रीय एकता शिबिर १४ ते २० फेब्रुवारी दरम्‍यान पार पडले. या मध्ये बिहार, झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, पंजाब, हरियाना अशा एकूण १७ राज्यांनी भाग घेतला. स्किट व सांस्कृतिक प्रदर्शनात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे शिबीर विश्वविद्यालयाचे कुलगुरु तरसेम गर्ग व एन.एस.एस. समन्वयक डॉ. करण अग्रवाल यांच्या निर्देशानुसार पार पडले. महाराष्‍ट्राचे प्रतिनिधीत्त्‍व आरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिकतर्फे डॉ. सूर्यभान डोंगरे, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी व विभाग प्रमुख अगदतंत्र आयुर्वेद महाविद्यालय, शीव यांच्या नेतृत्त्‍वाखाली पर्निका चौधरी, प्रियंका घुबडे, चेतना पाटील, आदित्य शिंदे, यश पांडे व नागोराव मोरे यांनी केले. त्‍यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे संपूर्ण देशभरात महाराष्ट्राची प्रशंशा केली जात आहे.
अतिथिंचे स्‍वागत करण्याचा सन्मान
कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी महाराष्‍ट्राच्‍या विद्यार्थ्यांना उपस्थित आतिथींचे स्वागत आपल्या सांस्कृतिक वेशभुषेतून करण्याचा सन्मान मिळाला. या सर्व विद्यार्थ्यांचा व कार्यक्रम अधिकारी यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन या कार्यक्रमप्रसंगी सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी सर्व राज्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मानही महाराष्‍ट्राच्‍या यश पांडे याला मिळाला.
या प्रकारांत पटकावले यश
राष्ट्रीय एकता शिबिरात झालेल्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात १७ राज्यांनी सहभागी होऊन प्रदर्शन केले. यामध्ये महाराष्ट्राने सांस्कृतिक प्रदर्शनात व स्किटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सांस्कृतिक नृत्य व रांगोळीमध्ये द्वितीय येण्याचा बहुमान मिळाला. तर सांस्कृतिक कार्यक्रमात स्वयंसेवकानी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वेशभूषेसह प्रस्तुत केले. विद्यार्थ्यानी नुक्कड नाटकातून आयुर्वेदाच्या सद्वृत्ताद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच ‘बेस्ट आऊट ऑफ द वेस्ट’ यामध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंतीचे निमीत्त साधून सुंदर व आकर्षक असा शिवनेरी किल्ला तयार करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले यात विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक देउन सन्मानीत केले.
-----------------------
विद्यार्थ्यांनी मांडली त्‍यांच्या कल्पनेतली शाळा
घाटकोपर, ता. २५ ः शाळा या शब्दात खर तर एक जिव्हाळा आणि आदर आहे. विद्यार्थ्यांचे अख्खे विश्वच या एका ठिकाणी सामावलेले असते. शाळा हे ज्ञानाच मंदिर आहे. समाजाच्या, देशाच्या जडणघडणीत शाळेचा मोठा हातभार असतो म्हणूनच ज्या शाळेत नागरिकांचा भक्कम पाया रचला जातो त्या शाळा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक आहे. शाळेच्या अशाच कल्पनेतून घाटकोपरच्या नालंदा नगर येथील ज्ञानमंदिर हायस्कूल शाळेच्या इयत्ता पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाल विज्ञान प्रदर्शनात ‘आमच्या कल्पनेतील शाळा’ याचे सुरेख प्रदर्शन मांडले. पुठ्ठे आणि कागदाचा वापर करत विद्यार्थ्यानी तीन मजली इमारतीत आपली शाळा कशी असावी, याची सुंदर मांडणी केली आहे
शनिवारी (ता. २५) नालंदा येथील ज्ञान मंदिर हायस्कूल येथे एक दिवसीय बाल विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे संस्थापक अनिल झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यानी यावेळी विविध प्रकल्प या प्रदर्शनात मांडले. या वेळी टाकाऊ पासून टिकावू, सौर ऊर्जा, डे अँड नाईट, ज्वालामुखी उद्रेक, क्षेपणास्त्र उड्डाण, वॉटर हार्वेस्टिंग, धूम्रपान निषेध, पार्किंग उपाय अशा विविध संकल्पनेवर प्रदर्शन सादर करण्यात आले. या प्रदर्शनाला एन वार्ड सहायक आयुक्त संजय सोनवणे, शाळेचे संस्थापक अनिल झोरे, शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम, सामाजिक कार्यकर्ते संतोष पिंगळे आदींनी भेट दिली.
विद्यार्थांचे आयुक्तांकडे साकडे
बाल विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यानी आमच्या कल्पनेतील शाळा, या विषयावर तीन मजली इमारत साकारून आपली शाळा प्रदर्शित केली. या शाळेत मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान, संगणक वर्ग, शिक्षक, प्राचार्य आणि संस्थापक यांना बसण्यासाठी ऐसपैस रूम, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शौचालय, विद्यार्थ्यांसाठी रंगीत वर्ग, वाचनालय, विज्ञान वर्ग, चित्रकला वर्ग असे या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडले. या वेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला देखील अशी शाळा हवी, असे प्रदर्शन पाहण्यास आलेल्या एन वार्डचे सहायक आयुक्त संजय सोनवणे यांच्याकडे विनंती करताना साकडे घातले.

-----

साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसना मुदतवाढ
मुंबई, ता. २५ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर दरम्यान चालविण्यात येणाऱ्या विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्र. ०२१८८ मुंबई-रीवा ही विशेष रेल्वे ३१ मार्च २०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती. ती आता ३० जूनपर्यंत चालविण्यात येणार आहे. ट्रेन क्र. ०२१८७ रीवा-मुंबई एक्स्प्रेस विशेष ३० मार्चऐवजी २९ जून २०२३ पर्यंत, ट्रेन क्र. ०२१३१ पुणे-जबलपूर विशेष एक्स्प्रेस २७ मार्चऐवजी २६ जूनपर्यंत; ट्रेन क्र. ०२१३२ जबलपूर-पुणे विशेष एक्स्प्रेस २६ मार्चऐवजी २५ जूनपर्यंत चालविण्यात येणार आहे. या एक्स्प्रेस धावण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही. मुदत वाढविलेल्या विशेष रेल्वेचे आरक्षण उद्या (ता. २४)पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल.
--
महिला दिनानिमित्त मुलुंडमध्ये विविध कार्यक्रम
मुलुंड, ता. २५ ः ‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’तर्फे महिला दिनानिमित्त ‘वूमेन्स विक सेलेब्रेशन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना प्रवेश मोफत असून रोज संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान हे कार्यक्रम होणार आहेत. अधिक माहिती साठी ९८६७३८५५५४ वर संपर्क साधण्याचे आवाहन मुलुंड विकास समितीच्या अध्यक्षा मयुरा बाणावली यांनी केले आहे.
‘वूमेन्स विक सेलेब्रेशन’ची सुरुवात बुधवारी (ता. १) ‘सैनिकांच्या श्वासाचा ध्यास’ या कार्यक्रमाने होईल. भारतीय जवानांसाठी सियाचीन सारख्या प्रदेशात ‘ऑक्सीजन प्‍लँट’ची उभारणी करणाऱ्या सुमेधा चिथडे यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची या वेळी संधी मिळणार आहे २ मार्चला ‘माझ्यातली मी; कलाविष्कार तुमचे, रंगमंच आमचा’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेळी महिलांना आपल्या छंदांना, कलागुणांना वाव देता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गायन, नृत्य, काव्यवाचन, कथाकथन किंवा अगदी एकपात्री प्रयोग अशी कोणतीही कला सादर करता येणार आहे. त्यासाठी ५ ते ७ मिनिटांचा अवधी महिलाना देण्यात येणार आहे. ३ मार्चला ‘माझी सखी, माझी सहकारी’ हा कार्यक्रम होणार असून यामध्ये ‘हाऊस वाइफ’ साठी काहीतरी करावे या प्रमाणिक उद्देशाने महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ४ मार्चला माजी आमदार डॉ. निशिगंधा मोगल यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे. तर ५ मार्चला वूमेन्‍स बाईक रॅलीचे सकाळी आठ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना महिलांनी मोठ्या संख्‍येने हजर रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----------