
‘पुता, मायक इकत घेतय काय?’
पाऊलखुणा ः भाग - ११०
85261
आश्वारूढ श्रीमंत शिवरामराजे.
‘पुता, मायक इकत घेतय काय?’
लीड
सावंतवाडी संस्थानचे शेवटचे सिंहासनाधिष्ठित राजे श्रीमंत शिवरामराजे भोसले यांची कारकीर्द आपण पुढच्या काही भागांत जाणून घेणार आहोत. शिवरामराजे यांना राजा म्हणून कारभार पाहायला फार कमी कालावधी मिळाला; मात्र लोकशाहीच्या कारभारात आमदार म्हणून त्यांनी दीर्घकाळ सावंतवाडीचे नेतृत्व केले. शिवरामराजे हे शेवटपर्यंत ‘राजेसाहेब’ म्हणून जगले. त्यांचे व्यक्तिमत्त्व तेजस्वी तर होतेच, शिवाय सर्वसामान्यांसाठी झिजणारे होते.
----------
सावंतवाडी संस्थानचे शेवटचे सिंहासनाधिष्ठित राजे श्रीमंत शिवरामराजे यांनी आपली वेगळी ओळख सावंतवाडी संस्थान, सिंधुदुर्गच नाही तर पूर्ण महाराष्ट्रावर कोरली. हुशार, तेजस्वी, स्वाभिमानी, अभ्यासू असलेल्या शिवरामराजे यांचे व्यक्तिमत्व जिल्हावासीयांच्या मनात ‘राजेसाहेब’ म्हणून कोरले गेले. या आधीच्या भागांमध्ये त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी ओघाने आल्या आहेत. त्यांची पुढची कारकीर्द या सदरातून जाणून घ्यायची आहेच; पण त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते, हे सांगणाऱ्या काही आठवणींनी याची सुरुवात करूया.
शिवरामराजे यांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ कवी वसंत सावंत यांनी त्यांचे वर्णन खूप समर्पक शब्दांत केले आहे. ‘अत्यंत देखणे’ हे विशेषणही अपुरे पडावे, अशी त्यांची शरीरयष्टी होती. तलवार कट, काळ्याभोर मिशा, धारदार लांब नाक, भव्य चेहरा, काळेभोर केस, सडपातळ उंच सैनिकाचा देह, सळसळते रक्त, गोरा तांबूस रंग, इंग्रजी भाषेवर असाधारण प्रभुत्व, कुजबुजते डोळे असा हा तरुणपणातला आदर्श राजकुमार होता. आजचा एखादा अभिनेता फिका पडावा, असे हे व्यक्तिमत्त्व होते. कविवर्य सावंत यांच्या या शब्दांतून तारुण्यातील राजेसाहेब कसे होते, हे डोळ्यासमोर येते; मात्र व्यक्ती म्हणून ते याच्या कित्येक पटीने अधिक सुंदर, हुशार, सालस होते. त्यांच्या ज्ञानाला सीमा नव्हत्या. त्यांची निरीक्षणशक्ती, अभ्यास आणि सर्वसामान्यांविषयी आत्मीयता याला तोड नव्हती. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना खूप मोठमोठी पदे मिळायला हवी होती. ते सर्वार्थाने यासाठी योग्य होते; मात्र त्याकाळातही राजकारणात राजेसाहेबांइतकी मोकळी, स्वच्छ चारित्र्याची, सर्वसामान्यांचा प्राधान्याने आणि आपल्या स्वार्थाचा अजिबात विचार न करणारी माणसे चालत नसावीत, पण याने काही फरक पडत नाही. सावंतवाडीच्या जनतेसाठी राजेसाहेब यांचे स्थान अगदी देवघरात होते.
राजेसाहेबांचा सहवास लाभलेले व सावंतवाडी संस्थानच्या इतिसाहाचे अभ्यासक डॉ. जी. ए. बुवा यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणाऱ्या काही आठवणी सांगितल्या. त्यांच्या अभ्यास आणि निरीक्षण शक्तीची प्रचिती देणारी आंबोलीतील १९८२-८३ च्या दरम्यानची एक सभा त्यांनी यासाठी आवर्जून सांगितली. या सभेला अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी जमली होती. राजेसाहेब बोलायला उभे राहिले. त्यांनी कोकणच्या विकासाच्या दृष्टीने अगदी अभ्यासपूर्ण मते मांडायला सुरुवात केली. बोलताबोलता ते म्हणाले, ‘‘कोकणवासी सातत्याने एका तक्रारी वृत्तीने जगत असतो. त्याच्यामध्ये एकमेकांविषयी संशयाची भावना असते. तो दुसऱ्यावर कधीच सहजासहजी विश्वास ठेवत नाही. त्यामुळेच कोकणचा विकास अडखळलेला आहे.’’
कोकणी माणूस असा का बनला, याचे उत्तरही त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, ‘‘कोकणातील निसर्गानेच इथल्या माणसाला एकमेकांपासून अलग केले आहे. येथील भौगोलिक परिस्थितीमुळे एका विशिष्ट भागात राहणाऱ्यांची संख्या वाढल्यास त्यांच्या उपजीविकेसाठी पुरेशी साधनसंपत्ती, शेती उपलब्ध होत नाही. यामुळे नवी पिढी, तरुण वर्ग उपजीविकेसाठी नवा भूभाग शोधतो. हा भूभाग शोधल्यावर तिथेच आपली नवी वस्ती उभारतो. मूळ स्थानापासून दूरवर एक नवे गाव, एक नवी वाडी उदयाला येते. तेथे नवे नेतृत्व तयार होते. काळाच्या ओघात, पिढ्यांमधील अंतरामुळे वाडीवाडीत स्पर्धा सुरू होते. माणसे एकमेकांपासून दुरावतात. त्यातून संशयाचे बीज अंकुरते. याउलट घाटमाथ्यावर सपाट भूप्रदेश असल्यामुळे तेथे उपजीविका करण्यासाठी विस्तृत क्षेत्र असते. त्यामुळे तेथील घरे एकमेकाला लागून, कॉलनी पद्धतीची उभी राहतात. घराबरोबरच माणसांचे विभाजन टळते. यातून एकसंघ मानसिकता तयार होते. सहकाराची भावना रुजते. यातून सर्वांगीण विकासाचे मार्ग खुले होतात.’’ कोकणातील एकमेकांपासून दुरावलेल्या मानसिकतेची चर्चा अनेकदा होते; मात्र त्या मागचे कारण चिकित्सक पध्दतीने शोधून त्यावर अभ्यास करणारे राजेसाहेब एखादेच असतात.
डॉ. बुवा यांनी राजेसाहेबांसोबत अनुभवलेला एक प्रसंग त्यांचे आणखी एक रूप समोर आणतो. एकदा राजेसाहेब डॉ. बुवा यांना म्हणाले, ‘‘सायंकाळी आपल्याला एका मोठ्या व्यक्तीकडे जेवायला जायचे आहे. तयारीत रहा.’’ सायंकाळी राजेसाहेब आपल्या जीपमध्ये बसून डॉ. बुवांना घेऊन निघाले. सावंतवाडी मागे पडली होती. गाडी सह्याद्रीच्या कुशीत शिरली होती. आताच्या दोडामार्ग तालुक्याच्या दिशेने एक एक गाव मागे पडत होते. त्यांची जीप एका दुर्गम गावातील एका झोपडी वजा घरासमोर थांबली. राजेसाहेब उतरले आणि म्हणाले, ‘‘आपल्याला इथेच जायचे आहे.’’ आत शिरताच स्वच्छ सारवलेली जमीन, मडकी, थोडीफार भांडी अगदी नेटकेपणाने मांडलेली अशा वास्तूत प्रसन्न हास्याने एका आजीबाईंनी त्यांचे स्वागत केले. ‘पुता इलंय’, या तिच्या शब्दांत प्रसन्नता, आनंद, आपलेपणा असं खूप काही सामावलेलं होतं. महाराज खाली अंथरलेल्या फाटक्या चटईवर बसले. त्यांनी खुणा करताच डॉ. बुवाही तेथे बसले. आजीबाईंनी जेवण वाढायला घेतले. पानावर सोनकडी, वरण, उकडा भात, चटणी असे जिन्नस होते. त्या आजीबाईंशी गप्पा मारत राजेसाहेब पोटभर जेवले. त्या आजीबाईही राजेसाहेबांशी अगदी मुलासारख्या बोलत होत्या. त्या नात्यात निर्मळता होती. जेवण झाले. राजेसाहेब उठले आणि डॉ. बुवांना हळूच म्हणाले, ‘‘हेच ते मोठे जेवण. कसे वाटले? आता बघा गंमत.’’ राजेसाहेबांनी निघताना हळूच खिशातून एक नोट काढली. ते पैसे आजीबाईंकडे देऊ लागले. आजीबाई एकच वाक्य बोलल्या, ‘‘पुता, मायक इकत घेतंय काय?’’ राजेसाहेबांनी ती नोट पुन्हा आपल्या खिशात घातली. त्यांनी आजीबाईंचा निरोप घेतला. दोघांच्याही डोळ्यात डोकावणारे आत्मीयतेचे भाव त्यांचे नाते सांगायला पुरेसे होते. अशा अनेकांना राजेसाहेबांनी आपल्या स्वभावाने आपलेसे केले. राजेपण विसरून ते सर्वसामान्यांत मिसळून जात. त्यांच्यातला हा ‘सर्वसामान्यातला असाधारण राजा’ आपले वेगळेपण इतिहासात नोंदवून गेला.
..............
चौकट
अनमोल कारकीर्द
राजेसाहेबांबद्दल लिहिताना याची सुरुवात मुद्दामहून या दोन प्रसंगांनी करत आहोत. पुढच्या भागापासून त्यांचे जीवन चरित्र, कर्तृत्व जाणून घेणारच आहोत; पण त्या आधी ते कसे होते, याची झलक सांगायला हे दोन प्रसंग नक्कीच पुरेसे आहेत. त्यांचा सहवास लाभलेले अनेकजण आजही जिल्ह्यात आहेत. राजेसाहेबांनी जिल्ह्याला, जिल्हावासीयांना दिलेले प्रेम आणि वाहिलेले आयुष्य, कारकीर्द याचे मोल करता येणार नाही.