
राजापूर-बदलत्या नियमांचे लान करून काम करा
बदलत्या नियमांचे पालन करून काम करा
डॉ. संतोष शहापूरकर ; खापणे महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिषद
राजापूर, ता. २६ ः कार्यालयीन प्रशासन व व्यवस्थापन सांभाळताना सतर्कतेची गरज असून शासनाच्या बदलणाऱ्या नियम आणि अटीच्या अधीन राहून तत्परपणे काम करणे काळाची गरज आहे. प्रशासकीय पातळीवर काम बघत असताना कार्यालयीन व्यवस्थापनाच्या परवानगीनेच काम करणे अपेक्षित आहे. मंजूर असणाऱ्या विविध रजा घेत असताना व्यवस्थापनाची परवानगी अपेक्षित आहे. निवृत्तीवेतनाचे प्रस्ताव परिपूर्ण आणि वेळेत बनवणे गरजेचे असते. बदलत्या नियमाच्या अधीन राहून सतर्कतेने काम करूया, असे आवाहन डॉ. संतोष शहापूरकर यांनी केले.
तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग आयोजित वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन परिषदेत बीजभाषक म्हणून डॉ. शहापूरकर बोलत होते.
कार्यालयीन लेखा परीक्षण हे महत्वाचे असून ते जबाबदारीने व तितक्याच कुशलतेने नियमांच्या अधीन राहून केले पाहिजे. शासकीय पातळीवरील आदेशाचे पालन करून हे लेखापरीक्षण नेहमीच वेळेत केले गेले पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी सदैव अपडेट राहून काम करण्याची गरज असून या परिषदेतले विचार घेऊन आपण सर्वांनी चांगले काम करूया, असे आवाहन चंद्रशेखर खामकर यांनी केले.
या वेळी संस्थाध्यक्ष मनोहर खापणे, प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, प्रा. संजय निंबाळकर, संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत आदी उपस्थित होते.