रत्नागिरी- आजही न्यायव्यवस्थेसाठी रामशास्त्री प्रभुणे सर्वोच्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- आजही न्यायव्यवस्थेसाठी रामशास्त्री प्रभुणे सर्वोच्च
रत्नागिरी- आजही न्यायव्यवस्थेसाठी रामशास्त्री प्रभुणे सर्वोच्च

रत्नागिरी- आजही न्यायव्यवस्थेसाठी रामशास्त्री प्रभुणे सर्वोच्च

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat26p13.jpg- rat26p13
पणजी : न्यायमूर्ती रामशास्त्री या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन करताना न्यायमूर्ती महेश सोनंक. सोबत अॅड. विलास पाटणे, अॅड. रमाकांत खलप आदी.

न्यायव्यवस्थेसाठी आजही
रामशास्त्री प्रभुणे सर्वोच्च
न्यायमूर्ती महेश सोनंक ; पणजीत इंग्रजीतील रामशास्त्री पुस्तकाचे प्रकाशन
रत्नागिरी, ता. २६ : न्या. रामशास्त्री प्रभुणे आजही न्यायप्रक्रियेसाठी सर्वोच्च आदर्श आहेत. विदेशी न्यायतत्वे भारतीय असून भारतीय शास्त्रावर अवलंबून आहेत. सामान्यांना आजही न्यायालयाबाबत विश्वास वाटतो. त्यामुळे त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे न्यायालयाचे काम आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनंक यांनी केले.
येथील लेखक ॲड. विलास पाटणे यांच्या रामशास्त्री या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ॲड. रमाकांत खलप यांनी केला. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पणजी येथे झाला. त्या वेळी न्या. सोनंक बोलत होते. पणजी येथील सेंट्रल लायब्ररीमध्ये झालेल्या प्रकाशन समारंभाला वाचक, रसिकांची चांगली उपस्थिती होती. न्यायव्यवस्था लोकशाहीचा तिसरा खांब म्हणून ओळखली जाते. कुणाच्या दबावाखाली न येता निःपक्ष न्याय देण्याची गरज आहे असेही त्यांनी पुढे सांगितले.
न्यायाधीश म्हणून रामशास्त्रींचे स्थान अद्वितीय आहे. निस्पृह, बाणेदार, निष्कलंक असे त्यांचे चरित्र न्यायसंस्थेला दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांचे चरित्र जागतिक व्यासपीठावर जाण्याची गरज आहे, याच भूमिकेतून रामशास्त्री पुस्तकाच्या इंग्रजी संस्करणाचा प्रयोग केला आहे, असे लेखक ॲड. विलास पाटणे यांनी मनोगतात सांगितले. सर्वोच्च न्यायालय अंतिम आहे, हे खरे आहे परंतु सत्य अंतिम आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिेजे, असेही त्यांनी सांगितले.
गोवा सरकारचे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी रामशास्त्री पुस्तक ज्ञानाचा ठेवा असल्याने न्यायव्यवस्थेला त्याची गरज असल्याचे सांगितले. माजी कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी रामशास्त्री पुस्तकाच्या इंग्रजी संस्करणाचा संकल्प पूर्णत्वास नेला याविषयी आनंद व्यक्त केला. रामशास्त्री यांचे चरित्र वैश्विक न्यायव्यवस्थेच्या संदर्भात महत्वाचे असल्याने पणजी हायकोर्ट बारचे अध्यक्ष ॲड. जीलमान परेरा यांनी सांगितले.