पान एक-आंबा हंगामावर संकटाचे सावट

पान एक-आंबा हंगामावर संकटाचे सावट

Published on

पान एक

आंबा हंगामावर संकटाचे सावट
मोहोराचा तिसरा टप्पा ः बागायतदारांत अस्वस्थता
सकाळ वृत्तसेवा ः एकनाथ पवार
वैभववाडी, ता. २६ ः पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मोहोर येऊन फळधारणा झालेल्या हापूस आंबा पिकाला सध्या वाढत्या तापमानाचा फटका बसत असताना तिसऱ्या टप्प्यातील आलेल्या मोहोरापासून आंबा उत्पादन अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे उत्पादन मेअखेर किंवा जूनमध्ये येण्याचा अंदाज आहे. यावर्षीचा आंबा हंगामच संकटात असल्याने बागायतदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
जिल्ह्याच्या अर्थकारणात आंबा पिकाला मोठे महत्त्व आहे; परंतु आंब्याचा यावर्षीचा हंगाम काहीसा संकटात आला आहे. यावर्षी पहिल्या टप्प्यात १५ ते २० टक्के, दुसऱ्या टप्प्यात २५ टक्के, तर तिसऱ्या टप्प्यात ५० ते ६० टक्के मोहोर आला. पहिल्या टप्प्यातील मोहोर नोव्हेंबर-डिसेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मोहोर जानेवारी, तर तिसऱ्या टप्प्यात मोहोर फेब्रुवारी महिन्यात आला. पहिल्या टप्प्यातील आंबा पुढील २० ते २२ दिवसांत काढणीला येईल. काही भागांत काढणीला सुरुवातदेखील करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा मार्च अखेरपर्यंत येईल; परंतु फळधारणा झालेल्या आंब्याला सध्या वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपैकी आठ दिवस जिल्ह्याचे तापमान ३९ डि.से. राहिले आहे. त्यामुळे अनेक भागांत उन्हामुळे आंब्यावर काळे डाग पडत असल्याचे चित्र आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आंबा पिकांचे मोठे नुकसान होत असताना आता तिसऱ्या टप्प्यातील आंबा उत्पादनासमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आंबा तयार होण्यास किमान ९० ते १०५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आंबा मेअखेर किंवा जूनमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. या कालावधीत जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील आंबा उत्पादनाचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे.

कोट
तापमानवाढीने बागायतदारांचे नुकसान झाले; परंतु मार्चपूर्वी तापमानवाढीपासून झालेल्या आंबा नुकसानीला पीक विमा संरक्षण नाही. १ मार्चनंतर तापमानवाढीच्या नुकसानीला पीक संरक्षण आहे. त्यामुळे शासनाने या पीक विमा योजना राबविताना सद्य:स्थितीच्या नुकसानीचा आढावा घेऊन योजना कार्यान्वित करावी.
- सुशांत नाईक, आंबा बागायतदार, वेतोरे

तापमानवाढीपासून आंबा पिकाचे संरक्षण करण्यासाठी जिथे शक्य आहे, तिथे फळांना पिशवीने झाकून घ्यावे. झाडांच्या मुळावर गवत, पालापाचोळ्याचे आच्छादन करावे आणि पंधरा दिवसांत तीन ते चार वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, मुळदे संशोधन केंद्र

आंब्यावर तापमानवाढीचा परिणाम झाला, ही वस्तुस्थिती आहे; परंतु तिसऱ्या टप्प्यातील आंबा परिपक्व व्हायला १०५ दिवस लागतील, असे म्हणता येणार नाही. तापमानवाढीमुळे आंबा लवकर तयार होईल, तरीही १५ मे उजाडेल, असा अंदाज आहे.’
- डॉ. विजय दामोदर, शास्त्रज्ञ, रामेश्वर संशोधन उपकेंद्र, देवगड

दृष्टिक्षेपात
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आंब्यावर काळे डाग
१४ ते १९ फेब्रुवारी आणि २२ आणि २३ फेब्रुवारी असे आठ दिवस तापमान ३९ डि.से. राहिले.
तिसऱ्या टप्प्यातील मोहोरावर देखील तापमानवाढीचा परिणाम
आंबा उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com